मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालाचा अर्थ काय? आघाडीची प्रतिमा मलिन ?

Bhagirath Bhalke - Samadhan Autade - Maharashtra Today
Bhagirath Bhalke - Samadhan Autade - Maharashtra Today

अखेर मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीचा निकाल लागला. राष्ट्रवादीच्या (NCP) तिकिटावर कॉंग्रेस (Congress) आणि सेनेच्या पाठिंब्यावर उभे असलेले भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव झाला. त्यांचे वडील आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी या निवडणुकीत बाजी मारली. समाधान यांच्या विजयाचे अनेक अर्थ राजकीय विश्लेषकांनी काढले आहेत.

१. भावनिक राजकारणाला मूठमाती
मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, आमदारांच्या जागी मुलगा किंवा त्यांच्या पत्नीला निवडून द्यावं असा पायाच पडला होता. भाजपनं मात्र या निवडणुकीपासून या परंपरेला खंड दिला. भालकेंचे पारंपरिक विरोधी प्रशांत परिचारकांची जागा मागच्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या समाधान आवताडेंना देण्यात आली. मागच्या निवडणुकीत परिचारक आणि आवताडे यांच्या मतांची विभागणी झाल्यानं भालके निवडून आले होते. परिचारकांची योग्य मनवळवणी, आमदार पडळकरांनी धनगर, भटक्या, ओबीसी मतांची बांधलेली मूठ आणि महाविकास आघाडीवरील भ्रष्टाचाराचे आरोप ही प्रमुख कारणं राष्ट्रवादीच्या पराभवासाठी देता येतील.

२. कारखानदारांचा पराभव होऊ शकतो हा संदेश
पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांच्या भोवतीच स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंतचं राजकारण अवलंबून असल्याचं चित्र आहे. स्थानिक भागांवर कारखानदारांचे वर्चस्व आहे आणि कारखानदार राष्ट्रवादीचे त्यामुळं ४० ते ५० आमदार सत्ता असो वा नसो राष्ट्रवादी निवडून आणतेच. शिवाय दुग्धसंस्था, पतसंस्था, जिल्हा बँका, पाणी पुरवठा संस्थांवर राष्ट्रवादीची असणारी मजबूत पकड यामुळं इतर पक्षांच्या उमेदवारांना निवडून येणं अशक्य होतं. भालके यांच्याकडे पंढरपूरचा विठ्ठल कारखाना होता. त्यामुळं कारखानदारांचा पराभव होऊ शकतो हा संदेश यातून देण्यात आला.

३. मोहिते पाटलांचे वर्चस्व
काही दिवसांपूर्वीच सोलापूरचं पाणी इंदापूरला नेण्याचा निर्णय झाला. कृष्णा-भीमा स्थिरीकणाचा मुद्दा सोलापूरच्या दुष्काळाचा कलंक मिटवू शकतो. त्यावर प्रयत्न झाल्याचे दिसत नसल्यामुळं विजयसिंह मोहिते पाटलांनी पक्षत्याग केला. यानंतर सोलापूरवर वर्चस्व कोणाचं? पवारांचं की मोहिते पाटलांचं हा नेहमी चर्चेचा विषय होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा भगीरथ भालकेंचा प्रचार करताना मोहिते पाटलांवर वारंवार टीका करत होते. सोलापूरवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती; परंतु मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेच्या जागेसह संपूर्ण सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या हातून निसटल्याचं चित्र आहे.

४. धनगर मतदान ठरलं निर्णायक
रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असलेला महाराज यशवंतराव होळकर यांचं जन्मठिकाण असलेला वाफगाव किल्ला, जेजुरीतील पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन यामुळं राष्ट्रवादी विरुद्ध धनगर समाज असा सामना रंगला होता. मंगळवेढ्यातल्या धनगरबहुल ३५ गावांना मिळत नसलेल्या पाण्याचा वादही पेटला होता. त्यामुळं धनगर समाजाची मतं या निवडणुकीत महत्त्वाची होती. पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच मतदारसंघांत धनगर समाजाची साथ मिळाल्यानं राष्ट्रवादीचे आमदार निवडून येतात. या निवडणुकीत धनगर समाजानं साथ सोडली तर उमदेवार पराभूत होऊ शकतो, असा संदेश धनगर समाजानं दिलाय.

५. महाविकास आघाडीवरील आरोपांबद्दल जनता गंभीर
कोरोना हाताळण्यातलं अपयश, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजन नाही, भंडारा, भांडूप येथील इस्पितळांना लागलेल्या आगीच्या घटना यावरून सरकार करत असलेल्या कामांबद्दल जनतेची प्रतिक्रिया मतपेटीतून व्यक्त केल्याचं बोललं जातंय. २०१९ ला भाजप-शिवसेनेला सत्तेचा कौल जनतेनं दिला होता. शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचं कारण पुढं करत युती तोडून विचारधारेच्या विरोधातल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसवर आधीपासूनच भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळं त्यांना २०१४ पासून जनतेनं सत्तेच्या बाहेर ठेवलं होतं.

यातच सचिन वाझे प्रकरणात पोलिसांचा सहभाग आणि परमबीर सिंगांचा १०० कोटी वसुलींचा लेटर बॉंब, शिवसेनेचे माजी वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात द्यावा लागलेला राजीनामा, धनंजय मुंडे यांच्यावर झालेले लैंगिक छळाचे आरोप यामुळं जनतेच्या मनात महविकास आघाडीची प्रतिमा मलिन झाली, असे संकेत मंगळवेढा- पंढरपूर पोटनिवडणुकीच्या मतपेटीतून जनतेनं दिलं असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button