पुस्तकी शिक्षण म्हणजे अध्ययन ?

book learning

आजकाल मुलांच्या अभ्यासाबाबत पालक फार जास्त जागृत झालेले आहे. मुले अभ्यास करत नाही ही तक्रार सतत ऐकू येत असते. मूल एका जागी बसत नाहीत, पुस्तकातले वाचत नाहीत, त्यांच एकाग्रचित्त होत नाही, लक्षात राहत नाही. आणि त्यामुळे भरपूर मार्क्स मिळवण्यासाठी कायम पालक आणि मुलं यांच्यामध्ये एक खडाजंगी होत राहते. “कुठेही लक्ष न देता एका जागी बसून अभ्यास कर!” असा अट्टहास पालकांचा दिसतो.

म्हणूनच वाटायला लागलं की, आपण नेमकं अभ्यास किंवा अध्ययन म्हणजे काय? त्याचा नेमका कसा अर्थ आपण घ्यायला हवा? त्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? याची चर्चा व्हायला हवी. खरतर अध्ययन म्हणजे मानवी वर्तनातील आणि माणसाच्या जीवनातली एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. म्हणजे अध्ययन म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे तर अध्ययन म्हणजे फक्त चार भिंतीच्या आतील किंवा वर्गातील औपचारिक शिक्षण नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंडितपणे मानवाचे शिकणे ही प्रक्रिया सुरू असते आणि म्हणूनच आपण जीवनातल्या व्यापक घटकांना आत्मसात करणे असा सर्वसमावेशक अर्थ या शब्दापासून खरंतर घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण जे काही करतो ते, जे काही विचार करतो ते सगळे, याशिवाय वापरतो ती भाषा, आपल्या रूढी-परंपरा, रितीरिवाज, वृत्ती, श्रद्धा, उद्दिष्ट, मूल्य आपले काही व्यक्तित्व गुण हे सगळंच काही व्यक्तींना शिकूनच मिळवावे लागतात.

तुम्ही नुकत्याच शिकलेल्या काही गोष्टी जर आठवायचा प्रयत्न केला, अर्थात औपचारीक शिक्षणाव्यतिरिक्त तर अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला आठवायला लागतात. मी एका यूट्यूब वरून दोन चार जर्मन वाक्य शिकले, मटार करंजीची रेसिपी शिकले, ते करताना पिठात मोहन किती घालायचे त्याचे टेक्निक म्हणजे पिठाची मुठ वळेपर्यंत हेही माझ्या लक्षात आलं. काल मी पहिल्यांदा माझे म्हणणे मोकळ्या मनाने बोलू शकले चार जणांमध्ये. अशा कितीतरी लहान लहान गोष्टी आपण शिकत असतो. म्हणजे सध्यापुरते नाही, केवळ परीक्षा देण्यापूर्ते नाही, तर ते आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे हे आपल्या लक्षात आले असेल. अनेक मानसशास्त्रज्ञांनी अतिशय सुंदर अशा त्याच्या काही व्याख्या केल्या आहेत. यावरून अध्ययनाचे स्वरूप आणखीनच स्पष्ट होत जाते. मन (Munn) याच्या मते,”अनुभव आणि त्यातून होणारे वर्तन यांच्यात होणारी सुधारणा म्हणजे अध्ययन होय. तर वूड वर्थं यांनी मांडलेली व्याख्या अशी की” मनुष्याचा कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी आणि त्याचा अनुभव आणि परिस्थितीचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी कोणतीही क्रिया म्हणजे अध्ययन.” थोडक्यात काय तर मानवी वर्तनात अध्ययनामुळे बदल घडून येतात. अगदी पील या शास्त्रज्ञांच्या मते तर “व्यक्ती आपल्या स्वतःच्या वातावरणातील बदलानुसार स्वतःच्या वर्तणुकीची मध्ये बदल घडवून आणते ती अध्ययनामुळेच ! “असंही म्हटलं आहे.

म्हणजेच फ्रेंडस ! व्यक्ती ला आपल्या सध्या परिस्थितीशी जुळवून घेणं किंवा समायोजन करण ऍडजेस्ट करण हे अध्ययनाने शक्य होतं असंही आपण म्हणू शकतो.

