जाणून घ्या ‘मुंबईच जिंकणार’ हे सांगता येण्याचे चिन्ह कोणते?

Mumbai Indians

*पहिले फलंदाजी करत 200+ धावा तर यश ‘हमखास’
* पाठलागात मात्र दोनशे धावा करुन अपयशच
* दिल्लीवर 200+ चा पाचवा विजय
* पंजाबला देऊ शकलेले नाहीत 200+आव्हान
* यंदा तीन सामन्यात दोनशेच्यावर मजल

आयपीएल च्या (IPL) इतिहासात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians). पहिल्या डावात दोनशे किंवा अधिक धावा केल्या आणि सामना गमावला असे घडलेले नाही. याच्या अगदी उलट पाठलाग करताना जेवढ्यांदा त्यांनी (एकूण तीन वेळा) दोनशे धावांचा टप्पा ओलांडला त्या प्रत्येक वेळी ते अपयशी ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर आयपीएल 2020 मध्ये गुरुवारी दिल्ली कॕपिटल्सविरुध्द (Delhi Capitals) त्यांनी 5 बाद 200 धावसंख्या उभारली तेंव्हाच त्यांच्या विजयाचे संकेत मिळाले होते.

दोनशेपेक्षा अधिक धावांचे आव्हान दिल्यावर दिल्लीवरच त्यांचा हा पाचवा विजय होता. मुंबईने आयपीएलमध्ये 11 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दोनशे किंवा अधिक धावा केल्या आहेत. त्यात सर्वाधिक पाच विजय दिल्लीविरुध्द, दोन बंगलोरविरुध्द आणि राजस्थान, कोलकाता, हैदराबाद व चेन्नईविरुध्द प्रत्येकी एक विजय आहे. केवळ किंग्ज ईलेव्हन पंजाबविरुध्दच ते एकदासुध्दा प्रथम फलंदाजी करताना दोनशे धावा करू शकलेले नाहीत.

मुंबईने किंग्ज इलेव्हनविरुध्द एकदाच दोनशेपेक्षा अधिक धावा केल्या होत्या पण त्या पाठलागात होत्या. 2017 मध्ये तब्बल 6 बाद, 223 पर्यंत मजल मारली होती पण तरीसुध्दा त्यांनी तो सामना गमावला होता. मुंबईने दोनशेपेक्षा अधिक धावा करुनही पाठलागात गमावलेल्या तिन्ही सामन्यांपैकी हा एक सामना होता. याशिवाय 2008 मध्ये चेन्नईविरुध्दच्या त्यांच्या 7 बाद 202 धावा व यंदाच बंगलोरविरुध्द केलेल्या 5 बाद, 201 धावा हा त्यांचा अपयशी पाठलाग ठरला होता. बंगलोरविरुध्दचा हा सामना तर टाय झाला होता आणि सुपर ओव्हरमध्ये मुंबईने गमावला होता.

आयपीएलमध्ये मुंबईने एकूण 14 वेळा दोनशे धावांचा टप्पा ओलांडला त्यात यंदा सर्वाधिक तीन वेळा त्यांनी ही द्विशतकी धावसंख्या उभारली आहे. याशिवाय 2010, 2015, 17 व 2018 मध्ये प्रत्येकी दोन वेळा ते दोनशेच्यावर पोहोचले होते.

मुंबईने पहिल्या डावात 200+ धावा करुन मिळवलेले 100 टक्के यश असे…

7/218 – वि. दिल्ली – 2010
6/ 213 – वि. बंगलोर- 2018
6/ 212 – वि. राजस्थान- 2010
3/ 212 – वि. दिल्ली – 2017
6/ 210 – वि. कोलकाता – 2018
5/ 209 – वि. दिल्ली – 2013
7/ 209 – वि. बंगलोर – 2015
5/ 208 – वि. हैदराबाद – 2020
4/ 206 – वि. दिल्ली – 2016
5/ 202 – वि. चेन्नई – 2015
5/200- वि. दिल्ली- 2020

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER