बांगलादेश-न्यूझीलंड सामन्यात नेमका घोळ कशामुळे झाला?

Bangladesh-New Zealand match - Maharastra Today

न्यूझीलंडमधील (New Zealand) नेपियर (Napier) येथील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात डकवर्थ-लुईस पद्धतीमुळे (Duckworth Lewis system) मंगळवारी जो गोंधळ झाला तो कशामुळे झाला हे आता समोर आले आहे. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणण्याआधी न्यूझीलंडने १७.५ षटकांत ५ बाद १७३ धावा केल्या. मात्र त्यानंतर बांगलादेशला (Bangla desh) विजयासाठी किती षटकात नेमक्या किती धावा करायच्या आहेत तेच स्पष्ट नव्हते. त्यांना १६ षटकांत १४८ धावा करायच्या आहेत अशा टारगेटसह मैदानात उतरावे लागले. नऊ चेंडूंचा खेळ झाल्यावर त्यांना हेच टारगेट १७० धावांचे देण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात हा अभूतपूर्व गोंधळ होता आणि त्यामुळे बांगला देशचा नऊ  चेंडूंचा  खेळ झाल्यावर काही काळ खेळसुद्धा थांबला होता. धावा १४८ करायच्या आहेत की १७०, १७१ हे काहीच स्पष्ट होत नव्हते. सामन्याच्या १३ व्या षटकात हेच टारगेट त्यांना १७१ धावांचे देण्यात आले.

हा सारा गोंधळ ज्यामुळे झाला त्याचे कारण म्हणजे डकवर्थ-लुईस प्रणालीचे जे तक्ते प्रत्येक संघांना दिले जातात तेच दिले गेलेले नव्हते. या तक्त्यात व्यत्यय येत गेल्यावर प्रत्येक षटकानंतर काय टारगेट राहील  याची माहिती असते. ही संचालनाची समस्या होती अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या  (ICC)  प्रवक्त्याने दिली. तक्त्यांअभावी पंचांना डावाच्या आरंभी तोंडीच लक्ष्य सांगण्यात आले होते. डावातील नऊ  चेंडूंवर  खेळ थांबला याचे कारण तेच होते की, दोन्ही संघांनी डकवर्थ -लुईस तक्त्याची (DLS Sheet) मागणी केली होती आणि ते उपलब्ध नव्हते. ते तक्ते दिले गेल्यावरच खेळ पुढे सुरू झाला.

संचालन समस्या काय होती हे नेमके स्पष्ट झालेले नाही; पण रेफरी जेफ क्रो यांना जे डीएलएस शीट देण्यात आली होती. त्यांची सरमिसळ झाली आणि त्यातून  जे टारगेट सांगितले जातेय ते चुकीचे आहे असा त्यांचा समज झाला. त्यांनी नंतर अपडेटेड व अचूक  तक्त्याची मागणी केल्याचे समजते.यामुळेच बांगलादेशला सुरुवातीला काही व नंतर काही वेगळेच टारगेट मिळाल्याचा गोंधळ झाला. बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डामिंगो यांच्या मते डीएलएस शीट मिळाल्याशिवाय संघांनी मैदानातच उतरायला नको होते.

या सर्व गोंधळासाठी  रेफरी  जेफ क्रो यांनी दोन्ही संघांकडे दिलगिरीसुद्धा व्यक्त केल्याचे समजते. गोंधळ हा होता की, न्यूझीलंडचा संघ १७.५ षटकेच खेळला होता; पण ते पूर्ण २० षटके खेळल्याचे गृहीत धरून बांगलादेशला टारगेट देण्यात येत होते. न्यूझीलंडने २० षटके खेळून ५ बाद १७३ धावा केल्या असत्या तर बांगलादेशला १६ षटकांत १४८ धावांचे टारगेट बरोबर होते; पण न्यूझीलंडचा डाव १७.५ षटकांतच संपला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button