एकूणच आपल्या सगळ्या वागणुकीतील बदल घडवून आणण्यासाठी अध्ययनाची मदत होते आणि त्यासाठीच नेमकं अध्ययन म्हणजे काय हे समजून घेणे हेही महत्त्वाचं ठरतं.

ही बातमी पण वाचा : मनाच्या श्लोकातील मानसशास्त्र

मानसशास्त्रीय दृष्ट्या अध्ययनाचा सर्व बाजूंनी विचार करून त्याची वैशिष्ट्ये विचारात घेतली तर आपल्याला असं दिसून येतं की अध्ययनाने वर्तनात बदल घडून येतो. मग ते बदल चांगले किंवा वाईट दोन्ही प्रकारचे असू शकतात. विशेष म्हणजे अध्ययन आणि होणारे बदल हे तुलनात्मक दृष्ट्या अधिक टिकाऊ आणि कायम स्वरूपाचे असतात. म्हणजेच तात्पुरत्या बदलांना अध्ययन म्हणताच येणार नाही.

आता हेच बघा आठवीचा अभ्यास पूर्ण करून विद्यार्थी पुढे नववीला जातात परीक्षेत मार्कस तर चांगले मिळालेले असतात. परंतु तरीही बरेचदा पुढचा अभ्यास करताना जेव्हा मागच्या काही गोष्टी आठवाव्या लागतात किंवा येतात असं गृहीत धरले जाते, त्यावेळी ते काहीच जमत नाही. म्हणजे त्याचं खरं खरं अध्ययन झालेलं नसतं. कारण तो तेव्हा परीक्षेपुरता केलेला अभ्यास असतो. पालक म्हणतात म्हणून वह्यापुस्तक समोर ठेवून केलेला अभ्यास .उलट व्यक्तीच्या वर्तनातील बदल जर पूर्वानुभव किंवा सरावामुळे निर्माण झाले असतील तरच त्या बदलांना अध्ययन प्राप्त म्हणता येईल. उदाहरणार्थ सायकल चालवणं ,पोहणं या गोष्टी एकदा शिकलेल्या विसरल्या जात नाहीत. अध्ययनात सराव, प्रयत्न आणि पूर्वानुभव यांनाही खूप महत्त्व आहे. परंतु मॅच्युरिटी आणि डेव्हलपमेंट यामुळे घडून येणारे बदल हे अध्ययनाचा भाग समजले जात नाही. वागण्यातील हे बदल सुधारणात्मक असतात .याबाबतीत मुल सायकल शिकते तोच अनुभव घेऊ या. सर्वप्रथम ते घाबरते, दुसऱ्याच्या मदतीने सायकलवर बसते, कालांतराने ते एक हात सोडून बसते ,पुन्हा कधीकधी दोन्ही हात सोडून सायकल चालवणे पर्यंत ही त्याची मजल जाते , पुढे तर मित्राला डबलसीट नेऊ शकते. दोन वेगवेगळ्या घटना किंवा परिस्थिती यामध्ये परस्पर संबंध प्रस्थापित करणे हा एक अध्यायानाचाच महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे त्यात कार्यकारण संबंध असतो. जसे की घंटा होताच तास संपतो किंवा वडिलांनी रागाने बघितल्यास मुले गप्प बसतात.

कुठलीही गोष्ट शिकतांना काही प्रकारे ती शिकली जाते. म्हणजेच लर्निंग किंवा अध्ययनाचे काही प्रकारही आहेत. अनेक मानसशास्त्रज्ञांनी अनेकानेक प्रयोग करून शिकण्याची प्रक्रिया कशी कशी होते हे शोधून काढले.

त्यापैकी एक म्हणजे चूकत माफत केलेले अध्ययन ! (ट्रायल अँड एरर मेथड) जसं की कुठल्याही पदार्थांचा पाक बनवणे हे सर्व सामान्यपणे कौशल्याचे काम गृहिणींना वाटते. म्हणजे त्यात बराच फरक असतो. गुलाबजामचा पाक आणि पाकातले चिरोटे यांचा पाक वेगळा, तर लाडवांना लागणारा पाक वेगळा, वड्यांना लागणारा वेगळा, तर तिळाची, दाण्याची चिक्की बनवताना लागणारा पाक आणखीनच वेगळा. मग नवीन गृहिणी हळूहळू हे पाक प्रकरण शिकायला लागते. मग त्यात खूप गमती जमती होतात. कधीकधी लाडू दगडा सारखे फोडावे लागतात, तर कधीकधी लाडू वळले जात नाही ,ताटात ऐसपैस पसरून बसतात. मग अशी नवगृहिणी “चुकतमाकत”सुंदर लाडू वड्या करू लागते आणि सुगरण बनते. हे तिचे अध्ययनच की हो ! तिला मिळणारी शाबासकी ही पुढच्या अध्ययनासाठीची प्रेरणा ठरते.

परंतु अशा प्रकारचा अध्ययन घडून येण्यासाठी आपली मानसिक आणि शारीरिक तयारी मात्र असावी लागते. मुळात जर आपली इच्छाच नसेल तर आपण एवढ्या हालचाली करणारच नाही. म्हणतात ना “we can take the horse to the water,but how we can make him drink the water? मानवामध्ये एखादी क्रिया शिकण्यासाठी आवश्यक ती मानसिक व शारीरिक पूर्वतयारी असावी लागते. सज्जतेमध्ये बुद्धिमत्ता ,अभिवृत्ती ,अभिरुची ,कल ,आवड, जिज्ञासा तसेच कुतूहल यासारख्या अनेक घटकांचा समावेश होतो. अध्ययनाची प्रेरणा सबळ नसेल तर अपेक्षित वर्तनही घडून येणारच नाही.

याबाबतीत उदाहरण म्हणजे अतिशय अनुकूल परिस्थिती असूनही बरेच विद्यार्थी काहीही शिकण्या बाबत उदासीन असतात, काही विद्यार्थी मात्र अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही त्याच्याशी झुंज देत विविध प्रकारची कौशल्य हस्तगत करतात.

अध्ययन घडून येण्यासाठी आणखीन एक गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यामधील जोडणार्‍या आठवणी किंवा येणारे अनुभव जर सुख देणारे असे, हवेहवेसे वाटणारे असतील तर सहाजिकच त्या प्रतिक्रिया लक्षात ठेवून तीन तीच कृती किंवा त्याच प्रतिक्रिया परत परत दिल्या जातात, परंतु हेच जर अनुकूल नसतील तर एकतर त्याच्याकडे दुर्लक्ष केला जातो किंवा तो प्रसंग टाळल्या जातो. या अध्यायाना बाबतच्या नियमांचा वापर प्रेरणा देण्यासाठी करता येतो. म्हणजेच शिक्षा आणि परितोषिक यांच्या या वापरातून हाच परिणाम साधला जातो. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी जरा चांगला पेपर लिहिला असेल तर टीचर्स ते वर्गामध्ये वाचून दाखवतात. पेपर तपासून मिळण्याची परिस्थिती आणि शिक्षकांनी सगळ्यांसमोर केलेले कौतुक ही अनुकूल प्रतिक्रिया. त्यामुळे पुढेही पेपर्स चांगले सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. प्रॅक्टिस मेक्स ए मन परफेक्ट. एखादी क्रिया वारंवार केली असता पुढे ती अत्यंत बिनचूकपणे करता येऊ लागते, आपण त्यात तरबेज होतो. कुठलीही गोष्ट करताना सुरुवातीला उशीर लागतो ,नंतर एकदा आपल्याला त्या गोष्टीच टेक्निक कळलं की आपण ती कृती आपोआपच लवकर करू लागतो.

म्हणूनच गणिताचा ही सराव करावा लागतो सारख्या प्रकारची अनेक उदाहरणे सोडवून बघावे लागतात. कविता पाठ करणे, पाढे पाठ करणे, एखादे वाद्य वाजवणे यासाठी सरावाचीच गरज असते. तुम्ही एखाद्या बाळाला रांगत पायरी चढताना बघितले असेल. सुरुवातीला त्याला खूप आटापिटा करावा लागतो. ते बाळ परत परत तीच क्रिया करते. आणि मग एक वेळ अशी येते की त्याला पटकन पहिली चढता येऊ लागते. सराव ह्या अध्ययनाच्या तंत्राचा च हा भाग आहे.

अध्ययना संबंधी अजूनही बरेच काही संशोधन झाली आणि होत आहेत. त्यांच्या मदतीने आपण अध्ययना संबंधी आणखीन काही जाणून घेऊ या उद्याच्या लेखात !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER