देशमुखांनंतर अनिल परबांवर झालेल्या आरोपातून मुख्यमंत्र्यांना कोणता संदेश मिळतोय?

Maharashtra Today

राज्यात १०० कोटींचे वसुलीप्रकरण रोज नवनवी वळणं घेतंय. अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके प्रकरणाशी या प्रकरणाच्या तारा जोडल्या गेल्याचं उघड झालं. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला केंद्रीय तपास यंत्रणेनं ताब्यात घेतलं आणि महाविकास आघाडीचं पितळं उघड पडायला लागलं, असं विश्लेषण संबंधित विषयातले तज्ज्ञ करत आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरण उकरून काढलं. लावून धरलं. सचिन वझेला  अटक झाल्यानंतर त्याचे ऑपरेटर शोधायला हवेत असं सांगितलं होतं. यात आधी गृहमंत्री अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब यांचं नाव या प्रकरणात चर्चेला आलंय. निमित्त   ठरलं सचिन वाझेचं पत्र. महाविकास आघाडीवर वारंवार होणाऱ्या गंभीर आरोपांमुळं महाविकास आघाडीची प्रतिमा मलिन होताना दिसते आहे.

वाझेचा लेटरबॉम्ब
काही दिवसांपूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकला. दरमहिना १०० कोटी वसूल करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते. असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. यामुळं प्रकरण चांगलचं तापलं. अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं. यानंतर सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याचं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. सचिन वाझेनं पत्र लिहीत शिवसेनेचे नेते, परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केलेत. एनआयएने  हे पत्र न्यायालयासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून लेखी म्हणणं  मांडावं असं सांगत, न्यायालयानं पत्र स्वीकारायला नकार दिला. या पत्राची प्रत आता सोशल मीडियावर व्हायरल झालीय.

सचिन वाझेचे अनिल परब यांच्यावर आरोप
सचिन वाझेच्या पत्रात थेट अनिल परब यांचं नाव घेऊन त्यांच्यावर आरोप करण्यात आलेत. “शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी भेंडी बाजारमधील सैफी बुऱ्हानी ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या भव्य क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाची चौकशी करावी आणि त्यांच्या ट्रस्टीना वाटाघाटी करण्यासाठी माझ्यासमोर आणावे. त्यांच्याकडून ५० कोटी रुपये वसूल करण्यासाठी तू प्राथमिक बोलणी करून घे, असे मला त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलवून सांगितले. ” असं या पत्रात सचिन वाझेनं लिहिलंय.

शरद पवारांवरही आरोप
महाविकास आघाडीच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिमा गेल्या काही दिवसांपासून डागाळते आहे. स्वच्छ प्रतिमा म्हणून ओळख असलेल्या शरद पवारांचा उल्लेख सचिन वाझेच्या पत्रात असल्यामुळं मोठी खळबळ उडालीय. शरद पवारांचा उल्लेख  करताना सचिन वाझेनं पत्रात लिहिलंय, “माझे निलंबन रद्द करून मला पुन्हा सेवेत घेतल्याने शरद पवार नाराज आहेत आणि त्यांनी तुला पुन्हा निलंबनाखाली ठेवण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती मला अनिल देशमुख यांनी फोनवर दिली. शिवाय मी त्यांना समजावतो, पण त्या बदल्यात मला दोन कोटी रुपये दे, असेही देशमुख यांनी मला सांगितले. मी तेवढे पैसे देण्याविषयी असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी मला ती रक्कम नंतर देण्यास सांगितले.”

बाळासाहेबांची शपथ! आरोप खोटे आहेत, नार्को टेस्टची दर्शवली तयारी

अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझेने केलेले आरोप फेटाळून लावलेत. कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. वाझेच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना परब म्हणाले, “आज सचिन वाझे यांनी एन. आय. ए. कोर्टात एक पत्र दिलंय. त्या पत्रात त्यांनी माझा उल्लेख केला आहे. मी सचिन वाझे यांना बोलावलं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. २०२० च्या जून, ऑगस्टमध्ये सचिन वाझे यांना एसबीयूटी प्रकरणामध्ये ट्रस्टींकडून ५० कोटी जमा करण्याचे आदेश मी त्यांना दिले, असा गंभीर आरोप वाझे यांनी पत्रात केला आहे. जानेवारी २०२१ मध्ये मी मुंबई महापालिकेचा क्रॉन्ट्रक्टरकडून प्रत्येकी दोन कोटी जमा करण्याच्या सूचना दिल्या, असा दुसरा आरोप त्यांनी केलाय. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. माझ्यावर अशा प्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाही. म्हणून मी माझ्या दोन मुली आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे सर्व खोटं आहे. हे मला नाहक बदनाम करण्यासाठी आरोप करण्यात आले आहेत.” सचिन वाझेचे आरोप फेटाळून लावताना परिवहनमंत्री अनिल परब  यांनी नार्को टेस्टसाठीही तयार असल्याचं सांगितलंय. महाविकास आघाडीवर दिवसेंदिवस होणारे गंभीर आरोप आणि राज्यातला वाढता कोरोना यामुळं महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण होणार नाही ना? असा सवाल जनसामान्यांच्या मनात आहे.

महाविकास आघाडीला धोका निर्माण होईल का?

सचिन वाझेच्या नावानं फिरणारं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय. त्यांचे आरोप खरे की खोटे हा तपासाचा विषय असल्याचं सांगत, अनिल परब यांची पाठराखण करताना लोक दिसत आहेत. अनिल परबांनी नागपूर महानगरपालिकेतील भ्रष्टाराचाराविरोधात प्रकाश टाकला होता. भाजपला अडचणीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यामुळंच भाजपा हा ‘प्रतिवार’ करत  असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणताहेत.

अनिल परब हे मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतले मानले जातात. शिवसेनेतही त्यांचा हुद्दा मोठा आहे. कायदेशीर प्रकरणात त्यांनी अनेकदा भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय नेत्यावर होणारे आत्ताचे गंभीर आरोप म्हणजे उद्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हे प्रकरणाचे शिंतोडे उडू शकतात, असा अंदाज बांधला जातोय. पण हे  संकेत
नेमकं कोणतं राजकारण घडवतील ? याचं उत्तर येणारा काळच सांगेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button