आपल्या देशात हिरव्या ‘चांद – तारा’ची गरजच काय? – उद्धव ठाकरे

मुंबई : पाकिस्तानची ओळख सांगणाऱ्या अशा हिरव्या झेंड्यांना हिंदुस्थानच्या भूमीत स्थान असता कामा नये असे वक्तव्य शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या माध्यमातून त्यांचे कौतुक केले आहे. हिरव्या झेंड्यांना हिंदुस्थानच्या भूमीत स्थान असता कामा नये असे शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सांगतात तेव्हा त्यांची तळमळ समजून घेतली पाहिजे. या देशात ‘चांद–ताऱ्या’ची गरजच काय? मुसलमानांना बदनाम करणारा हा झेंडा आहे. त्याचा ना इस्लामशी संबंध ना आपल्या देशाशी. जामा मशिदीच्या इमामाने आतापर्यंत अनेक फतवे काढले. एक फतवा आता काढावा तो म्हणजे मुसलमानांनी हिरवा ‘चाँद–तारा’ फडकवू नये, पण हे घडेल काय? असा प्रश्न ठाकरे यांनी सामानातील अग्रलेखाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

आजचा सामना संपादकीय….

हिंदुस्थानातील मुसलमानांना हळूहळू जाग येत आहे. झोपलेल्याला जागे करता येईल, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करता येत नाही. म्हणूनच मुसलमान समाजात होत असलेल्या बदलाचे आम्ही कौतुक करीत आहोत. शिया वक्फ बोर्डाच्या चेअरमनने एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. ‘चाँद-तारा’वाला हिरवा झेंडा फडकवण्यावर कायद्याने बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांचे म्हणणे स्पष्ट आहे व असंख्य देशवासीयांच्या मनात तीच भावना आहे. ‘चाँद-तारा’ असलेले हिरवे झेंडे मुसलमानी वस्त्यांत फडकवले जातात. मशिदी, मदरसे यांवरही हिरवे झेंडे फडकवून लाहोर – कराचीछाप माहौल निर्माण केला जातो. मुख्य म्हणजे ‘चाँद-तारा’वाल्या हिरव्या झेंड्यांचा इस्लामशी काडीमात्र संबंध नाही. पाकिस्तानातील राजकीय पक्ष मुस्लिम लीगचा झेंडा नेमका हाच आहे. पाकिस्तानची ओळख सांगणाऱ्या अशा हिरव्या झेंड्यांना हिंदुस्थानच्या भूमीत स्थान असता कामा नये असे शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सांगतात तेव्हा त्यांची तळमळ समजून घेतली पाहिजे. हिरवा रंग हा काही मुसलमानांची मक्तेदारी नाही. हिरवा रंग डोळय़ांना सुखावणारा असा निसर्गाचा रंग आहे, पण धर्मांध व मूठभर पाकधार्जिण्या मुसलमानांमुळे हिरवा रंग बदनाम झाला तो कायमचाच.

‘हिरव्यांचा हैदोस’ किंवा ‘हिरवा दहशतवाद’ हे शब्द रूढ झाले व त्याची कारणे या ‘चाँद-तारा’ असलेल्या हिरव्या झेंड्यांतच आहेत. ‘चाँद-तारा’ असलेला हिरवा झेंडा सरळ सरळ पाकिस्तानमधील मुस्लिम लीगचे प्रतिनिधित्व करतो. याच मुस्लिम लीगने हिंदुस्थानच्या फाळणीसाठी लाखोंच्या कत्तली केल्या. हिंदुस्थानात राहिलेल्या मुसलमानांनी हा झेंडा आपल्या मोहल्ल्यांत, मशिदी, मदरशांवर फडकवून वेगळेपण दाखवणे यातच मुसलमानांनी मार खाल्ला व ते राष्ट्रीय प्रवाहातून दूर फेकले गेले ते कायमचे. मुळात मुसलमानांना त्यांचे अस्तित्व दाखविण्यासाठी वेगळय़ा ‘हिरव्या’ झेंड्याची गरजच काय? मुस्लिम लीग हा पक्ष आज केरळातील काही भागांत उरला आहे व काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी या मुस्लिम लीगशी निकाह लावला होता. खरं तर या पक्षावर स्वातंत्र्यानंतर तत्काळ बंदीच यायला हवी होती, पण मुस्लिम लांगूलचालनाची मजा घेत हिरवा ‘चाँद-तारा’ फडकू देण्यात आला. हा झेंडा मशिदींवर लागतो, त्या जागी तिरंगा फडकला तर मुसलमान समाजाविषयी विश्वास, प्रेम वाढीस लागेल. संभाजीनगरात पापी औरंग्याचे थडगे बांधले आहे. तिथेही हाच ‘चाँद-तारा’वाला हिरवा झेंडा फडकत आहे आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाला शिवरायांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून गाडले आहे, त्याच्या थडग्यावरही हिरवा ‘चाँद-तारा’ फडकत आहे.

जेव्हा जेव्हा धर्मांध मुसलमान हैदोस घालत रस्त्यावर उतरतात तेव्हा तेव्हा त्यांच्या हातात हाच हिरवा ‘चाँद-तारा’ फडकत असतो. त्यामुळेच या प्रवृत्तींवर ‘पाकड्यांची हिरवी अवलाद’ अशा धारदार शब्दांनी हल्ले केले जातात. हिरवा हैदोस मोजक्याच लोकांचा असला तरी त्यात त्यांची संपूर्ण कौम बदनाम होत आहे. मुसलमानांनी त्यांचे हिरवेपण सोडावे व गंगा-यमुनेच्या निर्मळ राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हावे. ‘चाँद-तारा’चा हिरवा झेंडा ही ओळख पुसून टाकण्यातच मुसलमानांचे हित आहे. या देशात ‘चांद-ताऱ्या’ची गरजच काय? मुसलमानांना बदनाम करणारा हा झेंडा आहे. त्याचा ना इस्लामशी संबंध ना आपल्या देशाशी. २०१५ साली श्रीनगरमध्ये हुर्रियत कॉन्फरन्स या फुटीरवादी संघटनेच्या नेत्यांनी असाच चाँद-तारा फडकवला होता. पोलिसांनी तेव्हा अनलॉफुल ऑक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट १९६७, सेक्शन १३ खाली गुन्हा नोंदवला होता. या कायद्याने पाच वर्षांची सजा दिली आहे. अशी सजा यापुढे हिरवा ‘चाँद-तारा’ फडकवणाऱ्यांना व्हावी अशी मागणी शिया वक्फ बोर्डाच्या चेअरमन महाशयांनी केली. आम्ही या भूमिकेचे स्वागत करतो. जामा मशिदीच्या इमामाने आतापर्यंत अनेक फतवे काढले. एक फतवा आता काढावा तो म्हणजे मुसलमानांनी हिरवा ‘चाँद-तारा’ फडकवू नये, पण हे घडेल काय? असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे.