जे महाराष्ट्रात घडले, ते प. बंगालात घडत आहे, तोडफोड करुन विजयासाठी प्रयत्न सुरू – शिवसेना

CM Thackeray-Narendra Modi

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने भाषण करण्यास नकार दिला. यावरुन शिवसेनेने (Shiv Sena) सामना संपादकीयच्या माध्यातून भाजपावर (BJP) निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यलढय़ात प. बंगाल, पंजाब व महाराष्ट्राचे नेतृत्व पुढे होते. आजही तीनही राज्ये स्वाभिमानासाठी लढत आहेत व केंद्र सरकार या तीनही राज्यांच्या विरोधात उभे ठाकले आहे. पंजाबच्या शेतकऱयांना दिल्लीच्या सीमेवर ठेचले जात आहे. प. बंगालात धुमशान सुरू आहे. महाराष्ट्रावर ठरवून हल्ले केले जात आहेत. जे महाराष्ट्रात घडले, तेच प. बंगालात घडताना दिसत आहे. स्वतःचे काहीच नाही. ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून आपली फौज तयार करायची व जितं मय्याचा गजर करायचा. बिहारलाही तेच झाले. आता प. बंगालातही तृणमूल फोडून तृणमूलवर विजय मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. चालू द्या!, अशी खोचक टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.

आजचा सामान संपादकीय…

पश्चिम बंगालातील राजकारण दिवसेंदिवस रोचक आणि रोमांचक होताना दिसत आहे, पण रोमांचक वाटणारे बंगालचे राजकारण शेवटी रक्तरंजित वळणावर पोहोचते हा आतापर्यंतचा इतिहास आहे. हिंदुत्वाच्या मुद्दय़ांवर ठरवून ठिणगी टाकायची, हे भाजपने ठरवलेले आहे. तसे नसते तर कोलकात्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमात वादार्चीं ठिणगी पडली नसती. शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ममता बोलायला उभ्या राहिल्या, तेव्हा ‘जय श्रीराम’चे नारे गर्दीने दिले. ममता बॅनर्जी यावर चिडल्या व हा आपला अपमान असल्याचे त्यांनी माईकवरूनच सांगितले. ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ बंगाल भाजपने ओळखला आहे व निवडणुका होईपर्यंत ते अशा नाजूक विषयांवर मर्मभेद करीत राहतील. ‘जय श्रीराम’च्या नाऱयांवर ममता चिडू नयेत, या मताचे आम्ही आहोत. उलट त्यांच्या सुरात सूर मिसळला असता तर डाव समोरच्यांवरच उलटला असता, पण प्रत्येक जण आपल्या व्होट बँकेचीच पखाली वाहत असतो. प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव करायचाच, प. बंगालवर भाजपचा विजयध्वज फडकवायचाच या जिद्दीने भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व बंगालच्या मैदानात उतरले आहे. स्वतः गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा व इतर अनेक नेत्यांचा बंगालातील राबता वाढला आहे. टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदीही काल कोलकात्यात येऊन गेले. निवडणुकांत कोणीतरी जिंकेल व कोणीतरी हरणारच आहे. हिंदुस्थानी लोकशाही ‘ट्रम्प छाप’ नाही. काैल हा स्वीकारावाच लागतो. पण काैल आपल्या बाजूने वळावा, यासाठी जे अघोरी प्रयोग आपल्या लोकशाहीत केले जातात ते असह्य ठरतात.

उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणेच प. बंगालात भाजपने धार्मिक फाळणी सुरू केली आहे. त्यास काही प्रमाणात ममता बॅनर्जी जबाबदार आहेत. कमालीचा सेक्युलरवाद व टोकाचे मुस्लिम लांगूलचालन याचा वीट बहुसंख्य हिंदूंना येतच असतो. प. बंगालात लोकसभा निवडणुकीआधी दुर्गापूजा व विसर्जनावरून भाजपने तद्दन त्यांनी खोटा प्रचार केला व ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असूनही त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचत नव्हता. भाजपचे प्रचाराचे गुप्त मिशन असते. ममता व इतरांचे सगळे खुल्लमखुल्ला असते. लोकसभेत भाजपला 18 जागा जिंकता आल्या. ही बाब ममतादीदींसाठी चिंतेची आहे. पण शेवटी ही बंगालची वाघीण रस्त्यावर लढा देणारी आहे व ती लढत राहील. भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांनी हिंसाचार व दहशतवाद माजविण्याची भाषा बंगालात सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची भाषणे, निवेदने यात वापरली जाणारी भाषा लोकशाहीस शोभणारी नाही. ममता बॅनर्जी यांना रॉयटर्स इमारतीसमोर जाळू इतकेच बोलायचे आज बाकी राहिले आहे. प. बंगालात बॉम्बचे कारखाने आहेत व त्यांना ममता सरकारचा पाठिंबा आहे, असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून कोलकात्यात येऊन सांगितले गेले. मग जसे ईडी वगेरेंकडून राज्याराज्यांत जाऊन विरोधकांवर छापे मारले जातात तसे छापे केंद्रीय सुरक्षा पथकाने बंगालातील बॉम्बच्या कारखान्यांवर का मारले नाहीत, हा प्रश्नच आहे. शेवटी राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणतीच तडजोड करता कामा नये. बॉम्बचे कारखाने नक्की कुठे आहेत व त्यावर केंद्राने नक्की काय कारवाई केली, त्याचा जाब खासदारांनी संसदेत विचारायला हवा.

प. बंगालचे महामहिम राज्यपाल जगदीश धनकर यांची ख्याती काय वर्णावी! महाराष्ट्राच्या राजभवनात भाजपप्रेमापायी जे सुरू आहे, तेच अधिक प्रखरतेने कोलकात्याच्या राजभवनात सुरू आहे. प. बंगालात अल कायदाचे जाळे वेगाने पसरत असल्याचा आरोप राज्यपाल जगदीश धनकर यांनी जाहीरपणे केला. ममता बॅनर्जी यांचे सरकार आणि प्रशासन काय करीत आहे, अशी राजकीय चिंता त्यांनी व्यक्त केली. राज्यपालांचे काम हे गृहखात्यात अहवाल पाठवण्याइतकेच आहे. प. बंगालात अल कायदाचे जाळे वाढले आहे, याबाबतचा तपशील राज्यपालांनी कोणत्या माध्यमातून गोळा केला? एखादी खासगी यंत्रणा नेमून अल कायदाबाबत माहिती गोळा केली असेल तर त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याशी त्याबाबत चर्चा करायला हवी. तसे न करता राज्यपाल ही माहिती प्रसिद्धीमाध्यमांना देतात व लोकांत भय निर्माण करतात, हे मन साफ असल्याचे लक्षण नाही. भय, दहशत, तिरस्कार निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार घटनात्मक संस्थांचा वापर करीत असेल तर ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीवर हसण्याचा अधिकार आपल्याला नाही. रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजा राममोहन राय अशा महान विभूतींनी बंगालात जन्म घेतला. फाळणीचे घाव पंजाबप्रमाणे बंगालनेही सोसले आहेत. महाराष्ट्राप्रमाणे प. बंगालला स्वातंत्र्य चळवळ, क्रांती, सामाजिक सुधारणांची परंपरा आहे. लाल, बाल, पाल हे त्रिशूळ स्वातंत्र्य चळवळीत होतेच. स्वातंत्र्यलढय़ात प. बंगाल, पंजाब व महाराष्ट्राचे नेतृत्व पुढे होते. आजही तीनही राज्ये स्वाभिमानासाठी लढत आहेत व केंद्र सरकार या तीनही राज्यांच्या विरोधात उभे ठाकले आहे. पंजाबच्या शेतकऱयांना दिल्लीच्या सीमेवर ठेचले जात आहे. प. बंगालात धुमशान सुरू आहे. महाराष्ट्रावर ठरवून हल्ले केले जात आहेत. पण सध्या सर्वात जास्त हालचाली बंगालात घडत आहेत. तृणमूल काँग्रेस फोडून भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे. ममता कॅबिनेटमधील वनमंत्री रजीब बॅनर्जी यांनी राजीनामा दिला आहे. त्याआधी आणखी दोन प्रमुख मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेस फोडायची, खिळखिळी करायची व तृणमूलचेच आमदार फोडून त्यांना भाजपची उमेदवारी द्यायची. 2014 साली महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक तालुका, जिह्यात याच पद्धतीने फोडून भाजपने त्यांना उमेदवाऱया दिल्या. त्यातले बरेच लोक निवडून आले. अशा तऱहेने भाजपने आपला आकडा फुगवला. जे महाराष्ट्रात घडले, तेच प. बंगालात घडताना दिसत आहे. स्वतःचे काहीच नाही. ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून आपली फौज तयार करायची व जितं मय्याचा गजर करायचा. महाराष्ट्रातील भाजपची सूज त्याच पद्धतीची आहे. बिहारलाही तेच झाले. आता प. बंगालातही तृणमूल फोडून तृणमूलवर विजय मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. चालू द्या!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER