उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलंय, हे सांगून वाद संपवावा ‘ – एकनाथ खडसे

uddhav thackaray-Eknath Khadse

मुंबई : युतीचं काय ठरलंय ते उद्धव ठाकरेंनी एकदाच सांगून द्यावं म्हणजे मुख्यमंत्री कुणाचा ? यावरून पुढे वादविवाद होणार नाही, असा उपरोधीक सल्ला भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे. विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आभाराचा ठराव विधानसभेत मांडला. त्या ठरावावर चर्चा करतांना खडसेंनी आपल्या पक्षातील नेत्यांसह राधाकृष्ण विखे-पाटील यांचाही समाचार घेतला.

विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून चांगले काम केले. पण अचानक त्यांनी राजीनामा का दिला ? आणि सत्तेत का आले ? ते कळलं नाही. आई म्हणते “बाळा गाऊ कशी अंगाई, तुझ्यामुळे झाले उत्तराई”, तसं आता वड्डेटीवारांना विखेंना म्हणावं लागेल “तुझा होऊ कसा उत्तराई” अशा मिश्किल शैलीत खडसे यांनी वड्डेटीवारांचे अभिनंदन केलं.

खडसे वारंवार आपल्याच सरकारवर टीका करत असतात, त्याबाबत बोलताना ते म्हणाले, मी सत्ताधारी पक्षात आहे हे कधी कधी मी विसरून जातो, विरोधी पक्षनेत्याचे गुण अजून माझ्यातून गेलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांना कधी कधी वाटत असेल की मी विरोधी पक्षात जातो की काय, पण मी विखे पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवणार नाही,मला दुसऱ्या पक्षात जायचंच असतं तर कधीच गेलो असतो. आता पक्षांतर करणार नाही, असं सांगत त्यांनी विखेंना टोला लगावला.

गिरीश आताच भाजपमध्ये आला. आधी तो निर्णयाच्या प्रकियेत नव्हता. तो जवळ झाला, विखेंना मंत्रीपद मिळालं आणि मुनगंटीवार दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेले, असं सांगत त्यांनी गिरीश महाजन आणि मुनगुटींवारांनाही चिमटा काढला. सरकार विरोधात वातावरण निर्मिती करुन आपलं सरकार आलं पाहिजे ही विरोधी पक्ष नेत्याची भूमिका, भाजपचं सरकार येण्यात (आधीच्या) विरोधी पक्ष नेत्याची महत्त्वाची भूमिका महत्त्वाची होती, असं सांगत स्वतःवर झालेल्या अन्यायबाबत अप्रत्यक्षपणे खडसेंनी भाषणात नाराजीही बोलून दाखवली.