कानुल्यासाठी काय वाट्टेल ते

Marathi Movie

दिवाळीचे चार दिवस जरी संपले असले तरी अजून डब्यामधले फराळाचे जिन्नस संपलेले नाहीत. त्यातल्या त्यात कितीही आज सगळं विकत मिळत असलं, आणि ऑर्डर दिली की फराळ हातात येत असला तरी आईच्या फराळाची चव ही नेहमीच प्रत्येकाला आवडते. सेलिब्रिटी कलाकारांसाठी तर आईच्या हातचे पदार्थ हे जास्त हवे हवेसे असतात कारण कामाच्या निमित्ताने ते बहुतांशी वेळ घराबाहेर असतात आणि मग दिवाळी आणि सणासुदीच्या काळात आईने बनवलेल्या फराळावर ताव मारण्यासाठी कायम उत्सुक असतात. अभिनेता भूषण प्रधान हा खरे तर फिटनेस प्रेमी आणि डायट नियम तंतोतंत पाळणारा कलाकार आहे. मात्र दिवाळीच्या काळात आईच्या हातचे कानुले म्हणजेच करंज्या खाण्यासाठी त्याने फिटनेसच्या सगळ्या नियमाला बाजूला सारले. गंमत म्हणजे त्याने आईच्या हातचे कानुले खात असताना चा फोटो जेव्हा इन्स्टा पेज वर शेअर केला तेव्हा त्याला आलेल्या बहुतांशी कमेंटमध्ये, अरे तुला गोड आवडत नाही ना आणि मग आता कानुले कसे खातो असे प्रश्न विचारले आहेत. आणि त्यालाही भूषणने आईच्या हातच्या कानुले खाण्यासाठी काय वाट्टेल ते करेन अशी प्रतिक्रिया देत घरच्या करंजाना फुल मार्क दिले आहेत.

अभिनेता भूषण प्रधान नेहमीच त्याच्या सोशल मीडिया पेजवर वेगवेगळे डायट शेक, तसेच डाएट फूड खात असलेले फोटो शेअर करत असतो. शिवाय तो प्रचंड फिटनेस प्रेमी आहे. त्यामुळे कितीही वेगवेगळ्या कामात बिझी असला तरी त्याचा व्यायाम तो कधीही चुकवत नाही. त्याचप्रमाणे तो त्याच्या चाहत्यांना तसेच मित्रांना सोशल मीडिया पेजवर फिटनेस फंडे सांगत असतो. भूषण फिटनेस प्रेमी असेल तर नक्कीच गोड पदार्थ पासून नेहमीच दूर राहणार हे तर ओघाने आलेच. त्यामुळे त्याच्या मित्रपरिवाराला आणि त्याला ओळखणाऱ्या अनेक सहकलाकार यांनाही माहित आहे की त्याच्या समोर आलेल्या गोड पदार्थांची डिश तो कधीच खात नाही. साखरे पासून तो थोडा नेहमीच लांब असतो आणि म्हणूनच जेव्हा त्यांनी सोशल मीडियावर करंजी खातानाचा फोटो शेअर केला तेव्हा त्याच्या चाहत्यांच्या त्याच्या मित्र मंडळीच्या भुवया उंचावल्या. कधीच गोड न खाणारा भूषण आईच्या हातच्या करंज्या कशा काय फस्त करत आहे. पण शेवटी आईच्या हातच्या चवीपुढे सगळं फीकं असतं.

दिवाळी चा माहोल आणि फराळाच्या पदार्थांमध्ये आईचा हात लागला असल्याने त्याने फिटनेस ला थोडा डच्चू दिला आहे. भूषण सांगतो, हो मान्य आहे मी डाएट पदार्थच नेहमी खात असतो. शिवाय असे पदार्थ माझ्या पानात असतात कि ज्या मुळे फार वजन वाढणार नाही आणि मी फिट राहीन. माझ्या मित्र परिवारांना आणि मला जवळून ओळखणारे सगळ्यांना हे माहित आहे. त्यामुळे मला लोक घरी बोलावतात तेव्हा माझ्यासाठी ते अनेकदा कमी साखरेचे डायट फूड प्लान करत असतात. पण आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्याच्यासाठी आपण आपल्या नियमांना, आपल्या तत्त्वांना मुरड घालत असतो. त्या पैकीच एक म्हणजे आईच्या हातचे पदार्थ .

दरवर्षी दिवाळीत आई स्वतः फराळाचे पदार्थ करते. पुण्याच्या घरामध्ये दिवाळीच्या आदल्या आठवड्यात हाच प्रोग्राम सुरू असतो. तिने बनवलेला प्रत्येक पदार्थ हा खूप छान असतो आणि मी नेहमी दिवाळीच्या काळामध्ये सगळे नियम बाजूला ठेवतो आणि आईच्या हातचे फराळाचे पदार्थ खातो. आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे करंज्या. कारण करंज्या प्रचंड गोड असतात. कारण त्यामध्ये पिठीसाखरचे प्रमाण खूप असतं. पण हा असा पदार्थ आहे जो वर्षात फारसा बनवला जात नाही. कारण तो फार निगुतीने करण्याचा पदार्थ आहे. कितीही म्हटलं मला कानुले खायचे आहेत तरीदेखील ते पदार्थ घरोघरी नेहमी होत नाही. मात्र दिवाळीला हमखास घराघरात करंज्या केल्या जातात. आपल्या घरगुती भाषेमध्ये कानुले म्हणतात. त्यामुळे हा पदार्थ खाण्याची संधी मी फक्त फिटनेस प्रेमी आहे ,मला वजन वाढवायचे नाही अशा कारणासाठी सोडून देईन असे माझ्याकडून कधीच होणार नाही.

अनेक सिनेमा नाटक आणि मालिका यांच्यामधून भूषण प्रधानचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. जाहिरातींमध्ये देखील भूषण आपल्याला नेहमी दिसतो. गेल्याच आठवड्यामध्ये भाग्यश्री लिमये हिच्यासोबत त्याने एक फोटो शेअर करत खास कॅप्शन दिली होती यामुळे ते दोघे डेट करत असल्याची चर्चा देखील सुरू आहे. पिंजरा या मालिकेतील तील भूषणने साकारलेली वीर ही भूमिका खूप गाजली होती. आणि याच मालिकेतून भूषणने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

त्यानंतर कॉफी आणि बरच काही या सिनेमा सह नाटकांमध्ये देखील भूषणने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे . सर्वात आकर्षक पुरुष या स्पर्धेमध्येही भूषण ला खूप सार्‍या कमेंट मिळाल्या होत्या. या कमेंटच्या आधारावरच भूषणने सर्वात आकर्षक पुरुष या स्पर्धेत बाजी मारली होती. देखणा आणि फिटनेस प्रेमी असलेला भूषण हे सगळं बाजूला ठेवून आईच्या हातच्या कानुल्यावर ताव मारतो हा त्याचा फोटो पाहणे ही देखील त्याच्या चाहत्यांसाठी एक गोड ट्रीट होती. भूषणने कानुले खाण्याची मजा घेतलीच पण त्याच्या चाहत्यांनी त्याच्या फोटोची देखील खूप मजा घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER