मंगळसूत्रात असं आहे तरी काय ?

सेलिब्रिटींची प्रत्येक गोष्ट खास असते हे वारंवार पटणाऱ्या गोष्टी सेलिब्रिटीच्या वर्तुळात घडत असतात. त्या गोष्टी अर्थातच सोशल मीडिया पेजवरून चाहत्यांपर्यंत पोहचत असतात. गेल्या काही दिवसांत सेलिब्रेटी वर्तुळातील लगीन घाई आणि लग्नाचे बार चांगलेच उडायला लागले आहेत. आता लग्नानंतरच्या काही खास गोष्टींकडेही सेलिब्रिटींच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेलं असणारच. लग्नानंतरचे लूक अभिनेत्री त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सध्या गाजत असलेला लूक आहे तो अभिनेत्री अभिज्ञा भावे (Actress Abhidnya Bhave) हिचा. म्हणजे तिचा नवीन हेअर कट किंवा नवा ड्रेस नाही तर तिच्या गळ्यातील मंगळसूत्राची सध्या जोरदार चर्चा ऑनलाईन जगतात सुरू आहे. या अभिनेत्रीने तिच्या गळ्यात खास मेहुल आणि तिच्या नावाच्या आद्याक्षराचे मंगळसूत्र बनवून घेतले आहे. अभिज्ञाच्या गळ्यातलं हे हटके मंगळसूत्र सध्या फॅशन फंडा बनला आहे.

अनेक मालिकांमध्ये नायक आणि नायिका यांच्यामध्ये खो घालणारी एक तिसरी व्यक्ती हमखास बघायला मिळते. बहुतांशी वेळा अशाच भूमिका करत चाहत्यांचे प्रेम मिळवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे डिसेंबरमध्ये तिच्या मित्राशी मेहुल पै याच्याशी विवाहबद्ध झाली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले होते. तिच्या हळदीपासून ते पाठवणीपर्यंतच्या साड्या, स्टाईल यांना तिच्या  चाहत्या वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला.

अर्थातच अभिनेत्री मैत्रीण तेजस्विनी पंडित हिच्यासोबत अभिज्ञा ही एक फॅशन ब्रँड चालवते ज्याचं नाव तेजाज्ञा असं आहे. या ब्रँडच्या अनेक साड्या आणि ड्रेस फॅशनच्या दुनियेत अनेकींना मोहित करत आहेत. त्यामुळेच अभिज्ञाचा लग्नातला लूक काय असेल याची उत्सुकता प्रत्येकालाच होती. आणि खरोखरच लग्नाच्या सगळ्या सोहळ्यांमध्ये अभिज्ञाने नेसलेल्या साड्या आणि तिचे दागिने यांची खूप चर्चा झाली. लग्नानंतरही मेहुल आणि अभिज्ञा यांचे फिरायला गेलेल्या भटकंतीचे फोटो सतत चाहत्यांसमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून येत होते. मध्यंतरी ही जोडी कोकणात फिरायला गेली होती आणि समुद्रकिनाऱ्यावरचे भन्नाट फोटोशूट तिने शेअर केले होते.

आता लग्न झाले… हनिमून झाला, त्यानंतरही अभिज्ञाची चर्चा सुरू आहे ती तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रामुळे. अभिज्ञाचा क्लोजअप फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्या फोटोमध्ये अभिज्ञाने खूप छान मंगळसूत्र घातले आहे. ज्याच्या लॉकेटच्या जागी ए आणि एम अशा दोन अक्षरांसोबत काळे मणी गुंफलेले आहेत. अर्थातच ए म्हणजे अभिज्ञा आणि एम म्हणजे मेहुल हे तिच्या चाहत्यांच्या लक्षात आलं आहेच; पण दोघांच्या नावाचे अक्षर मंगळसूत्रामध्ये गुंफण्याचा अभिज्ञाच्या अनोख्या कल्पनेला तिच्या चाहत्यांनी प्रचंड दाद दिली आहे.

अभिज्ञा सांगते की, मला नेहमी असं वाटायचं की, मंगळसूत्र हा फक्त दागिना नाही तर त्यासोबत वेगळ्या भावना जोडलेल्या असतात आणि आमच्या दोघांचे नाव मंगळसूत्रामध्ये कुठे तरी प्रतिबिंबित व्हावं अशी माझी इच्छा होती. आणि म्हणूनच मी आमच्या दोघांच्या नावाच्या अक्षरात मंगळसूत्र बनवून घेतलं.

मालिकांमधल्या नायिकांच्या मंगळसूत्राच्या डिझाईन लोकप्रिय होत असतात. यापूर्वी ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील जान्हवी या व्यक्तिरेखेच्या गळ्यातील तीन पदरी मंगळसूत्रदेखील तुफान लोकप्रिय झालं होतं. त्यानंतर ‘फुलपाखरू’ या मालिकेची नायिका वैदेहीच्या गळ्यातील काळ्या मण्यांसोबत वेलफुल असलेले मंगळसूत्र महिला वर्गामध्ये इन फॅक्टर होतं. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेचे हर्षदा खानविलकरनी घातलेलं काळ्या पोतमधील लांबसडक मंगळसूत्रदेखील या मालिकेची ओळख बनली होती. या झाल्या मालिकेतील ऑनस्क्रीन गोष्टी. अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात तिने तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या नावाचे बनवून घेतलेले हे मंगळसूत्र हा सध्या तरी कमाल चर्चेचा विषय बनला आहे. अनेक महिला प्रेक्षकांनी कमेंट करून अभिज्ञाच्या या अफलातून कल्पनेला दाद देत आम्हीदेखील असेच मंगळसूत्र बनवून घेऊ, असे सांगितल्यामुळे अभिज्ञादेखील भलतीच खूश झाली आहे.

ही बातमी पण वाचा : रूपलने मारली यशोमानला टांग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER