…आणि दिप्तीला बाबांनी कडेवर उचलून घेतले

Dipti Lele

आयुष्यात सगळ्यात मोठं सुख म्हणजे काय असतं असा प्रश्न जर कुणी एखाद्या मुलीला विचारला तर हे उत्तर नक्कीच असेल की माझ्या बाबांनी मला कडेवर उचलून घेत मस्त गिरकी घेतली तो क्षण म्हणजे सुख. प्रत्येक मुलगी हा क्षण तिच्या लहानपणी अनुभवतेच. मुळातच मुलगी आणि बाबा हे नातं खूप घट्ट असतं आणि ते खरंही आहे. लेकीसाठी बाप नेहमीच हळवा असतो. मुलीच्या यशाने होणारा आनंद हा केवळ तिचा जन्मदाताच समजू शकतो. आणि मग जेव्हा अशा आनंदाच्या क्षणी वडील मुलीला उचलून कडेवर घेतात तेव्हा दोघंही वय विसरून तो क्षण साजरा करतात. अभिनेत्री दिप्ती लेलेला (Dipti Lele) जेव्हा तिचा अभिनय असलेले हरवलेल्या पत्त्यांचा बंगला हे नाटक पाहून आनंदीत झालेल्या तिच्या बाबांनी दिप्तीला उचलून कडेवर घेत गिरकी घेतली तेव्हा दिप्ती आणि तिच्या वडीलांमधील मायेचा धागा अजून घट्ट झाला.

आम्ही दोघं राजा राणी, लगोरी …मैत्री रिटर्न, ती फुलराणी या सारख्या मालिका, मी शिवाजी पार्क, होम स्वीट होम, मिस यू मिस्टर, सायकल यासारखे सिनेमे यातून दिप्ती लेलेचा अभिनय परिचयाचा झाला आहे. मालिका आणि सिनेमा केल्यानंतर तिची खूप इच्छा होती की कधीतरी एक व्यावसायिक नाटकही करावे. मुळात दिप्तीच्या कुटुंबात अभिनय क्षेत्रात कुणीच नाहीय. पण कॉलेजमध्ये असल्यापासून दिप्तीला  मात्र हे क्षेत्र खुणावत होते. पुण्याच्या हुजूरपागा शाळेत तिचे शालेय शिक्षण झालेय तर तिने आर्किटेक्ट म्हणून आपले उच्चशिक्षण पूर्ण केले आहे. दिप्तीने जेव्हा अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या घरातील कुणीही सदस्य या क्षेत्रात नसल्याने पुढे काय होईल असा विचार तिच्या आईने केला, पण दिप्तीला तिच्या वडीलांनी खूप साथ दिली. त्यांच्या सपोर्टमुळे दिप्ती या क्षेत्रात आली आणि कामातून काम मिळवत टिकून राहिली.

ही बातमी पण वाचा : लाडाची ताई 

माझिया माहेरा या मालिकेतील सुमन या भूमिकेपासून दिप्तीचा या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला असला तरी तिला खरी ओळख मिळाली ती लगोरी…मैत्री रिटर्न या मालिकेतील ऋतुजा या व्यक्तिरेखेतून. पाच मैत्रिणींच्या भावविश्वावर बेतलेल्या या मालिकेत एका श्रीमंत नवऱ्याची संवेदनशील बायको ही भूमिका करत असताना केवळ पैसा आहे म्हणून कसेही वागणाऱ्या नवऱ्यांच्या बायकांची कशी मानसिक घालमेल होत असते हे दिप्तीने तिच्या अभिनयातून दाखवून दिले होते. ती फुलराणी या मालिकेतील दिप्तीच्या नकारात्मक भूमिकेचीही फार चर्चा झाली आणि ती घराघरात पोहोचली.

दरम्यान रंगभूमीवर काम करण्याच्या इच्छेला तिने मुरड घातली नव्हती. सायकल या सिनेमात तिचा रेट्रो लूकही भाव खाऊन गेला. या सिनेमाच्या निमित्ताने चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी तिचा संपर्क झाला आणि त्यांच्या नव्या नाटकात काम करण्याची संधी मिळताच तिने या संधीचे सोनं करायचे ठरवले, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकात दिप्तीची वर्णी लागली. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणीकर यासारख्या अभिनेत्रीसोबत काम करताना दिप्तीलाही तिच्या अभिनयाचा कस लावावा लागला. या नाटकाला झी नाट्यगौरवमध्ये यंदाचे नॉमिनेशन मिळाले आहे. आयुष्यातील पहिलेच व्यावसायिक नाटक, सोबत वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर यांच्यासारख्या कलाकार, चंद्रकांत कुलकर्णी यांचे दिग्दर्शन आणि पदार्पणासाठी नॉमिनेशन अशा एकाहून एक गुडन्यूज दिप्तीला मिळाल्या आणि ती खूप खुश आहे. अभिनय क्षेत्रातील कामासाठी सल्ला देणारं कुटुंबात कुणीच नसताना गेल्या दहा वर्षात दिप्तीने गाठलेला हा पल्ला नक्कीच कौतुकास्पद आहे.

लेकीचं पहीलं वहिलं नाटक बघायला तिचे आईबाबा येणार नाहीत असं होणारच नाही. हरवलेल्या पत्त्यांचा बंगला हे नाटक तिच्या आईबाबांनी पाहिलं आणि नाटक संपल्यावर तिच्या बाबांनी तिला उचलून थेट कडेवर घेतलं. तिच्या अभिनयाचं, धाडसाचं कौतुक केलं. दिप्ती सांगते, आपल्या कामासाठी समाजातून, चाहत्यांमधून प्रेम मिळणं जितकं आवश्यक असतं तितकच आपल्या कुटुंबाची आपल्याला साथ असणंही गरजेचं असतं. बाबांनी मला उचलून कडेवर घेत माझ्या अभिनयाला जी दाद दिली आहे ती माझ्यासाठी खूप मोलाची आहे. मी वयाने, यशाने भविष्यात कितीही मोठी झाले तरी बाबांसाठी मला नेहमी लहानच रहायला आवडेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER