शास्रोक्त भोजन विधी म्हणजे काय ?

Food

जेवण कसे असावे, जेवणाचे नियम काय अनेक अलिखीत परंपरा आपल्या घरांमधून पूर्वापार पाळल्या जात आहेत. अगदी लहानपणापासून आपसूकच जेवणाचे संस्कार मनावर घडत जातात. त्यामुळे ते नियम आजकाल कमी पाळले जात असले तरी मनावर बिंबवल्या गेले आहेत. असे काही नसते. त्याने काही होत नाही असे म्हणणारी आजची पिढी. पण शास्त्र आधार आणि त्यामागचा विचार व हे का करायचे असे पटवून दिले की नक्कीच त्यांचे कुतुहल वाढते. एखादे वेळा माणूस कुठे अडकला त्रास झाला की मग त्यामागचे शास्त्र जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. आयुर्वेदात भोजन विधीचे वर्णन केले आहे ते वाचल्यावर लक्षात येईल की या संक्रमण काळात किंवा इतरवेळी सुद्धा हे भोजनाचे नियम स्वास्थ्य रक्षणार्थ निरोगी राहण्याकरीता योग्य पोषण मिळण्याकरीता किती आवश्यक आहे.

  • स्नान करून भूक लागल्यावर योग्य वेळेवर जेवण करणे – योग्य वेळ म्हणजे भूक लागल्यावर. भूक नाही लंच टाईम डिनर टाईम झाला तरी जेवणे म्हणजे अजीर्ण होण्याची शक्यता वाढते. विविध पाचन विकार, पोट जड पडणे अम्लपित्त अशा तक्रारी तयार होतात. स्नान केल्याने जाठराग्नि वृद्धींगत होते. शरीर स्वच्छ व प्रसन्न वाटते व शरीराचा दुर्गंध नाहीसा होतो. त्यामुळे जेवण्यात रस वाढतो.
  • ताजे सुपाच्य अन्न घेणे – याचे महत्त्व आहेच. आपल्या शरीराला पचेल एवढेच जेवणे. ताजे म्हणजे नुकतेच तयार केलेले. पुन्हा पुन्हा गरम केलेले नाही. पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक तत्त्व नष्ट होतात हे सिद्धच आहे.
  • सहा रसांनीयुक्त – मधुर अम्ल लवण कटू तिक्त कषाय हे रस त्रिदोषांना सम राखतात. फक्त गोड खाणे किंवा फक्त तिखट खाणे हे शरीराला घातकच. फक्त गोड जड पदार्थ जंत, मधुमेह लठ्ठपणा आणतात तर केवळ तिखटच खाणे अम्लपित्त, जळजळ, अल्सरसारखे व्याधी निर्माण करतात.
  • आहारात ६ रसांपैकी गोड रसाचे पदार्थ जास्त असावे. आपल्याला गोड पदार्थ म्हणजे पकवान किंवा मिठाई असेच लक्षात येते. परंतु असे नाही. भात पोळी तूप दूध हे सर्व मधुर रस प्रधानच आहे. डाळी सुद्धा मधुर कषाय रसाच्याच असतात. त्यामुळे स्वाभाविकरित्या हा नियम पाळल्या जातो.
  • हात पाय तोंड स्वच्छ धुवून पितृ, अतिथी, घरातील वृद्ध, पशु पक्षीना तृप्त करून जेवावे – आपल्या संस्कृतीत प्राण्यांना देखील तेवढेच महत्त्व दिले आहे. बाहेरुन आल्यावर हातपायतोंड स्वच्छ धुतल्याशिवाय घरात प्रवेश नसे आता या संक्रमण काळात त्याचे महत्त्व प्रत्येकाला पटलेच आहे. बऱ्याच घरात बाहेरची चप्पल बाहेरच काढण्याची पद्धत त्यामागचे कारण संक्रमक रोगांना प्रतिबंध घालणे हेच आहे.
  • ज्या भोजनात केस माशी कचरा असेल ते भोजन त्याज्य मानले आहे.
  • जास्त खारट, थंड, अति गरम पदार्थ घेऊ नये. – अति मीठाचा वापर नुकसानकारक आहे हे आधीच्या लेखात वाचले असेल. थंड झालेले अन्न निर्वीर्य असते तर अति गरम अन्नामुळे जीभ मुख भाजल्या जाते.
  • भोजनाची निंदा करू नये. जेवतांना मौन धारण करावे व इष्ट मित्र परीजनांसह जेवण करावे. – हे लहान मुलांना आपण शिकवितोच की अन्न हे पूर्णब्रह्म असते. अन्नाचा अपमान वा वाईट बोलू नये. कारण हे अन्न शरीराचे पोषण करत असते त्यामुळे प्रसन्न मनाने त्याचे ग्रहण करावे. मौन का, तर जेवतांना ठसका लागतो किंवा श्वासनलिकेत अन्नकण अडकू शकते तसेच अन्नावरील लक्ष विचलित होते. त्यामुळे जास्त किंवा कमी जेवण घेतल्या जाते.
  • शिळे अन्न, फ्रीजमधील ग्रेव्ही भिजविलेली कणिक हे सर्व शिळेच – हे का खाऊ नये तर त्याचे पोषक तत्त्व नष्टच होतात शिवाय अनेक रोगांना आमंत्रण आहे.
  • स्वच्छ जागेवर, शांततेत जेवण करावे. – या दोन्ही परिस्थितीचा अनुभव घेतल्यावर आपल्याला फरक जाणवतोच बरोबर ना !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER