नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव? सिडकोची मंजुरी

balasaheb Thackeray - International Airport - Maharashtra Today
balasaheb Thackeray - International Airport - Maharashtra Today

नवी मुंबई :- शिवसेनाप्रमुख (Shivsena) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावर सिडको संचालक मंडळाने शिक्कामोर्तब करून हा प्रस्ताव शिफारसीसह राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी २४ डिसेंबरला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना पत्र पाठवून सिडकोद्वारे उभारण्यात येणाऱ्या विमानतळाचे नामकरण ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. याशिवाय ४ जानेवारीला नगरविकास विभागाने सिडकोला पत्र पाठवून याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह तत्काळ सादर करण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने मंजूर केला आहे. नवी मुंबईतील विमानतळाच्या नामकरणाबाबत सिडकोने केलेल्या शिफारसीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मान्यतेसाठी आवश्यकता असल्यास पाठवला जाऊ शकतो.

देशासाठी भरीव योगदान देणाऱ्या नेत्यांची नावे भारतातील अनेक विमानतळांना देण्यात आली आहेत. याचाच आधार घेऊन शिंदे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत बाळासाहेब ठाकरे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन नवी मुंबईत निर्माण होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्याचा सरकारचा मानस असल्याचे नमूद केले आहे. देशभरात विविध राज्यांमधील विमानतळांचे नामकरण तेथील महान नेत्यांच्या नावाने करण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबईत उभारणी होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी नगर विकास विभागास पाठवण्यास सांगितले होते. हे विमानतळ उभारणाऱ्या ‘मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीनेही या प्रस्तावाला १ फेब्रुवारी रोजी अनुमती दिली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. मराठी माणसाला आत्मभान देण्याचे काम बाळासाहेबांनी केले. मराठी माणसाला उत्तुंग झेप घेता यावी, यासाठी त्याच्या पंखात बळ भरण्याचे काम बाळासाहेबांनी केले. त्यामुळे अशा उत्तुंग नेत्याचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे हा त्या वास्तूचा गौरव करण्यासारखे आहे. असे नामकरण करण्याबाबत राज्य शासनाच्यावतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे शिंदे यांनी निवेदनात म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button