डीन जोन्स काय म्हणाले होते आपल्या शेवटच्या व्टिटमध्ये?

Dean Jones

डीन मार्विन जोन्स… (Dean Jones) ज्यांनी 1986 ची ‘टाय’ टेस्ट मॕच (Tied Test match) पाहिली असेल आणि ज्यांनी 1987 च्या विश्वचषक स्पर्धेच्या (1987 world cup) सामन्यांचा आनंद घेतला असेल ते लोक हे नाव विसरु शकत नाहीत. टी-20 च्या जमान्याआधी वन डे क्रिकेटमधील सर्वात आक्रमक फलंदाजांपैकी गणल्या जाणाऱ्या या सफल आॕस्ट्रेलियन (Australia) फलंदाजाचे गुरुवार, 24 सप्टेंबर रोजी हृदयविकाराने मुंबईत अचानक निधन झाले. ते फक्त 59 वर्षांचे होते आणि अखेरच्या दिवसांपर्यंत सक्रिय होते.

आयपीएल 2020 चे ते स्टार स्पोर्टस् साठी समालोचन करत होते. कालच त्यांनी आपल्या एका टीकाकाराला व्टिट द्वारे उत्तरही दिले होते. या टीकाकाराने ते अतिशय त्रासदायक समालोचक असल्याचे म्हटले होते आणि स्टार स्पोर्टसने त्यांना बदलावे अशी मागणी केली होती. मात्र त्याला जोन्स यांनी ज्या हजरजबाबीप्रमाणे चपखल उत्तर दिले होते त्याने त्या टीकाकाराचेच हसे झाले होते. दुर्देवाने त्यांचे हे व्टिट शेवटचे ठरले.

या व्टिटमध्ये त्या टिकाकाराला जोन्स म्हणाले होते की, तुम्ही सामना बघताय हे वाचून आनंद झाला…फक्त ते छान सुंदर ‘म्युट’ बटन तेवढे दाबा.’ (Glad you are watching…just hit the cool mute button).

जोन्स हे त्यांच्या हजरजबाबी व मजेशीर उत्तरांसाठी प्रसिध्द होते. अलीकडेच आयपीएल 2020 मध्ये पंजाब व दिल्ली सामन्यातील शाॕर्ट रन प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी म्हटले होते की, शाॕर्ट रनवर निर्णयासंदर्भात पंचांना मैदान सोडून वर पायऱ्या चढत सल्ला घेण्याची परवानगी मिळाली तर या प्रकारावर स्पष्टीकरण मिळु शकते पण तशी परवानगी आहे की नाही हेच अजून स्पष्ट नाही. अलीकडे आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी मैदानाबाहेरुन सल्ले घेतो…पण त्याला परवानगी आहे का हा प्रश्न आहे.

1986 मधील भारताविरुध्दच्या संस्मरणीय चेन्नई ‘टाय’ कसोटीत त्यांनी 19 सप्टेंबर 1986 रोजीच 210 धावांची द्विशतकी खेळी केली होती.त्यावेळी चेन्नईतील (तत्कालीन मद्रास) उष्म्याचा त्यांना प्रचंड त्रास झाला होता आणि उलट्या होत असताना व डिहायड्रेशन झालेले असतानाही त्यांनी ही खेळी केली होती.

याचीसुध्दा पाच दिवसांपूर्वीच व्टिटद्वारे त्यांनी आठवण जागवताना म्हटले होते की, A day that changed my life forever. (ज्या दिवसाने माझे आयुष्य बदलवले). या कसोटीनेच आॕस्ट्रेलियन क्रिकेटचे दिवस पालटले आणि यशाचे दिवस सुरु झाले असा त्यांचा विश्वास होता.

ही बातमी पण वाचा : माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER