जे न देखे रवी ते देखे कवी !

Mansi

हाय फ्रेंड्स ! तुम्हाला कदाचित वाटत असेल की मानवाच्या सगळ्या गरजा या केवळ ‘ मी माझे मला ‘ एवढ्याच भोवती फिरतात की काय ? एवढी स्वार्थी असते का व्यक्ती ? माझ्या शरीराची व मनाची साद ,माझा स्वतः विषयीचा आदर, स्व अस्तित्वाचा शोध ,माझी सुरक्षितता ,माझं स्वातंत्र्य, स्वनियंत्रण, माझ्यावर जीवाभावाची, समजून घेऊन विनाअट स्वीकार करणारी व्यक्ती हवी असते, माझं कौतुक करणारी व्यक्ती हवी असते. हातचं न राहता दिली जाणारी दाद हवी असते. अबब !

पण नाही ! असं मुळीच नाही. हे सगळं मिळाल्याने माणसाचं व्यक्तिमत्व निरोगी रित्या उमलत जातं पण मंडळी ,स्वतःजवळ काहीही नसणारी, पूर्ण निरोगी नसणारी अशी व्यक्ती इच्छा असूनही दुसऱ्यासाठी काय करू शकणार ? म्हणूनच सुरुवातीला अशा गरजांचा आढावा घेतला की ज्यामुळे ती व्यक्ती निरोगी बनेल. माणूस हा मुळातच समाजप्रिय असतो. समाजासाठी आपण काही देणं लागतो, असं समजून त्याला द्यावंसं वाटतं .त्याच्यासाठी समाज व देशासाठीच्या असणाऱ्या योगदानाला आयुष्यात महत्त्व असतंच.मग ते अगदी छोट्या छोट्या गोष्टी का असेना .ही एक गरज असते. टॅक्स भरणे, पाण्याचा जपून वापर करणे, शेजारच मूल सांभाळणे, इत्यादी.उलट निरउपयोगी पणाची भावना मन आजारी करू शकते. म्हणूनच ही एक गरज आहे. Need of being a part of community. चार लोकांमध्ये जावें , मिसळावे. लोकांनी ग्रुप मध्ये आपला स्वीकार करावा. ही सुद्धा भावना त्यांना सुरक्षितता देऊन जाते.

त्याच बरोबर,” असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी “हेही व्यक्तीला नको असतं. तर काहीना काही आव्हानं छोटी छोटी का होईना ,आपल्या आवाक्यातली असणं ती पण त्याला हवी असतात. त्याने जगण्याला मजा येते ,जगण्याला अर्थ मिळतो, कारण मिळतं ! एवढेच नाही तर सृजनशीलता, काहीतरी नवीन कल्पना जन्माला घालणं, सृजनाचा आनंद घेणं, या नवनिर्मितीतून व्यक्तीला आयुष्याचा सूर गवसतो. म्हणूनच Need of challenges & Creativity हीसुद्धा तितकीच महत्त्वाची गरज आहे.

मला वाटतं या सगळ्या गरजा परस्परावलंबी आणि परस्परांना overlap करणाऱ्या आहे. स्वतःच्या एखाद्या क्रिएटिव्हीटीतून आपली क्षमता व्यक्तीला कळते .तेव्हा तिला स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ मिळाल्या सारखा वाटतो.आपण समाजासाठी काही करू शकतो आहे आणि समाजाचा भाग आहे असे कळल्यावर सुरक्षितताही मिळत असणार .आणि सगळ्या गरजांची पूर्ती झाल्यावरच व्यक्ती समाजासाठी देशासाठी काही करू शकत असणार. कारण मुळातच आपण परिपूर्ण असू, स्वतः स्वस्थ असू, तरच इतरांसाठी काही करू शकत असतो. व्यक्तीची स्वतःतील’ को s हम ‘ शोध घेण्याची प्रक्रिया आयुष्यभर चालूच असते. मी नेमका कसा/कशी ? आणि हा शोध घेत असतानाच कोणताही भावनिक पक्षपात न करता, परखड नजरेने पण कमालीच्या आत्मियतेने पहात राहण्याची सवय लावणे ही आपली गरज आहे.

या को sहमचाच एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्वतःतील सर्जनशीलतेचा ! कलावंत शास्त्रज्ञामधील सर्जनशीलता सामान्यांच्या मनाने खूप जास्त असेल, प्रतिभेचे दैवी वरदानही असेल, पण तीच सर्जनशीलता आपल्यापैकी प्रत्येक माणसात कमी-अधिक प्रमाणात असतेच. घरात असेल नसेल ते बघून थोडक्यात सण साजरे करणारे पती-पत्नी, मुलांच्या वेड्या हट्टाला त्या क्षणी न रागवता प्रेमाने योग्य ती शिकवण देणारी आई, एखादा नवीन राग म्हणताना गायक वापरतो तशीच सर्जनशीलता आपल्या कुटुंबियांना आवडणाऱ्या पदार्थांचे जेवण बनवताना गृहिणी वापरत असते.

अनुभव हा सर्जनशीलतेचा पहिला टप्पा.कलावंत कुठलाही अनुभव अगदी प्रथमच अनुभवतोय एवढ्या तन्मयतेने येत असतो. तर दुसरा टप्पा म्हणजे त्याची अभिव्यक्ती. ती एवढी समर्थ बनते कि ती आता केवळ एका व्यक्तीचा अनुभव न राहता वैश्विक बनुन जाते.

उदाहरणार्थ गावाकडच्या ओसरीवर बसून आपल्या आजीबरोबर पाढे म्हणत, किंवा इतर गमतीजमती पहात कित्तेकजणांच्या संध्याकाळी गेल्या असतील.(अर्थात हा अनुभव आजच्या पिढीने कदाचित अनुभवला नसेल ) कविवर्य सुधीर मोघे यांना मात्र संध्याकाळही सावळ्या श्रीकृष्णाची सावली वाटते आणि या शाम रंगामध्ये म्हणजेच काळोखा मध्ये सगळ्या रस्ते वाटा बुडून गेलेल्या दिसतात. गाईंनी उडवलेल्या धुळीने त्यात भरच घातली आहे का काय असं वाटतं! त्यां संध्याकाळ मध्ये त्यांना दर्शन घडतं ते एका आईचं! ज्यात अंधार हा पान्हा असून, दूरवरच्या पर्वतरांगांच्या काळ्या कडा,त्यांना सावळयांनी घातलेलं काजळ वाटतात, रात्रीचा वाहणारा वारा बासरीचे सुर वाटतात, आणि असं होत त्या संध्याकाळच्या कुशीत पूर्ण विश्वच जणू कान्हाचे, बाळकृष्णाचे रूप घेऊन विसावलेले दिसते. असं म्हणतात ना की जे न देखे रवी, ते देखे कवी! हीच कलावंताची सृजनशीलता ! कदाचित आम्ही हेच दृश्य पाहून “अ रे रे ! केवढी धुळ,काळोख त्यात गाई म्हशी !”असं म्हणून त्रस्त होऊ कदाचित.

देशासाठी किंवा समाजासाठी काही करण्याची गरज ही पण उपजतच आहे. आयुष्यात बघायला गेलं तर असंख्य गोष्टी आणि अनेक व्यक्ती आपल्यासाठी ,इतकं काही करत असतात की त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची झाली तर कशी आणि किती करावी ?हा ही प्रश्न पडावा. माणूस जन्माला येतो तो काहीही घेऊन येत नाही आणि जातो तो काही देऊनही जात नाही. आणि म्हणूनच जीवन स्वस्थतेने, शारीरिक व मानसिक रित्या सुदृढतेने जगण्याची गरज पूर्ण झाल्यानंतर पहिली त्याची गरज राहते ती कुठल्यातरी प्रकारे उतराई होण्याची. हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. आपल्याकडच्या देण्याघेण्याच्या प्रकाराला वेगळं रूप येत असलं तरीही प्रत्यक्षात हे फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक असावे असं मला वाटतं. आणि त्यातील पवित्रता अजूनही तशीच टिकवावी असंही मला कित्येकदा वाटतं.

म्हणूनच समाजाचे देणे ,देशाचे देणे देण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतात. मी स्वतः येथे काहीही नवें केलेले नसल्यामुळे ही कृतज्ञतेची भावना आपल्यातला अहंकार धुवून काढायला मदत करते. आपल्यासाठी जगात सगळच कसं तयार आहे ,निसर्गाची संपत्ती मला विनाअट मिळालेली आहे, ऊन, पाऊस ,जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन. एवढ्या मोठ्या विश्वात कुणीतरी माझे कपडे बनवतो ,कुणीतरी माझ्यासाठी धान्य पिकवतो ,कोणी माझ्यासाठी चपला बनवतो ,माझ्या दररोजला लागणाऱ्या वस्तू नकळतपणे कुणी न कुणी तरी बनवतो आहे. आणि एवढेच काय घरकाम सोयीचं जावं म्हणून कुणीतरी शोध लावत आहे, तर कम्प्युटर सारख्या सोयीने ऑफिस मध्ये माझं काम सोपे झाले आहे.छोट्याशा मोबाईलच्या मॉडेल ने दुनिया मेरी मुठ्ठी मे वाटायला लागते. हे सगळ जाणवतं तेव्हा म्हणावसं वाटतं की “हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंदण” हे सगळं जर मला असा विनासायास मिळतं आहे ,तर अंगी आपोआपच विनम्रता येते .आपणही हे जग असंच अधिक सुंदर बनवत राहिले पाहिजे असं वाटतं. कृतज्ञते पोटी आपल्या पोळीवर तूप ओढण्याची भावना लयाला जाते, जीवनावरच प्रेम वाढते. मनुष्य आपल्या आयुष्याचा आदर करतो, काळजी घेतो ,व्यसनांपासून दूर राहतो.

आपल्या संस्कृतीत आपण वेगवेगळे नैवेद्य दाखवतो. ती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असते. (बरेचदा अलीकडे मुलांना वाटतं की हे कशाला उगीच ? देवाच्या नावाने आपलीच ऐश !) पण त्यात तथ्य आहे. कारण प्रसाद कसा घ्यायचा ? तर देवाला नैवेद्य ,मग ब्राह्मणाला ( गुरूला ), गाईला म्हणजे प्राण्याला, कावळ्याला म्हणजे पक्षाला, अग्नी देवतेला, आणि पानाच्या बाजूने चित्रवती म्हणजेच किडे मुंग्यांसाठी .आणि मग आपण ग्रहण करण्याची पद्धत होती. यापैकी आपण किती आणि कसं करतो हे आपणच आपले ठरवायचे .(कुणालाही फारसा वेळ नसल्याने भराभर जमेल तसा नेवैद्य करायचा, देवाला दाखवायचा तोही जेमतेम की…..) याला अपवाद असतीलही. पण म्हणूनच माणुसकी शिकवणारी ही शिकवण कर्मकांड ठरते. यात तरुण पिढीचा दोष नाही . आपण त्यांच्यापर्यंत नीट पोहोचत नाही. म्हणजे काय आपण” उरलो उपभोगा पुरता,”म्हणूनच जगतो. त्याऐवजी तुकाराम महाराज म्हणतात तसे,” उरलो उपकारापुरता “अशा भावनेने जगायला सुरुवात केली तर ….!

फ्रेंड्स ! आपली ही पण गरज पूर्ण होईल. ही गरज आहे तुमची, माझी आणि सगळ्यांची ! या सगळ्या गरजा तुमच्या आमच्या पूर्ण होवोत हीच शुभेच्छा !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER