पवारांच्या मनात काय? जयंत पाटील आजपासून महाराष्ट्र पिंजून काढणार

Sharad Pawar - Jayant Patil

मुंबई :- ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षवाढीसाठी मोठी रणनीती आखली आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष सध्या एकत्रितपणे निवडणुका लढत असले तरी आपला पक्ष सर्वात मोठा असावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी महत्त्वाचे अभियान हाती घेतले आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे. शरद पवार यांचे विचार मनामनात रुजवण्यासाठी हा दौरा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

शरद पवार यांच्या आदेशानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे आजपासून ‘राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. याबाबतची घोषणा आधीच करण्यात आली होती. गुरुवारी गडचिरोली जिल्हयातील अहेरी येथून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून पक्षातील इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सलग १८ दिवस ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी जयंत पाटील संवाद साधणार आहेत.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या १८ दिवसांमध्ये विदर्भ व खान्देशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या १३५ बैठका व १० जाहीर सभा होणार आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार असे १४ जिल्हे पायाखाली घालत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेणार आहेत, शिवाय पक्ष वाढवण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे. तसेच जलसंपदा विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबतही या दौऱ्यात बैठका घेतल्या जातील व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याचा हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित महाराष्ट्रात दौरा केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार संवाद हा त्या भागातील पक्षाची सद्यस्थिती, स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह, त्यांना पक्ष संघटना वाढविण्यासाठी येणारी वेगवेगळी आव्हाने या गोष्टींचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे. या दौऱ्यात पक्षाचे नेते खासदार प्रफुल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रविकांत वर्पे, सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे सहभागी होणार आहेत.

ही बातमी पण वाचा : मंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER