अमित ठाकरेंनी वर्षभरात काय केले ? मनसेकडून रिपोर्ट कार्ड जारी

MNS-Amit Thackeray

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray ) यांचं वर्षभराचं रिपोर्ट कार्ड मनसेनं जारी केलं आहे. अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी नियुक्ती होऊन वर्षपूर्ती होत आहे. त्याबाबत मनसेने व्हिडीओ ट्रेलरच्या माध्यमातून अमित ठाकरेंचं रिपोर्ट कार्ड सादर केलं आहे.

मनसेचा रिपोर्ट कार्ड :
राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुलाचा अमितसाहेब असा उल्लेख अजिबात करणार नव्हतो; कारण अमित साहेब ठाकरे यांनी केव्हाच स्वतःची अशी एक वेगळी ओळख करून ठेवली आहे.

असा उल्लेख करण्यामागचं कारण एवढंच आहे की, वडिलांचा राजकीय पक्ष असूनही इतर कार्यकर्त्यांप्रमाणे लोकांच्या गर्दीत असलेला तो कार्यकर्ता म्हणजेच अमित ठाकरे आपल्या राजकीय प्रवासाचे एक वर्ष पूर्ण करत आहेत. एक वर्षात अमित साहेब ठाकरे यांनी कोणते मुद्दे हाताळले ह्यावर नजर टाकू या.

– आरे कॉलनी म्हणजे मुंबईचा श्वास, मुंबईचा श्वास तोडण्याचे प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून केले जात होते. पर्यावरणाचा विचार करून मनसे नेते अमित ठाकरे यांनी ह्या आंदोलनात सहभाग घेत,अनेक संघटनांच्या साहाय्याने हा मुद्दा निकालात काढला.

– राज्यातील बंधपत्रित डाॅक्टर्स आणि अधिपरिचारिका (नर्सेस) यांच्या पगारातील कपात रद्द करण्याची मागणी मनसेच्यावतीने अमित ठाकरे यांच्या पुढाकाराने करण्यात आली. (८ जुलै २०२०)

– कोरोना संकटकाळात शाळांनी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या- आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांनी फी भरण्यात पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी समजून घ्यायला हव्यात. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून “पालकांकडून शाळांनी वाढीव फी घेऊ नये तसंच फी भरण्यासाठी पालकांवर कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव टाकला जाऊ नये, यासंदर्भात आपण स्वत: सर्व खासगी शाळांच्या व्यवस्थापनांशी संवाद साधून सध्याच्या संकटकाळात पालकांना दिलासा द्यावा.” अशी मागणी मनसेच्यावतीने अमित ठाकरे ह्यांनी केली.

– आपल्या महाराष्ट्राची ‘राजभाषा’ मराठी आहे, प्रशासनची पत्रके हिंदी/इंग्रजी भाषेत येत होती. शासन आदेश मातृभाषेतून लोकांना कळावेत म्हणून मुख्य सचिवांना मनसेच्यावतीने मनसे नेते अमित ठाकरे ह्यांनी पत्र लिहिले.

– महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविकांना खूपच कमी मोबदला दिला जात होता.त्यांना मिळणारा मोबदला वाढायला हवा ह्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह भेट घेतली. अजित पवार यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची ही मागणी मान्य करत आशा स्वयंसेवकांच्या वेतनात दुप्पट वाढ केली.

– कोरोना काळात उपलब्धता असल्याचे नागरिकांना कळावे ह्यासाठी “App” विकसित करून कोरोनाविषयक माहिती त्यावर प्रकाशित करावी,प्रत्येक रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशा मागणीसाठी मनसे नेते अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली.

– कोरोनाच्या लढाईत सगळ्यात जास्त जीव धोक्यात घालून लढणाऱ्या आरोग्य सेवकांच्याच (बंधपत्रित डॉक्टर्स आणि नर्सेस) मानधनात कपात करण्याच्या निर्णयाविरोधात मनसे नेते अमित ठाकरे ह्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले.

– आझाद मैदान येथील सभेनंतर तो संपूर्ण परिसर स्वच्छ करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांची भेट घेऊन मनसे नेते अमित ठाकरे ह्यांनी महाराष्ट्र सैनिकांची पाठ थोपटली.

१. कोरोना संकटकाळात शाळांनी, विशेषतः सीबीएसई, आयसीएसई, आयबी या बोर्डाच्या इंग्रजी शाळांनी फीमध्ये वाढ केली. तसंच फी भरू न शकणा-या पालकांवर दबाव टाकला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे केली. (अमितजी यांनी हा विषय घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिका-यांनी आपापल्या परिसरातील प्रत्येक शाळेच्या विश्वस्तांची भेट घेऊन पालकांनी आर्थिक पिळवणूक करू नका, असं पत्र दिलं.)

२. शासन आदेश मराठीतच काढले जावेत याकडे अमित ठाकरे यांनी सरकारचं/ प्रशासनाचं लक्ष वेधलं – “टाळेबंदीशी संबंधित शासन आदेश राज्यातील सर्वसामान्य जनतेला समजावा, अशी जर राज्य सरकारची खरंच इच्छा असेल तर त्यासाठी इंग्रजीचा वापर करून कसं चालेल? म्हणूनच ‘शासन आदेश मराठीतच हवा’ या मागणीसाठी आम्ही आज मुख्य सचिवांना पत्र लिहिलं. आता यापुढे तरी राज्य सरकारचे सर्वच्या सर्व शासन आदेश मराठीत प्रसिद्ध केले जातील, अशी आशा बाळगू या. शासन आदेशातील मराठी भाषा क्लिष्ट, किचकट नसेल, तर सर्वांना समजेल अशी सहज, सोपी असेल अशीही अपेक्षा बाळगू या” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

३. राज्यातील आशा वर्कर्स आणि आशा गट प्रवर्तक यांच्या मानधनवाढीचा प्रश्न गेली अनेक वर्षं रखडला होता. केवळ १,५००- २,००० रुपयांच्या मानधनावर आशा वर्कर्स काम करत होता. अमित यांना काही आशा वर्कर्स भेटल्यानंतर त्यांनी आरोग्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना पत्र लिहिले. तसंच, अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर दोनच दिवसांत आशा वर्कर्सच्या मानधनात रु २,००० तर आशा गट प्रवर्तकांच्या मानधनात रु. ३,००० इतकी वाढ करण्याचा निर्णय कॅबिनेट मीटिंगमध्ये घेण्यात आला. हा एक ऐतिहासिक निर्णय होता. राज्यातील सुमारे ७२ हजार आशा वर्कर्सना या निर्णयामुळे दिलासा मिळाला.

४. कोविड संकटकाळात विविध रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टर्स महत्त्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्यावरची पदव्युत्तर परीक्षेची (डिप्लोमा आणि डिग्री) टांगती तलवार मानसिक तणाव निर्माण करणारी होती. यासंदर्भात अमितजींनी सरकारला पत्र लिहिलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हाच विषय पंतप्रधानांकडे मांडला. अमितजींमुळे निवासी डॉक्टरांच्या समस्यांना वाचा फुटली.

५. कोविड संकटकाळात बंधपत्रित डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे या डॉक्टर आणि नर्सेसचं मासिक मानधन रु १५,००० ते रु. २०,००० ने कमी झालं. अमितजी ठाकरे यांनी हा विषय आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. नुसतं पत्र लिहून ते थांबले नाहीत, तर त्यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे बंधपत्रित डॉक्टरांचा पगार पूर्ववत करण्याचा निर्णय सरकारने घेतला. बंधपत्रित नर्सेसचा पगार अद्याप पूर्ववत झाला नसला तरी त्यासाठी अमितजींचा पाठपुरावा सुरू आहे.

६. एमपीएससी-यूपीएससी परीक्षांची पूर्वतयारी करणारे शेकडो विद्यार्थी अनेक ठिकाणी, विशेषत पुण्यात अडकले होते. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या गावी जाता यावं, यासाठी एसटी उपलब्ध करून देण्याची विनंती अमितजींनी मुख्यमंत्र्यांना फोनद्वारे केली. मनसेचे कार्यकर्ते यांनी आरक्षित केलेल्या बसेस तसंच एसटी बसेस यांच्यामुळे हे शेकडो विद्यार्थी घरी सुखरूप पोहचले.

७. कोविडचा संसर्ग सुरू झाल्यावर टाळेबंदीच्या पहिल्या- दुस-या आठवड्यातच डॉक्टरांना पीपीई किट आणि मास्क उपलब्ध होत नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या बातम्यांची दखल घेऊन अमित ठाकरे यांनी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेला शेकडो पीपीई किट, मास्क उपलब्ध करून दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER