सुएझ कालव्यात जहाज अडकल्याने भारताच्या व्यापारावर काय परिणाम?

Suez Canal Blocked

नवी दिल्ली : इजिप्तमधील सुएझ कालव्यात (Suez Canal) एक महाकाय जहाज अडकल्याने युरोप आणि आशियातील व्यापार ठप्प झाला आहे. या मार्गावरील समुद्री वाहतूक करणारे शेकडो जहाजांची रांगच लागली आहे. यामुळे दररोज ७,५०० कोटी रुपयांच्या व्यापाराचं नुकसान होतं आहे. याचा थेट परिणाम भारतावरही होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच भारतानेही यावर ४ सुत्री उपाययोजना केली आहे.

व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने आपल्या अधिकृत वक्तव्यांत म्हटलं, सुएझ कालव्यातील अडथळ्यांमुळे जागतिक व्यापारावर गंभीर परिणाम होत आहे. या बैठकीचं नेतृत्व विशेष सचिव (लॉजिस्टिक) पवन अग्रवाल यांनी केलं. त्यांच्यासोबत बैठकीत पोर्ट , शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय, एडीजी शिपिंग, कंटेनर शिपिंग लायसन्स असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनही सहभागी होती.

सुएझ कालव्याची वाहतूक ठप्प झाल्याने आतापर्यंत उत्तर आणि दक्षिण भागात एकूण 200 पेक्षा अधिक जहाजं रांगेत उभी आहेत. यात दररोज 60 जहाजांची भर पडत आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस हा कालवा बंद राहिला तर रांगेत उभ्या असलेल्या जहाजांची संख्या 350 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी संपायला आणखी एक आठवड्याचा वेळ लागण्याची शक्यता आहे.

भारताकडून कोणत्या उपाययोजना?

कार्गोच्या प्राधान्यानुसार फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन, MPEDA आणि APEDA संयुक्तपणे खराब होणाऱ्या कार्गोंची ओळख पटवतील आणि त्यांच्यासाठी शिपिंग लाईनसोबत काम करतील. या संकटाच्या काळात किमतीत वाढ न करता दर स्थिर ठेवावेत असं आवाहन शिपिंग लाईनला करण्यात आलंय. बंदरं आणि जलमार्ग मंत्रालयाने या बंदरांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

आशिया, पश्चिम आशिया आणि युरोपला जोडणारा सर्वात व्यस्त जलमार्ग म्हणून सुएझ कालवा परिचित आहे. सुएझ कालव्यातून जागातिक व्यापाराच्या जवळपास १२ टक्के मालाची वाहतूक होते. या अभूतपूर्व वाहतूक कोंडीने शेकडो मालवाहू जहाजे सुएझ कालव्यात फसली आहेत. त्यामुळे मालाच्या वाहतुकीसाठी जहाजांची कमतरता भासण्याची शक्यता आहे. तसेच नजिकच्या काळात मालभाडे देखील वाढण्याची शक्यता ऑलकार्गो लॉजिस्टिकचे व्यवस्थापकीय संचालक आदर्श हेगडे यांनी व्यक्त केली. मालवाहू जहाजांना तब्बल ६००० मैल अतिरिक्त अंतर कापावे लागणार असून यासाठी जवळपास ३००००० डॉलर्सचा जादा खर्च इंधनासाठी करावा लागणार आहे.

जगातील महत्त्वाचा जलमार्ग असल्याने जागतिक व्यापारावर परिणाम होण्याचा धोका बळावला आहे. सध्याच्या सुएझ कालव्यातील ट्रॅफिक जाम’मध्ये द्राक्षांप्रमाणेच कांद्याच्या ५० कंटेनरचा खोळंबा झाला आहे. त्यात नाशिकहून निघालेल्या लंडनच्या दोन, इटलीच्या एक आणि हॉलंडच्या ४ कंटेनरचा समावेश आहे. मुळातच, ट्रॅफिक जाम’मुळे युरोपसाठी निघालेले एका आठवड्याचे ९०० कंटेनर पोचणार नाहीत. मात्र वाहतूक सुरळीत झाल्यावर एकदम दोन आठवड्याचे द्राक्षांचे १ हजार ८०० कंटेनर पोचणार असल्याने निर्यातदारांमध्ये भावाबद्दलची धाकधूक वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER