काय आहे सोनिया गांधींची ठाकरे सरकारबद्दल नाराजी

Sonia Gandhi - Uddhav Thackeray

मुंबई : काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खरमरीत पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. दलित, आदिवासींच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना त्यांनी किमान समान कार्यक्रमाची आठवण ठाकरे यांना करून दिली आहे. या समाजाच्या कल्याणासाठीचे कार्यक्रम आणि धोरणे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) आले तेव्हा जो किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता त्यात या बाबींचा समावेश होता याची आठवण सोनिया गांधी यांनी करून दिली आहे.

महाराष्ट्रतील दलित, आदिवासींच्या कल्याणासाठी काही सूचना आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे आपण हे पत्र लिहित असल्याचे सोनियाजींनी नमूद केले आहे. अनुसूचित जाती, जमातींसाठी लोकसंख्येच्या अनुपातात निधीची तरतूद झालीच पाहिजे असा आग्रह त्यांनी या पत्रात धरला आहे. त्याचा दुसरा अर्थ महाविकास आघाडी सरकारमध्ये अनुसूचित जाती, जमातींसाठीचा निधी अन्यत्र वळविला जात असल्याच्या तक्रारी महाराष्ट्रातून सोनियाजींकडे करण्यात आल्या होत्या असा घेतला जात आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे कारण देत वित्त विभागाने महिन्यांपूर्वी आदेश काढून प्रत्येक विभागाने केवळ ३३ टक्केच निधी खर्च करावा असे आदेश काढले होते. त्यामुळे काँग्रेसकडे असलेल्या महिला व बालकल्याण, आदिवासी विकास या महत्त्वाच्या विभागांना त्याचा फटका बसला. तसेच सामाजिक न्याय हे खाते राष्ट्रवादीकडे असले तरी अनुसूचित जातीचा मतदार हा मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या पाठीशी उभा राहत आला आहे. त्यामुळे सोनियाजींनी अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी पुरेसा निधी दिला जात नसल्याबद्दल एकप्रकारे या पत्रात नाराजी व्यक्त केली असल्याचे म्हटले जाते. मंजूर झालेला निधी त्या आर्थिक वर्षातच वापरला जावा अशी सूचना सोनिया गांधी यांनी केली आहे. अनुसूचित जाती, जमातींच्या व्यावसायिकांच्या फर्म, संस्थांना शासकीय कंत्राट देण्यात आरक्षण असावे. केंद्रातील युपीए सरकारने आधी तसे केलेले होते. तसेच, कर्नाटकमध्ये काँग्रेस नेतृत्वातील पूर्वीच्या सरकारनेही केलेले होते याकडे सोनिया गांधी यांनी लक्ष वेधले आहे. अनुसूचित जाती, जमातीच्या कर्मचाºयांचा शासकीय नोकºयांमधील अनुशेष कालबद्ध पद्धतीने भरून काढावा असेही सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

या पत्राचा अर्थ असा घेतला जात आहे की अनुसूचित जाती, जमातींच्या कल्याणासाठी असलेली तरतूद, त्यातून प्रत्यक्ष होणारा खर्च आणि अखर्चित वा लॅप्स होणारी रक्कम या बाबत पारदर्शक धोरण महाविकास आघाडी सरकारने अवलंबावे अशी अपेक्षा सोनिया गांधी यांंनी या पत्रात व्यक्त केली आहे.

अनुसूचित जाती आणि जमाती ही काँग्रेसची महाराष्ट्रातील मोठी व्होट बँक राहिली आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादी (NCP), भाजप (BJP), वंचित बहुजन आघाडीने (VBA) काँग्रेसची ही हक्काची व्होटबँक फोडली. काँग्रेसची ही व्होटबँक स्वत:कडे वळविण्याचा जोरदार प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस गेली काही वर्षे करीत आहे. या पार्श्वभूमीवर, दोन्ही समाजाच्या प्रश्नांची काँग्रेसला आजही तितकीच कणव असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न सोनिया गांधी यांच्या पत्राच्या माध्यमातून झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER