प्रसिद्ध कृष्णमुळे का आठवला नोएल ‘हू’ डेव्हिड?

Prasiddha Krishna

प्रसिद्ध कृष्ण (Prasiddha Krishna) ह्याचे नाव प्रसिद्ध असले तरी आता तो खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झालाय. वन डे इंटरनॅशनलच्या पदार्पणातच चार बळी मिळवणारा तो पहिलाच भारतीय पुरुष ठरलाय. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याचे ५४ धावांत चार बळी ही कामगिरी भारतीय गोलंदाजाची वन डे पदार्पणातील सर्वोत्तम कामगिरी आहे.

महिलांमध्ये पौर्णिमा चौधरी (Purnima Chaudhari) हिने अशी कामगिरी केलेली आहे. १९९७ मध्ये पदार्पणात विंडीजविरुद्ध तिने चार बळी मिळवले होते; पण पुरुषांमध्ये वन डे इंटरनॅशनलच्या पदार्पणातच चार बळी मिळवणारा प्रसिद्ध हा पहिलाच भारतीय. या कामगिरीसह त्याने प्रसिद्ध कृष्ण हा भारतीय संघासाठी ‘एक्स’ फॅक्टर ठरू शकतो हा कर्णधार विराट कोहलीने यापूर्वीच व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवला आहे.

पदार्पणात भारतीय गोलंदाजांची सर्वोत्तम कामगिरी
कसोटी – नरेंद्र हिरवाणी- ८/६१ वि. वेस्ट इंडिज १९८८
वन डे – प्रसिद्ध कृष्ण- ४/५४ वि. इंग्लंड २०२१
टी-२० – बरिंदर सरण- ४/१० वि. झिम्बाब्वे २०१६

प्रसिद्ध कृष्णच्या या कामगिरीतील विशेष गोष्ट म्हणजे त्याच्या पहिल्या दोन्ही विकेट बदली क्षेत्ररक्षकाने घेतलेल्या झेलवर मिळाल्या. बेन स्टोक्सचा झेल शुभमन गील याने घेतला तर जेसन राॕयचा झेल सूर्यकुमार यादवने घेतला. या प्रकारे आपल्या पहिल्या दोन विकेट बदली क्षेत्ररक्षकाकडून मिळवणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. प्रसिद्धच्या आधी भारतीय पुरुषांत पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी हैदराबादचा ऑफस्पिनर नोएल डेव्हिडच्या (Noel David) नावावर होती. नोएलने १९९७ मध्ये विंडीजविरुद्ध पदार्पणात पोर्ट ऑफ स्पेन येथे २१ धावांत तीन बळी मिळवले होते. असे वन डे इंटरनॅशनल पदार्पणात तीन बळी मिळवणारे आणखी १५ गोलंदाज आहेत.

नोएल डेव्हिडच्या पदार्पणाचा किस्साही मोठा मनोरंजक आहे. १९९७ च्या त्या विंडीज दौऱ्यासाठीच्या मूळ संघात तो नव्हताच; पण दुखापत झाल्याने जवगल श्रीनाथला परतावे लागले आणि जलद गोलंदाजाच्या जागी हा ऑफ स्पिनर गेला आणि त्याने पदार्पणातील भारतातर्फे आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवली होती. नोएलबद्दल आणखी एक किस्सा आहे तो असा की, श्रीनाथच्या जागी नोएल येणार असे समजले तेव्हा सचिन तेंडुलकरने कोण नोएल? (Noel who?) अशी विचारणा केल्याचे प्रसिद्ध आहे; पण पुढे नोएल डेव्हिडनेच स्पष्ट केलंय की तसे सचिन तेंडुलकर म्हणाला नव्हता तर अजित वाडेकर म्हणाले होते; पण त्यामुळे हा खेळाडू नोएल ‘हू’ डेव्हिड या नावाने प्रसिद्ध झाला आहे. प्रसिद्ध कृष्णच्या विक्रमाने नोएल ‘हू’ डेव्हिडबद्दलच्या या आठवणींना उजाळा मिळाला.

वन डे पदार्पणात भारतातर्फे सर्वोत्तम कामगिरी
४/५४- प्रसिद्ध कृष्ण वि. इंग्लंड- २०२१
३/२१- नोएल डेव्हिड वि. वेस्ट इंडिज- १९९७
३/२४ – वरुण आरोन वि. इंग्लंड- २०११
३/३०- सुब्रतो बॅनर्जी वि. वेस्ट इंडिज – १९९१
३/३१- हार्दिक पांड्या वि. न्यूझीलंड- २०१६

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER