चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशामागचं नेमकं कारण त्यांच्या ‘बापा’नेच केले होते स्पष्ट

Chitra Wagh

मुंबई : राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या तत्कालीन अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली, त्यावेळेस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ (Kishor wagh) यांच्याविरोधातील एसीबीचं प्रकरण नमूद केलं होतं. त्या प्रकरणाची चौकशी होऊ नये, म्हणून वाघ भाजपमध्ये (BJP) गेल्याची त्या वेळेस चर्चा होती. परंतु, ज्या कारणासाठी चित्रा वाघ भाजपमध्ये गेल्याचं त्यावेळी बोललं गेलं, त्यातून त्यांची सुटका झालीच नसल्याचं आता दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भ्रष्टाचारविरोधी प्रकरणातील प्रकरणांना तोंड देणं अशक्य झाल्याचं सांगत चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला, असा दावा त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. 1 ऑगस्ट 2019 रोजी पत्रकारांशी बोलताना पवारांनी हे वक्तव्य केलं होतं.

चित्रा वाघ यांच्या संस्थेशी संबंधित दोन फाईल भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे आहेत. त्यांच्या पतीच्या करप्शन केसबाबत आरोपपत्र दाखल आहे. त्यांना या प्रकरणात तोंड देणं अशक्य झालं आहे. म्हणून आपण पक्ष सोडत असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, विधानसभा निवडणूक येऊन ठेपली असताना चित्रा वाघ यांनी भाजपप्रवेश केला. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीमध्ये लढल्यामुळे युती सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु झालं उलटंच. राजकीय घडामोडींनंतर भाजपचं सरकार आलं नाही, तर शिवसेना प्रणित महाविकास आघाडी स्थापन झाली. म्हणजे आधी सत्तेबाहेर राहिलेल्या चित्रा वाघ, आताही सत्तेबाहेर आहेत. वाघ आता महाविकास आघाडी सरकारविरोधात रान उठवत आहेत. या वेळेस पुन्हा त्याच प्रकरणात वाघ यांचे पती किशोर वाघ यांची चौकशी होती आहे. म्हणजे ज्या एका कारणासाठी चित्रा वाघ भाजपात गेल्याची चर्चा होती, त्यातून त्यांची सुटका झाली नसल्याचं स्पष्ट होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER