नेपाळमधील हिंदुत्व संपवलं जात असताना आपण काय केले? – शिवसेना

CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi

मुंबई :- हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपचे (BJP) नेते सतत शिवसेनेवर (Shiv Sena) प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. आणि याच विषयावरुन शिवसेनेनं आजच्या सामानातून भाजपला लक्ष्य केले आहे. चीनपासून सावध राहा, असा इशारा भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत (Bipin Rawat) यांनी नेपाळला दिला आहे. नेपाळने आशियातील श्रीलंकेसह अन्य देशांकडून शिकायला हवे आणि चीनपासून सावध राहायला हवे, असं त्यांनी सांगितलं आहे. नेपाळचा घास गिळला जात असताना हिंदुस्थानचे सरकार तेव्हा हा प्रकार षंढासारखे बघत राहिले. नेपाळ हे जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू राष्ट्र. श्रीराम व सीतामाईंशी नात्याने जोडलेला हा देश, पण नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले? असा सवाल शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना विचारला आहे.

सामनाच्या अग्रलेखात लिहिले आहे की, नेपाळचा घास याआधीच चिनी ड्रॅगनने गिळला आहे. नेपाळमध्ये जाऊन हस्तक्षेप करणे म्हणजे दुसऱ्या देशातील अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे या सबबीखाली आपण नेपाळचा रंग बदलताना उघड्या डोळ्याने सहन केला. मग आता नेपाळला फुकट सल्ले देण्यात काय फायदा? आज चीन हिंदुस्थानपेक्षा नेपाळच्या जवळ जास्त आहे. चीनने नेपाळची संस्पृती बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे. चिनी भाषा शिकवणारे 25,000 शिक्षक नेपाळच्या गावागावात घुसवले आहेत. चीनने नेपाळला कर्जाच्या ओझ्याखाली दाबले आहे. नेपाळी जनतेला गुलाम केले आहे. चीन सातत्याने आपले सैन्य आणि आर्थिक ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीन अब्जावधी रुपयांचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हिमालयन रिजनमध्ये उभारण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान, नेपाळ, मालदिवसारखी राष्ट्रे चीनच्या पकडीत आहेत. श्रीलंकेतही चीनने मोठी गुंतवणूक केलीच आहे. लडाखमध्ये चिनी सैन्य आज आतमध्ये घुसले आहे. त्यानंतर चीनच्या गुंतवणुकीचे काय करावे? हा प्रश्न निर्माण झाला. लडाख प्रकरण घडले नसते तर चीनचे अब्जावधी रुपये आपल्या देशात आलेच होते व त्याचे परकीय गुंतवणुकीचे कौतुक करताना मोदी सरकार थकत नव्हते.

डोकलामपासून लडाखपर्यंत चीनने भारताला धोकाच दिला आहे. अरुणाचलमध्ये घुसखोरी सुरूच आहे व लडाखमध्ये घुसून चिनी सैन्याने आमची जमीन ताब्यात घेतली आहे. अशा परिस्थितीत चीनच्या घुसखोरीवर संसदेत चर्चा करा असे सांगण्यात आले, तेव्हा समितीत चर्चा कोणत्या विषयांवर व्हावी झाली तर तीन्ही सैन्यदलाचे गणवेश बदलण्यावर… भाजपाचे भाजपचे खासदार सध्या जे काही करत आहेत तो मूर्खपणाचा कळस आहे. चीनपासून नक्की सावध कोणी राहायचे? चीनने हिंदुस्थानात घुसून आमच्या भूभागावर अतिक्रमण केले. त्यावर ना संसदेत चर्चा, ना संरक्षण खात्याच्या स्थायी समितीत चर्चा. चीनचे पंतप्रधान हिंदुस्थान दौऱ्यावर आले व दिल्लीत न उतरता थेट मोदींच्या गावात अहमदाबादेत जाऊन झोपाळय़ावर झुलू लागले. तेथे त्यांनी शेव पापडी, गाठे, ढोकळा खाल्ला. त्या वेळी आम्ही याच स्तंभातून इशारा दिला होता- चीनपासून सावध राहा! ते खरेच ठरले, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

काश्मीर खोऱ्यात रोज दोन-चार जवानांना हौतात्म्य का पत्करावे लागत आहे त्यावर चर्चा करा म्हटले की हे लोक पळ काढतात. जवानांच्या ड्रेस कोडवर चर्चेचे गुऱ्हाळ घालणारे हे लोक चीन आमच्या हद्दीत घुसले आहे त्यावर चर्चा करायला तयार नाहीत. नेपाळला चीनपासून सावध राहण्याचा इशारा देत आहेत. सावध राहण्याची खरी गरज आम्हाला म्हणजे हिंदुस्थानला आहे. नेपाळ हातचा गेलाच आहे. लडाखमध्ये चिनी घुसले आहेत. त्यांना कसे बाहेर ढकलणार ते सांगा. ते जास्त महत्त्वाचे आहे, असा सवाल अग्रलेखात विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER