सरकार पाडणे म्हणजे काय असते? तर ते वेडगळपणाचे ठरेल – शिवसेना

CM Uddhav Thackeray - Anil Deshmukh

मुंबई : काही आयपीएस अधिकाऱ्यांकडून (IPS Officers) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच सरकार पाडण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आम्ही त्यांचा तो प्रयत्न तो वेळीच हाणून पाडला, असा खळबळजनक दावा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी रविवारी लोकमत या वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला होता. आणि याच मुद्द्यावरून आजच्या सामनातून शिवसेनेनं (Shiv Sena) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह भाजपाला (BJP) खडे बोल सुनावले आहे.

काही सहानुभूतीदार अधिकारी मंडळाच्या भरवशावर कोणी सरकार पाडण्याचे मनसुबे पाहत असतील तर ते वेडगळपणाचे ठरेल यातील काही अधिकारी आजही उच्चपदी विराजमान आहेत. ठाकरे सरकार येऊ नये म्हणून उघड प्रयत्न करूनही आपले कोणी काय वाकडे केले या थाटात ते वावरत असतात. सरकारला धोका असतो तो याच प्रवृत्तीपासून. सरकार पाडणे म्हणजे काय असते? सरकारसंदर्भातले काही विषय गुप्तपणे विरोधकांकडे पोहोचवणे व सरकारच्या विरोधात प्रशासकीय यंत्रणेत अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे. अशा प्रवृत्तींवर निगराणी ठेवणे हे गृहखात्याचे काम आहे. ते त्यांनी चोख पार पाडले तर सरकारचे भवितव्य उत्तम आहे. सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न कोणताही अधिकारी करीत नाही. ते फक्त मनसुबेच ठरतात, पण अस्तनीत निखारे हे असतातच. सावधगिरी बाळगावीच लागेल!, असा सल्ला शिवसेनेने अनिल देशमुखांना दिला आहे.

आजचा सामनातील अग्रलेख…

भारतीय जनता पक्षाचे लोक महाराष्ट्र सरकार पाडण्याचा प्रयत्न काल करत होते. आज-उद्याही करतील. हे सगळे ठीक, पण राज्यातील काही बडे पोलीस अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत होते किंवा आहेत असे एक विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तोंडी घातले गेले. त्यावरून खळबळ उडाली. आता गृहमंत्र्यांनी जाहीर केले की, मी अशा प्रकारचे काही विधान केलेच नव्हते. म्हणजे पोलीस अधिकारी सरकार पाडणार या विधानाचा गृहमंत्र्यांनी साफ इन्कार केला आहे. राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्य़ांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न वेळीच हाणून पाडला, असे गृहमंत्री बोललेच नव्हते. मग त्यांच्या तोंडी असे विधान टाकण्याचे धाडस केले कोणी? ज्या कोणी हे धाडस केले तेच लोक सरकारला कमजोर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रशासन हे निवडून येणाऱ्य़ा लोकनियुक्त सरकारचे असते. एखाद्या राजकीय पक्षाचे नसते. सरकार बदलताच भलेभले अधिकारी टोप्या फिरवतात. उगवत्या सरकारला त्यांना नमस्कार करावाच लागतो. हे फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात सर्व स्तरांवर सुरू असते. महाराष्ट्रातील प्रशासन हे देशात उत्तम आहे. ज्याला आपण ‘प्रोफेशनल’ म्हणतो अशा पद्धतीचा अधिकारी वर्ग महाराष्ट्राला लाभला आहे. सरकार बदलण्याची व पाडण्याची क्षमता त्यांच्यात नाही. राज्याची ती परंपरा नाही. जर एखाद्या मंत्र्यास असे वाटत असेल की, अधिकारी सरकार पाडत आहेत तर ते सरकार अत्यंत ढिसाळ पायावर उभे आहे असे जनतेला वाटू शकते.

मुळात फडणवीस यांचे सरकार जाणार नाही या भ्रमात येथील प्रशासन निवडणुकीआधी आणि नंतर काही काळ होते. ते त्याच भ्रमात तरंगत होते. पाच वर्षे फडणवीस व भाजपने एकछत्री अंमल गाजवला. प्रशासनावर फडणवीस सरकारचा अंमल होता व पुनःपुन्हा आम्हीच येणार या विधानाची धुंदी होती. त्यामुळे पोलीस असतील किंवा मंत्रालय, महसूल खाते एकजात सर्व अधिकारी वर्ग त्याच संघधुंदीत गुंग झाला होता. अनेक महत्त्वाच्या नेमणुका संघ परिवाराच्या शिफारशीने किंवा हस्तक्षेपाने होत असत. पोलीस अधिकारी, आयुक्त, सरकारी वकिलांच्या नेमणुकांत हे सर्रास घडत होते. ही व्यवस्था यापुढे अशीच निरंकुश सुरू राहणार असेच वातावरण असल्याने पोलीस, नागरी सेवेतले अधिकारी त्याच व्यवस्थेच्या पांगुळगाड्यावर बसून प्रवास करीत होते, पण 105 आमदारांची ताकद असूनही भाजप सरकार बनवू शकला नाही हे सत्य स्वीकारायला त्यांना वेळ लागला. सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न करीत होते ते अधिकारी कोण? याहीपेक्षा काही झाले तरी भाजपचेच सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभूतीदार कोण, ते महत्त्वाचे. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय़ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले.

फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटे शपथ घेतली, पण विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. मात्र शपथ घेतलेले मुख्यमंत्रीच यापुढे कायम राहतील, जुनीच व्यवस्था पुढे चालू राहील असे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस व प्रशासकीय सेवेतले बडे अधिकारी ‘स्युमोटो’ नव्या सरकारची रंगसफेदी करण्याच्या आणि भेगा बुजवण्याच्या कामास लागले. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहता यावे म्हणून काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळय़ा पद्धतीने जाळय़ात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करीत होते. गुप्तचर खात्यानेही याकामी विशेष कामगिरी बजावली हे सत्यच आहे. बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते, पण त्यांचे काहीच चालले नाही. फडणवीसांचे सरकार कोसळले व महाविकास आघाडीचे सरकार यायचे ते आलेच. त्यामुळे या मंडळींचे मन खट्टू झाले, अशी खोचक टीकाही शिवसेनेनं भाजपावर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER