क्रिकेटमध्ये ‘रिटायर्ड आऊट’ ही नेमकी काय भानगड आहे?

Mahila Jaiwardhane & Marvan Atapatu

क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे किती प्रकार आहेत? कोणताही क्रिकेटचा जाणकार याचे उत्तर ‘१० प्रकार आहेत’ असेच देईल.

१) झेलबाद
२) त्रिफळाबाद
३) पायचित
४) यष्टिचित
५) धावबाद
६) हिट विकेट
७) हँडल दी बॉल
८) आब्स्ट्रॅकटिंग दि फिल्ड
९) टाईम आऊट
१०) हिट दि बॉल ट्वाईस

मात्र फलंदाज बाद होण्याचे केवळ हे दहाच प्रकार नाहीत तर आणखी दोन आहेत.त्यापैकी पहिला आहे मांकडिंग आणि रिटायर्ड आऊट (रिटायर्ड हर्ट नाही).यापैकी मांकडिंगचे प्रकार अधूनमधून घडत असतात; पण रिटायर्ड आऊट मात्र दुर्मिळच. अगदी क्वचित. एवढा क्वचित की कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत फक्त दोनदाच फलंदाज असे बाद झाले आहेत.

काय आहे ही रिटायर्ड आऊट भानगड? तर त्याचे असे आहे की, दुखापत झाल्यास किंवा तब्येत बिघडल्यास
फलंदाज रिटायर हर्ट होऊ शकतो आणि नंतर पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो; पण कोणत्याही कारणास्तव त्या फलंदाजाने त्या डावात पुन्हा फलंदाजी करायची नाही, असे ठरवले तर ते तसे करू शकतात. या प्रकाराला रिटायर्ड आऊट म्हणतात.

तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त दोन फलंदाजांनी हा रिटायर्ड आऊटचा पर्याय निवडला आहे आणि विशेष म्हणजे एकाच डावात या दोघांनी तो निर्णय घेतला. श्रीलंकेचे मार्व्हन अट्टापटू व महेला जयवर्धने हे ते दोन फलंदाज आहेत.

सप्टेंबर २००१ मध्ये आशियाई कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा त्यांचा बांगलादेशविरुद्धचा तो सामना होता. त्या सामन्यात बांगलादेशला फक्त ९० धावांत गुंडाळल्यावर श्रीलंकेने ५ बाद ५५५ धावसंख्येवर आपला डाव घोषित केला होता. खरं म्हणजे या डावात श्रीलंकेचे फक्त तीनच फलंदाज बाद झाले होते आणि इतर फलंदाजांनाही संधी मिळावी म्हणून सलामीवीर मार्व्हन अट्टापटू द्विशतक साजरे होताच २०१ धावांवर आणि महेला जयवर्धने १५० धावांवर रिटायर्ड आउट परतले होते.

याच प्रकारे वेस्ट इंडिजच्या गार्डन ग्रिनिजनेसुद्धा एकदा आपल्या गंभीर आजारी मुलीसाठी १५४ धावांवर खेळत असताना फलंदाजी अर्धवट सोडली होती (विरुद्ध भारत, अँटिग्वा, १९८३). तो पुन्हा फलंदाजीला आला नव्हता म्हणजे तो रिटायर्ड आऊट होता; पण सर्वसंमतीने त्याचे डाव सोडण्याचे कारण बघता त्याची नोंद मात्र रिटायर्ड नॉट आऊट अशी करण्यात आली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER