रणजी स्पर्धा रद्द होण्याचे नेमके काय होतील परिणाम?

BCCI - Ranji Trophy

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोरानाच्या काळात खेळाडूंची सुरक्षा व आरोग्याचा मुद्दा डोळ्यासमोर ठेऊन यंदा रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर क्रिकेट जगतातून अनुकूल- प्रतिकुल मते येत असली तरी बहुमत ही तब्बल ३८ संघांची आणि चार-चार, पाच-पाच दिवस सामने चालणारी स्पर्धा आयोजित करणे धोक्याचेच होते या बाजूने आहे. मात्र कोरोनाची साथ जोरात असताना आयपीएलचे आयोजन होऊ शकते, त्यासाठी अगदी परदेशात आपण जातो, सैयद मुश्ताक अली स्पर्धेचेही सामने होत आहेत आणि विजय हजारे ट्रॉफीचेही सामने होणार आहेत मग रणजी सामने का होऊ नयेत, त्यासाठी इतर पर्यांयाचा विचार का केला नाही असा प्रश्नही काही जणांनी उपस्थित केला आहे. नॉक आऊट पध्दतीने किंवा वेगळ्या स्वरुपात ही स्पर्धा घेता आली असती असे काही जणांना वाटते.

असे अनुकूल प्रतिकुल मतप्रवाह असले तरी या निर्णयाचा होतकरू खेळाडूंना मोठा फटका बसणार आहे. एकतर त्यांची संधी हिरावली जाणार आहे शिवाय उत्पन्नही बुडणार आहे. साधारणपणे जो खेळाडू राज्य संघात नियमीत असतो आणि ज्याला आयपीएलचा काँट्रॅक्ट मिळू शकतो, त्याला रणजी, हजारे ट्रॉफी, मुश्ताक अली ट्रॉफी व दुलीप ट्रॉफी अशा फुल सिझनमधून हंगामाकाठी १५ ते २० लाखांची कमाई होत असते. यंदा मात्र रणजी सामने होणार नसल्याने ही कमाई निम्म्यावर येणार आहे.

त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या कराराचे दरवाजे होतकरु खेळाडूंसाठी रणजी स्पर्धेच्या मार्गातून उघडत असतात. दरवर्षी साधारणपणे ८०० होतकरु खेळाडूंसाठी हा एक मार्ग असतो. त्यांच्यासाठी २०२१ च्या आयपीएलसाठी हा मार्गच बंद झाला आहे. गेल्यावर्षी १२५ खेळाडूंना आयपीएलचे काँट्रॅक्ट मिळाले होते आणि त्यातील किमान रक्कम ३० लाखांची होती.

खेळाडूंना रणजी सामन्यासाठी प्रती सामना एक लाख ४० हजार रुपये, विजय हजारे ट्रॉफी सामन्यासाठी ३५ हजार रुपये आणि मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यासाठी १७ हजार ५०० रुपये मिळतात. ही आकडेवारी पाहता रणजी सामने होणार नसल्याने खेळाडूंचे किती नुकसान होणार आहे हे स्पष्ट आहे. आता एकून २० लाखसुध्दा मिळणार नाहीत अशी स्थिती आहे. शिवाय आयपीएल २०२१ साठी लिलाव १८ फेब्रुवारीला होणार आहेत पण रणजी सामनेच झालेले नसल्याने होतकरु खेळाडूंसाठी त्यांची गुणवत्ता दाखवण्याची संधीच मिळालेली नाही. दुसरा फरक हा पडणार आहे की जवळपास १८ महिने खेळाडू प्रथम श्रेणी सामनेच खेळलेले नसतील. केवळ मर्यादीत षटकांचे सामने खेळतील. एकूणच खेळाडूंच्या तयारीसाठी आणि भारतीय क्रिकेटसाठीसुध्दा ही बाब घातक ठरणार आहे. शिवाय राष्ट्रीय निवडकत्यार्नाही प्रथम श्रेणी व कसोटी संघासाठी नवे चेहरेच विचार करण्यासाठी नसतील. भारतीय क्रिकेटपटू संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनीसुद्धा रणजी सामने आयोजित करणे धोक्याचेच होते हे मान्य केले असले तरी खेळाडूंना भरपाई मिळेल अशी काही व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER