मोदींना आज मुख्यमंत्री ठाकरे नेमके मागणार तरी काय?

Maharashtra Today

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray)उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)हे मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांची भेट घेणार आहेत. हे तिघे पंतप्रधानांना काय मागतात आणि पंतप्रधान काय देतात या बाबत उत्सुकता आहे. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवू शकले नाही आणि ते रद्द झाल्याबद्दल टीका होत असताना आता मोदी यांना या आरक्षणासाठी साकडे घालून आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलण्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांचा प्रयत्न असेल.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा कायदा झाला होता. उच्च न्यायालयाने त्यावर निकालाद्वारे शिक्कामोर्तब केले होते. प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयात गेले आणि तेथे मराठा आरक्षण (Maratha Resrvation)रद्दबातल ठरले. आता १६ जूनपासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा आंदोलन छेडण्यात येईल अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. मराठा आरक्षणावरून राज्य सरकारची पुरती कोंडी झाली आहे. आधीच्या सरकारने दिलेले आरक्षण हे सरकार टिकवून ठेवू शकलेले नाही या आरोपातून स्वत:ची सुटका करवून घेण्यासाठी केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलणे हा एक पर्याय आता राज्य सरकारसमोर आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर पुनर्विचार याचिका राज्य शासन दाखल करणार आहे. या निकालावर राज्य शासनाने काय भूमिाक घ्यावी यासाठी शासनाने नेमलेल्या न्या.दिलीप भोसले समितीनेदेखील पुनर्विचार याचिकेची शिफारस केली आहे. उद्याच्या भेटीत मुख्यमंत्री ठाकरे हे पंतप्रधानांकडे अशी मागणी करण्याची शक्यता आहे की मराठा आरक्षणाचा कायदा केंद्र सरकारने करावा. या मागणीद्वारे स्वत:चा बचाव करण्याची त्यांची भूमिका असू शकते.

कोरोनाची लस सर्वांना मोफत देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना केली. तसेच कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका बसलेल्या देशातील कोट्यवधी गोरगरिबांना नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशन देण्याची घोषणा करून त्यांनी मोठाच दिलासा दिला आहे. त्यामुळे या दोन मुद्यांवर ठाकरे यांना बोलण्याची जागा राहिलेली नाही. कोकणातील तौक्ते चक्रीवादळग्रस्तांसाठी केंद्र सरकारने भरीव अर्थसहाय्य करावे अशी मागणी अर्थातच राहील. सोबत अजित पवार असल्याने राज्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीचे चित्र ते मांडतील आणि कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्राला मदतीचे पॅकेज मागतील अशी शक्यता आहे.

पंतप्रधानांकडे नेमक्या कोणत्या मागण्या करायच्या या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button