“मोठा पक्ष म्हणजे नक्की काय?”, शिवसेनेचा पुन्हा काँग्रेसला खोचक सवाल

Uddhav Thackeray - Sharad Pawar - Sonia Gandhi

मुंबई : पुरोगामी लोकशाही आघाडी अर्थात युपीएच्या अध्यक्षपदावरून राज्यात शिवसेना (Shiv Sena)-काँग्रेसमध्ये (Congress) जुंपल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे युपीए (UPA) अध्यक्षपदाची सुत्रं द्यावी, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. शिवसेनेच्या या विधानावर काँग्रेसकडूनही उत्तर देण्यात आलं. काँग्रेसनं दिलेल्या उत्तरावरून आता शिवसेनेनं काँग्रेस नेत्यांनाच सवाल केला आहे. “काँग्रेस आजमितीस नक्कीच मोठा पक्ष आहे. पण मोठा म्हणजे नक्की काय आकारमानाचा?, असा सवाल करत शिवसेनेनं आजच्या सामानातून काँग्रेसला परत एकदा डिवचलं आहे.

काँग्रेसकडून देण्यात आलेल्या उत्तरानंतर शिवसेनेनं काँग्रेसला सल्ला देत टोलाही लगावला आहे. सामना अग्रलेखातून शिवसेनेनं काँग्रेस व काँग्रेस नेतृत्वाविषयी भाष्य केलं आहे. “पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे यूपीए अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे, पण ते व्हायचे कसे? विरोधकांच्या ऐक्यावर सध्या राष्ट्रीय मंथन सुरू झाले आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा वादाचा मुद्दा नाही. यूपीए भक्कम करावी व भाजपासमोर आव्हान उभे करावे, हा मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष हे सर्व घडवून आणण्यास समर्थ असेल तर त्यांचे स्वागत आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“आज काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांनीही स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांचे निकाल भाजपा विरोधकांचे डोळे उघडणारे आहेत. एकेकाळी ईशान्येकडील राज्यांतही काँग्रेस हा बलदंड पक्ष होता. आज चित्र बदलले आहे. ख्रिश्चन, आदिवासी मतदारांचे प्राबल्य असूनही ईशान्येत भाजपाला मोठे यश मिळत आहे. अरुणाचल प्रदेशात काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. तेथील आकडेवारी धक्कादायक आहे. भाजपास 171 तर काँग्रेसला 6 जागा मिळाल्या. इटानगरमध्ये प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या जदयुला 9 जागा मिळाल्या. याचा अर्थ असा की, काँग्रेसचा परंपरागत मतदार इकडेतिकडे गेला आहे. यावर तोड काँग्रेसलाच काढावी लागेल. या विषयात इतरांनी पडू नये, असे काँग्रेस नेतृत्वास वाटते. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे व आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, असेदेखील त्यांचे नेते म्हणतात. आमचेही त्याबाबत वेगळे मत नाही. मोठ्या पक्षाच्या वाटचालीस आमच्या शुभेच्छा!,” असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

“मोठा पक्ष म्हणजे नक्की काय?”

“काँग्रेस आजमितीस नक्कीच मोठा पक्ष आहे. पण मोठा म्हणजे नक्की काय आकारमानाचा? काँग्रेसच्या खालोखाल तृणमूल, अण्णा द्रमुक असे पक्ष संसदेत आहेत व हे सर्व भाजप विरोधक आहेत. देशातील विरोधी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे व विखुरलेला विरोधी पक्ष एका झेंडय़ाखाली एकत्र यावा, अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा? देशात भाजपाविरोधात असंतोषाच्या ठिणग्या उडत आहेत. लोकांना बदल हवाच आहे. त्याप्रमाणे पर्यायी नेतृत्वाची गरज आहे. ते कोण देऊ शकेल हा प्रश्न आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER