काय सांगता, पोलीसमामा येईल आणि घेऊन जाईल ?

Ajit Pawar - Gajanan Marne Editorial

आमच्या लहानपणी सर्वच लहान मुलांना सांगितलेलं ऐकलं नाही की पोलीसमामा येईल आणि पकडून नेईल, अशी भीती दाखवली जायची. त्यामुळे लहान मुलं जेवताना घास घेत नसली किंवा थोडी मोठी झाल्यावर शाळेची सुरुवात झाली की आणि त्यानंतरही एखाद दोन वर्षे पोलीसमामाची भीती पालक दाखवत असत. परिणामी, पालकांचं ऐकलं नाही किंवा चुकीचं वागलं तर पोलीसमामा घेऊन जाईल, अशी धारणा मनात बाळगतच गेल्या दोन तीन पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पुढे पोलीसमामा चित्रपटांमधून भेटू लागले ते एकतर भ्रष्टाचारी म्हणून किंवा एकदम जंजीरमधल्या अमिताभ बच्चनसारखे लार्जर दँन लाइफ. सिनेमा पोलिसांवरचा असो किंवा नसो, हिरो पोलीस इन्स्पेक्टर नसला तर आणि संपूर्ण सिनेमात कोठेही पोलिसांची गरज नसली तरी दुष्टांचं निर्दालन हिरोने केल्यावर आपल्या गाडीचा सायरन वाजवत पोलीस येतात आणि त्यांच्या पाठोपाठ द एंड ची पाटी येऊन चित्रपट संपायचा. लहानपणी हा प्रश्न कायम पडायचा की हे पोलीस इतक्या वेगाने गाडीतून सायरन वाजवत येतात आणि चित्रपट संपतो तर मग हे थोडे आधी का नाही आले…

प्रत्यक्ष जीवनात पोलीस भेटू लागले ते सिग्नल तोडल्यावर किंवा नो एंट्रीतून वाहन दामटल्यानंतर. अर्थात, वाहतूक नियम मोडल्यानंतर किंवा खिशात वाहन चालवण्याचा परवाना न बाळगता, हेल्मेट न घालता वाहन चालवल्यावर किंवा अशा कोणत्याही प्रसंगी पोलीस भेटले, तर अनुभव साधारण सारखाच असतो. ते तुम्हा आम्हाला सर्वांना तसे भेटतातही.

आज मातृभाषा दिन असताना, शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) पुण्यात येऊन शिवसेना राष्ट्रवादी (NCP) आणि कॉँग्रेस (Congress) हे तीनही पक्ष एकत्र येऊन आगामी महापालिका निवडणुका लढवण्याचे संकेत देत असताना मी पोलिसांचा विषय का काढतोय, असं तुम्हाला वाटेल. पण पोलिसांच्या विषयावर लिहावे असे पुन्हा काही तरी घडलेच आहे.

दोन खुनांच्या आरोपातून निर्दोष सुटलेल्या गजानन मारणे (Gajanan Marane) या लोकोत्तर सत्पुरुषाला तळोजा तुरुंगातून स्वगृही आणण्याच्या वेळी चार पाचशे गाड्या घेऊन त्यांचे त्यांच्या राष्ट्रकार्यातले अनुयायी, समर्थक असे सारे गेले होते. ते सगळे त्यांच्या लौकिकाला जागून टोल न भरताच पुण्याकडे आले. त्यांच्या या मिरवणुकीची, टोल न भरता पुढे जाण्याची व्हिडियो चित्रं व्हायरल झाली. काहीही व्हायरल होणं डेंजरस आणि मग पोलिसांनी तत्परतेने गजानन मारणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. पाठोपाठ करोना स्थिती गंभीर होत असल्याने पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुण्यात आले आणि त्यांनी त्यांच्या खास शैलीत पोलीस आयुक्तालयातच पोलिसांची कानउघाडणी केली.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांची सप्टेंबर २०२० मधे पुण्यात नियुक्ती झाली. त्यावेळी पदभार स्वीकारल्यावर तीन महिन्यात पुण्यातल्या वाढलेल्या गुंडगिरीचे चित्र बदललेले असेल, असं त्यांनी अगदी पुढाऱ्यांसारखे सांगितले होते. ते तर घडले नाहीच पण पुण्याचे पोलीस अगदी हिन्दी चित्रपटातल्या लौकिकाला जागले आणि सिनेमातल्यासारखेच गाड्यांचा ताफा टोल न देता गेल्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला. अजित पवारसाहेबांनी घरचा आहेर देत कान टोचल्यानंतर पोलिसांनी गुंड गजानन मारणे यांचा शोध घेण्यास सुरुवात केलीय पण ते फरार झाले आहेत, असं सांगण्यात आलंय. एखादी व्यक्ती फरारी असली तर पोलिसांच्या भाषेत मिळून येत नाही, असं सांगतात. यांची सगळी भाषाही भारी आणि कृतीही. पाचशे गाड्यांच्या ताफ्यानिशी हे सत्पुरुष पुण्यात येतात, त्यांचे जंगी स्वागत होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि पोलीस आपल्याला शोधायला येताहेत, हे या सत्पुरुषांना लगेच समजते. ते गायब होतात अगदी मिस्टर इंडियासारखे. पोलिसांच्या लेखी मात्र ते मिळून येत नाहीत. मिळून यायला हे सत्पुरुष म्हणजे काय मनमोहन देसाईंच्या सिनेमातले बिछडलेले भाऊ आहेत..

हे सारं होतं म्हणून तर पुन्हा पोलिसांवर लिहावं लागतं. आता पोलीस गजानन मारणे यांच्या तपासावर आहेत. त्यामुळे काही काळ तरी हे सद्गृहस्थ सार्वजनिक जीवनात दिसणार नाही, असे वाटते. पण निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश, निवडणुकीचे तिकीट, निवडून येण्याची क्षमता आणि मला सर्व पक्षांची दारं खुली आहेत, असं या आणि यांच्यासारखा करिष्मा-लौकिक-प्रभाव असलेल्या सर्व थोर लोकांचं प्रेस स्टेटमेंट…कदाचित त्यांच्या शोधासाठी निघालेल्यांनाच त्यांना सँल्यूट करायची वेळ येईल का…सांगता येत नाही.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER