विधान परिषदेचे निकाल काय सांगतात? भाजपला धक्का अन् शिवसेनेलाही

BJP-Shivsena

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला आहे. तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक झाली. नागपूर पदवीधर आणि पुणे पदवीधर मतदारसंघाची हातची जागा भाजपने गमावली. नागपूर पदवीधर हा तर भाजपचा गड. गेली ४०-४५ वर्षे जनसंघ-भाजपने त्या ठिकाणी पराभव कधीही पाहिलेला नव्हता. नागपूरचे विद्यमान महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांना पक्षाने उमेदवारी दिली. ते १७ हजारावर मतांनी पराभूत झाले. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी विजयश्री खेचून नेली. नागपुरात भाजपचे एवढे प्राबल्य असताना आणि नागपूर विभागातही वरचष्मा असताना मोठा तडाखा वंजारींनी दिला. जोशी यांची उमेदवारी मतदारांनी स्वीकारली नाही. त्याऐवजी दुसरा उमेदवार दिला असता तर चित्र वेगळे राहिले असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बाहेर पडले, त्यांनी अधिक ताकद लावली असती तरीही चित्र वेगळे दिसले असते असे काही जण म्हणतात. जोशी हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्ती आहेत. जोशींचा पराभव हा फडणवीस यांनाही मोठा धक्का आहे. नागपुरातील काँग्रेसच्या नेत्यांनी वंजारींच्या पाठीशी ताकद उभी केली. वंजारी यांचा स्वभाव मृदू असल्याचाही त्यांना फायदा झाला. ही निवडणूक जातीवर गेली हेही त्यांच्या विजयाचे एक कारण म्हटले पाहिजे. बहुजन आणि दलित ऐक्याचा हा विजय असल्याची ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाणारी आहे.

औरंगाबाद (Aurangabad) पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण (Satish Chavan) तब्बल ५७ हजार ८९५ मतांनी निवडून आले. भाजपचे शिरिष बोराळकर यांचा दारुण पराभव झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रितपणे लढली आणि जिंकली. ही निवडणूकही जातीवर गेली असे म्हणण्याला मोठा वाव आहे. चव्हाण यांनी हॅटट्रीक साधली. भाजपला ही जागा जिंकण्याचा विश्वास होता, तो पार धुळीस मिळाला. जातीय समीकरणांमध्ये बसणारा उमेदवार भाजपने दिला असता तर चित्र थोडे वेगळे राहिले असते का यावर आता चर्चा होत राहील.

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे संग्राम देशमुख (Sangram Deshmukh) यांचा जवळपास ५० हजार मतांच्या फरकाने झालेला लाजिरवाणा पराभव हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी धक्का आहे. ते या मतदारसंघात दोनवेळा आमदार होते. सध्या पुण्यातून विधानसभेचे सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे अरुण लाड यांनी देशमुख यांचा एकतर्फी पराभव केला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ही निवडणूक हाती घेतली होती. राष्ट्रवादीचे अरुण लाड यांचा विजय भाजपसाठी आत्मचिंतन करायला लावणारा आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्या विजयात विश्वजित कदम आणि सतेज बंटी पाटील यांची भूमिका मोलाची राहिली. राष्ट्रवादीनेही त्यांना चांगली साथ दिली.

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा अंतिम निकाल हे वृत्त लिहिपर्यंत आलेला नव्हता पण अपक्ष किरण सरनाईक आघाडीवर होते. विद्यमान आमदार शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे दुसºया क्रमांकावर होते. भाजपचे नितीन धांडे या ठिकाणी फारच माघारले. भाजप आणि शिक्षक परिषद वेगवेगळे लढल्यानेही नुकसान झाले. महाविकास आघाडीचे नेते अन्य मतदारसंघात एकत्र होते पण अमरावतीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देशपांडे यांना हवी तशी साथ दिली नाही हे निकालात दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने मनापासून देशपांडे यांना साथ दिली असती तर ते आरामात निवडून आले असते पण शुक्रवारी रात्रीपर्यंत त्यांचा विजयासाठी संघर्ष सुरू होता.  अमरावती विभागातील बड्या शिक्षण संस्था या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विचारांच्या लोकांकडे आहेत पण त्यांनी देशपांडे यांच्या पाठीशी ताकद उभी केली नाही असे दिसते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला या निवडणुकीत अन्यत्र झाला पण अमरावतीत शिवसेनेला फायदा झाला नाही असे दिसते.

नंदुरबार-धुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे अमरिश पटेल यांनी एकतर्फी विजय मिळविला. हा भाजपपेक्षा पटेल यांच्या वैयक्तिक प्रभावाचा विजय आहे. काँग्रेसचे अभिजित पाटील यांचा दारुण पराभव झाला. भाजपबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादीच्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांनी पटेल यांना भरभरून मते दिली हे उघड सत्य आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER