रुपकुंड तलावात तरंगणाऱ्या मानवी सांगाड्यांचं रहस्य काय ?

Secret Of Human Skeletons Floating In Roop Kund Lake

असा एक तलाव जो हिवाळ्यात बर्फाने आच्छादला जातो आणि उन्हाळ्यात तलावातला बर्फ वितळायला सुरुवात होते असं तुम्हाला सांगितलं तर ? यात काहीच नवीन वाटणार नाही. हा तर निसर्गाचा नियम आहे. यात विशेष वेगळं कोणतंच रॉकेट सायन्स नाही.

पण या तलावाचं एवढं साधारण वैशिष्ट्य नाही. हिवाळा जाऊन जसजसा बर्फ वितळायला सुरुवात होते तसतसे तलावातून हजारो मानवी सांगाडे पाण्यावर तरंगू लागतात. या तलावाचं चित्रच बदलून जातं, जिकडे नजर टाकावी तिकडे फक्त मानवी हाडं आणि सांगाडे नजरेस पडतात. इतक्या लोकांसोबत नक्की इथे काय झालं असा प्रश्न पडूच शकतो. त्याचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.

तलावातल्या घडणाऱ्या या गोष्टीबद्दल वेगवेगळे किस्से आहेत.

१९४२ साली लागला तलावाचा शोध

रुपकुंड तलाव (Roop Kund Lake) उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यात आहे. हिमालयातल्या एका छोट्याश्या घाटात असलेला हा तलाव १६४९९ फूट उंच हिमालयावर आहे. जवळपास २ मीटर खोल असलेल्या या तलावाला चारही बाजूंनी बर्फ आणि ग्लेशियरने वेढलेलं असल्याने पर्यटकांना या तलावाबद्दल विशेष आकर्षण वाटतं.

अडव्हेंचर्स ट्रेक करणाऱ्या पर्यटकांची इथे बऱ्यापैकी वरदळ असते. ट्रेक करत इथपर्यंत पोहोचलेले लोक तलावातले सांगाडे बघून आश्चर्यचकित होतात. सगळ्यात आधी १९४२ मध्ये नंदा देवी गेम रिजर्वचे रेंजर असलेल्या एच. के. माधवल यांनी हा तलाव शोधून काढला. नंतर नॅशनल जियोग्राफीच्या लोकांना जेव्हा ह्या तलावाबद्दल कळलं तेव्हा त्यांनीही त्यांची एक टीम इथे अभ्यासासाठी पाठवली होती. त्यांच्या टीमने इथे ३० नव्या सांगाड्यांचा आभ्यास केला. १९४२ पासुन आजपर्यंत झालेल्या संशोधनात आजपर्यंत इथे हजारो नवे सांगाडे सापडले आहेत. इथे स्त्री, पुरुष, वृद्ध, तरुण, लहान मुलं असे विविध सांगाडे सापडले आहेत. सांगाड्यांसोबतच इथे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, चामड्याच्या चपला, बांगड्या असे वेगवेगळे अवशेषहि सापडत असतात. या अवशेषांना संरक्षित करून सुरक्षित करून ठेवण्यात येतं.

जपानी सैनिक भटकले होते रस्ता ?

या तलावाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यापैकीच एक थेअरी जपानी सैनिकांबद्दल आहे. असं म्हणतात कि इथे सापडलेल्या मानवी खोपड्यांपैकी काही खोपड्या काश्मीरचे जनरल जोरावर सिंह आणि त्यांच्या माणसांच्या आहेत. १८४१ मध्ये तिबेट युद्धातून परतताना ते रस्ता भटकले आणि हवामान खराब असल्याने तिथेच अडकून त्यांचा मृत्यू झाला असं म्हटलं जातं.

जपानी सैनिकांबद्दलही एक कहाणी सांगितली जाते. भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असलेले जपानी सैनिक वादळामुळे इथेच अडकून मेले असं म्हटलं जातं पण संशोधनानंतर हे सांगाडे जपानी सैनिकांचे नसून शेकडो वर्षे जुने असल्याचं स्पष्ट झालं.

नंदादेवीचा शाप असल्याची आहे दंतकथा

इथल्या स्थानिकांमध्ये या तलावाबद्दल एक दंतकथा प्रसिद्ध आहे. त्यानुसार कनौजचा राजा जसधवल आपल्या गर्भवती राणी बलाम्पा सोबत हिमालयातली देवी नंदा देवीच्या तीर्थयात्रेला निघाला होता. दर १२ वर्षांनी भरणाऱ्या देवीच्या यात्रेला इथे अनन्यसाधारण महत्व आहे. हा राजा ढोल नगारे घेऊन मोठा दिखावा करत निघाला होता. या सगळ्याने देवी नाराज होते असा समज समाजात होता. सांगितलं जातं कि झालंही असंच. राजाच्या या यात्रे दरम्यान भयानक वादळ आलं. बर्फाच्या ह्या मोठ्या वादळापासून बचाव करण्यासाठी जवळपास काहीच साधन नसल्याने राजा, त्याची राणी आणि सोबत असलेला संपूर्ण जत्था या रुपकुंड तलावात बुडाला. जवळपास ३५ किलोमीटरपर्यंत काहीच बचावाचं साधन नसल्याने या सर्वांना जलसमाधी मिळाली अशी दंतकथा इथल्या स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहे.

वैज्ञानिकांनी काय शोधलं ?

तलावाबद्दल वेगवेगळे किस्से सांगितले जात असले तरीही वैज्ञानिकांनी यावर संशोधन केलंय. वैज्ञानिकांना इथे एकूण २०० मानवी सांगाडे सापडले आहेत. त्यांच्या मते हे सगळे सांगाडे ९व्या शतकातले असून भारतातल्या आदिवासींचे आहेत. संशोधनातून हेही सिद्ध झालंय की यापैकी कुणाचाही मृत्यू लढाईमध्ये झालेला नाही. वादळात बर्फाशी टक्कर होऊन ही लोकं मरण पावल्याचं वैज्ञानिकांनी सिद्ध केलंय.

आजही ऍडव्हेंचर्स ट्रेक करणारे पर्यटक या स्थळाला भेट देतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER