झालंय तरी काय अजितदादांना…

Ajit Pawar

Shailendra Paranjapeराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एखादं काम होण्यासारखं नसेल तर अरे बाबा मंत्रालयात खेटे घालू नको, गावाकडे परत जा, असं कार्यकर्त्याला स्पष्टपणे सांगून त्याची बोळवण करणारे आणि अप्रिय बोलणारे नेते म्हणूनही ते ओळखले जातात. पण हल्ली काय झालंय कोणास ठाऊक, पब्लिक मेमरी इज शॉर्ट, या इंग्रजी वचनावर त्यांचा विश्वास असावा, असं त्यांच्या अलीकडच्या विधानांवरून दिसून येतंय.

गेल्या आठवड्यात राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आझाद मैदानावर गेलेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मिळाली नाही. तेव्हा पवार सिनियरमोस्ट म्हणजे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल महोदयांबद्दल बोलताना `…त्यांना कंगना रानौतला भेटायला वेळ आहे पण शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही,’ अशा शब्दात टीका केली होती. पवारसाहेबांच्या या टीकेनंतर अजित पवार यांनी मात्र राज्यपाल महोदयांवर आपण टीका करणार नाही, असं म्हटल्याचं वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालं होतं.

या गोष्टींना एक आठवडा होतो ना होतो, तो अजित पवार यांनी राज्यपाल महोदयांबद्दलचा संताप व्यक्त केलाय. विधान परिषदेवर करावयाच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या संदर्भात राज्यपाल महोदयांनी अंत बघू नये, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केलीय. हल्ली काय झालंय तेच कळत नाही. पवार सिनियर धनंजय मुंडेंबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोप गंभीर आहेत, असं आधी म्हणतात आणि नंतर या प्रकरणात आणखी काही माहिती पुढे आलेली असल्याने मुंडे यांचा राजीनामा घेण्ची गरज नाही, असं सांगून टाकतात, तेव्हाही आश्चर्य वाटले होते. कारण माहिती न घेता किंवा अर्धवट माहितीवर शरद पवार बोललेत, असं पूर्वी व्हायचं नाही. तीच गोष्ट अजित पवार यांच्याबद्दलची. आठ दिवसात विसंगत विधानं अजित पवार यांच्याकडून कधी ऐकली नव्हती.

अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना कानपिचक्या दिल्याचंही वृत्त प्रसारित झालं आहे. पिंपरीमधे पालकमंत्री अजित पवार यांच्याच हस्ते ८ जानेवारीला स्मार्ट वॉच घालण्याचा कार्यक्रम झाला होती पण आयुक्तांसह कोणीच ती हातात घालताना दिसत नाहीयेत, असे निरीक्षण पवार यांनी काल परवा नोंदवलेय. पोलिसांनी मनावर घेतले तर काहीही होऊ शकते. सर्व अवैध धंदे बंद होऊ शकतात आणि गुन्हेगारीचाही बीमोड होऊ शकतो. त्यादृष्टीने पोलिसांना मोकळीक द्यायला हवी, अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केलीय. वास्तविक, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिलह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याच पक्षाचे अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत. असं असूनही पोलिसांना मोकळीक दिली जायला पाहिजे, ही अजित पवार यांनी व्यक्त केलेली अपेक्षा नेमकी कोणाकडून आहे, हे काही समजून येत नाही.

अवैध धंदे बंद होऊ शकतात आणि गुन्हेगारीचा बीमोडही होऊ शकतो, हे एकीकडे पवार सांगत असतानाच पुण्यामधल्या प्रमुख गुन्हेगारी टोळ्यांमधले अनेक गुंड गेल्या काही दिवसात तुरुंगांबाहेर आलेत आणि मोकळा श्वास घेऊ लागलेत, अशा बातम्या आल्यात. आता पालकमंत्री पोलिसांना मोकळीक द्यायची भाषा करताहेत आणि प्रत्यक्षात मात्र गुन्हेगार मोकळा श्वास घेताहेत, हे चित्र असेल तर अजितदादांची सडेतोड बोलणारा नेता ही प्रतिमा नक्कीच राहणार नाही. कथनी आणि करणीमध्ये अंतर, हे राजकारण्यांबद्दल नेहमी अनुभवाला येत असले तरी अजित पवार वेगळे आहेत, अशी चर्चा केली जात असे. पण आता अजितदादाही बोलणे एक आणि करणे दुसरेच, अशा मार्गाने जाऊ लागलेत की काय, असं वाटू लागलेय.
पोलिसांना स्मार्ट वॉच दिली आहेत, स्मार्ट सायकलीही दिल्या जाताहेत. आता खरी गरज आहे ती राज्याला स्मार्ट राजकारण्यांची. ती पूर्ण झाली तर आपसूकच कथनी आणि करणी यात तफावत राहणार नाही. कारण ये पब्लिक है, ये सब जानती है…

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

शैलेन्द्र परांजपे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER