सीबीआयने देशमुखांच्या घरी नेमके केले काय?

Anil Deshmukh - Maharastra Today
Anil Deshmukh - Maharastra Today

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपूर, मुंबईतील निवासस्थानांसह १० ठिकाणी सीबीआयने शनिवारी सकाळपासून छापे टाकून मोठी कारवाई केल्यानंतर आता देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याचीच शक्यता अधिक आहे. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच ते गृहमंत्री असताना त्यांच्यासोबत काम करणाऱ्या पीएंसह काही एकूण २० जणांची आज दिवसभरात चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील वरळीमध्ये असलेल्या ‘सुखदा’ या इमारतीत देशमुख यांच्या मालकीचा फ्लॅट आहे. तिथे त्यांची डॉक्टर कन्या आणि जावयाचे क्लिनिकदेखील आहे. या दोघांची चौकशी झाली की नाही याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही; पण तेदेखील चौकशीच्या रडारवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी चालविली आहे. १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यास देशमुख यांनी आपल्याला सांगितले होते, असा आरोप डीजी दर्जाचे अधिकारी असलेले परमबीर सिंग यांनी केल्यानंतर खळबळ माजली होती. त्या अनुषंगाने सीबीआयने आतापर्यंत केलेल्या चौकशीत काही धक्कादायक माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. देशमुख हे जवळपास १७ महिने राज्याचे गृहमंत्री होते. या काळात ते, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यासोबत वावरणारे कर्मचारी तसेच काही व्यावसायिक संबंध असलेल्या व्यक्तींच्या संपत्तीमध्ये किती वाढ झाली याची माहिती सीबीआयने काढली असल्याचे सांगण्यात येते.

देशमुख यांचे कनिष्ठ पुत्र ऋषिकेश देशमुख यांचे खासगी सचिव संजय पलांडे, पीए कुंदन शिंदे तसेच नागपुरातील पीए योगेश कोठेकर हे प्रामुख्याने चौकशीच्या रडारवर असल्याची माहिती मिळते. पलांडे आणि कुंदन शिंदे यांची सीबीआयने मुंबईत काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. कोठेकर हे नागपुरात कलेक्शनचे काम करीत होते असा गंभीर आरोप एका न्यूज चॅनेलने मध्यंतरी केला होता. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कुठेकुठे किती गुंतवणूक केली, त्यात काही अपसंपदेचा समावेश होता का? ज्ञात स्रोतापेक्षा किती अधिक पैसा त्यांच्याकडे आहे याचा बारीकसारीक तपशील सीबीआयने गोळा केला असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तब्बल साडेआठ तास चौकशी केली. आम्ही चौकशीला पूर्ण सहकार्य केले, असे देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले. आजच्या चौकशीत सीबीआयने देशमुख यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करताना त्यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत, त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत सखोल माहिती घेतली असे कळते. देशमुख यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र ही अटक झालेली नाही. चौकशीनंतर देशमुख हे त्यांच्या काटोल मतदारसंघात कोरोनाविषयक उपाययोजनांवर लक्ष ठेवण्यासाठी रवाना झाले. देशमुख यांच्याकडे छापे टाकणे हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. मात्र, सीबीआयने देशमुख यांच्याबाबत सज्जड पुरावे गोळा केल्याची माहिती असून त्यामुळे नजीकच्या भविष्यात त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याचीच शक्यता अधिक आहे.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

ही बातमी पण वाचा : तब्बल १० तास सीबीआयकडून देशमुखांची चौकशी, सहकार्य केल्याची देशमुखांची स्पष्टोक्ती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button