पोस्टर लावल्याने काय साध्य होणार? कोण काम करत, हे सर्वांना माहीत; श्रीकांत शिंदेंचा टोला

Shrikant Shinde

ठाणे : कुणाला कितीही पोस्टर लावू द्या. त्याने काय होणार आहे. कोण किती करत आहे आणि मदतीला कोण धावून जात आहे, हे सर्वानाच ठाऊक आहे, असा खरमरीत टोला शिवसेना (Shiv Sena) खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी भाजपचे (BJP) आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचे नाव न घेता लगावला. विकास कामांच्या श्रेयावरुन कल्याण-डोंबिवली परिसरात भाजप आणि शिवसेनेत वाद सुरू आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांची पोस्टर बॉय आणि गल्ली बॉय म्हणून अवहेलना केली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांना प्रसारमाध्यमांनी सवाल केला असता त्यांनी हा टोला लगावला.

श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन डोंबिवलीतील रस्ते कामाची माहितीही दिली. महापालिका आणि महामंडळ रस्ते विकासासाठी प्रत्येकी ५० टक्के खर्च करणार आहे. औद्योगिक भागातील फेज वनमध्ये १० किलोमीटर आणि फेज टू मध्ये ११ किलोमीटर आणि निवासी वसाहतीमधील १३ किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे होणार आहेत. महापालिकेने ४० टक्के रस्त्यासाठी निविदा काढल्यावर महामंडळाकडून ६० टक्के कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यानुसार महापालिका ५५ कोटी १५ लाख रुपयांचा निधी महामंडळाकडे वर्ग करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही महापालिकेने महासभेत यापूर्वीच मंजूर केला आहे. तर महामंडळाकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत ५७ कोटी ३७ लाख रुपये अनुदान स्वरुपात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोस्टर कोणीही लावू द्या, काम कोण करतंय हे लोकांना चांगलच माहीत आहे, असं सांगतानाच कल्याण-डोंबिवलीतील कामे आम्हीच करत राहणार, असा चिमटाही शिंदे यांनी काढला.

विकासाच्या दृष्टिकोनातून कल्याण लोकसभा मतदार संघातील नागरिकांना कुठल्या कुठल्या सुविधा देता येईल त्याकडे आमचं लक्ष आहे. बाकी कोण काय करते यापेक्षा मी काय करतो याकडे माझे जास्त लक्ष असते. पोस्टर कोणीही लावावेत काम झाल्यास लोकाना समाधान मिळत असते. आम्ही जे काम केले आहे ते सर्वानाच माहिती आहे. हे ११० कोटीचे काम असेल, कोविड काळातील काम तसेच पत्री पूल, दुर्गाडी पूल ही कामे आम्ही केली आहेत, त्याची जनतेला जाणीव आहे, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button