केवळ दिल्लीची हुजरेगिरी करणारे भाजप नेते महाराष्ट्राच्या काय कामाचे?; काँग्रेसचा सवाल

BJP & Congress

मुंबई : राज्यात कोरोनामुळे (Corona) गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य विरुद्ध केंद्र सरकार हा संघर्ष आता चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने केंद्रात असणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर टीका केली आहे. केवळ दिल्लीची हुजरेगिरी करणारे भाजप (BJP) नेते महाराष्ट्राच्या काय कामाचे? असा प्रश्न काँग्रेसने (Congress) उपस्थित केला आहे.

याबाबत काँग्रेसने ट्विटसुद्धा केले आहे. ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता ‘ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत.’ असे उत्तर दिले जाते. रेमडेसिवीर न पुरवण्याचा सल्ला दिला जातो. दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे?, असे काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे.

फडणवीसांनी वकीलपत्रे घेतले काय?; नवाब मलिकांचा सवाल

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून सत्ताधारी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपचे राजकारण सुरू आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डकोरिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रविण दरेकर (Pravin Darekar) आणि प्रसाद लाड (Prasad Lad) हे भाजप नेते बीकेसी येथील पोलीस कार्यालयात पोहोचले होते.

या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली. रेमडेसिवीरची साठेबाजी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘ब्रुक्स फार्मा’ कंपनीचे मालक राजेश डोकानिया याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर राज्यातील संपूर्ण भाजप का घाबरली? देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे त्यांनी या कंपनीच्या मालकांचे वकीलपत्रे घेतले होते की त्यांचे लागेबांधे होते म्हणून त्यांची बाजू घेत होते, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान नवाब मलिक (Nawab Mailk) यांनी फडणवीसांना दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button