फवाद आलमच्या शतकाने केलाय कोणता असाधारण विक्रम?

Fawad Alam

13 जुलै 2009 ते 30 डिसेंबर, 2020, या दरम्यानचा कालावधी होतो 11 वर्ष 5 महिने आणि 16 दिवस. दुसऱ्या भाषेत सांगायचे तर तब्बल 4218 दिवस. एवढ्या दिवसात भरपूर काही घडून जाते. क्रिकेटपुरते बोलायचे तर कित्येकांची कारकिर्दसुध्दा संपून जाते. पण पाकिस्तानच्या फवाद आलमची (Fawad Alam, Pakistan) गोष्टच वेगळी आहे.

या गड्याने जुलै 2009 मध्ये कसोटी पदार्पण साजरे केले आणि पदार्पणातच शतक (Test Hundred) झळकावले. कोलंबो कसोटीत श्रीलंकेविरुध्द दुसऱ्या डावात त्याने 168 धावा केल्या. 2009 मध्ये तो आणखी दोन कसोटी सामने खेळला पण नोव्हेंबर 2009 पासून आॕगस्ट 2020 पर्यंत तो पाकिस्तानी संघाबाहेरच होता आणि आता तब्बल 11 वर्ष 5 महिने 16 दिवसानंतर त्याने पुन्हा कसोटी शतक झळकावले आहे. न्यूझीलंडविरुध्दच्या माउंट मोंगानुई कसोटीत त्याने दुसऱ्या डावात 102 धावांची खेळी केली. याप्रकारे तब्बल 4218 दिवसानंतर कसोटी शतक झळकावण्याचा विक्रम त्याने केला.

मात्र एवढ्या दिवसानंतर शतक झळकावूनही फवाद आलम तिसऱ्या स्थानी आहे. दोन कसोटी शतकांत सर्वाधिक अंतर आॕस्ट्रैलियाच्या वाॕरेन बार्डस्ली (Warren Bardsley) यांच्या नावावर आहे. त्यांनी जुलै 1912 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्द लाॕर्डस् कसोटीत 164 धावांची खेळी केली होती आणि त्यानंतर 13 वर्ष 11 महिन्यांनी (5093 दिवस) त्यांनी लाॕर्डस मैदानावरच जून 1926 मध्ये नाबाद 193 धावांची खेळी केली होती.

भारताच्या सैयद मुश्ताक अली (Syed Mushtaq Ali) यांनीसुध्दा दोन शतकांदरम्यान फवाद आलमपेक्षा अधिक अवधी म्हणजे 4544 दिवस घेतले आहेत. त्यांनी जुलै 1936 मध्ये इंग्लंडविरुध्दच्या मँचेस्टर कसोटीत 112 धावांची खेळी केली आणि त्यानंतरचे त्यांचे दुसरे कसोटी शतक आले ते थेट दुसऱ्या महायुध्दानंतर…4 जानेवारी 1949 रोजी त्यांनी वेस्ट इंडिजविरुध्द कोलकाता कसोटीत त्यांनी दुसऱ्या डावात 106 धावा केल्या. जवळपास साडेबारा वर्षानंतर मुश्ताक अलींच्या नावावर शतक लागले आणि आता फवाद आलमने 11 वर्ष 5 महिने आणि 16 दिवसानंतर शतक लावले आहे.

इंग्लंडच्या फ्रँक वूली यांच्या दोन शतकात 3999 दिवसांचे अंतर होते. त्यांनी फेब्रुवारी 1912 नंतर फेब्रुवारी फेब्रुवारी 1923 मध्ये शतक झळकावले होते तर श्रीलंकेच्या उपूल थरंगा याने 3888 दिवसानंतर शतक केले होते. मार्च 2006 नंतर आॕक्टोबर 2016 मध्यै तो तीन आकडी धावसंख्या नोंदविण्यात यशस्वी ठरला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER