आयपीएलमध्ये काय बघून एवढ्या किंमती मोजतात हो?

भरमसाठ किंमत मिळालेले खेळाडू बघून वाटतेय आश्चर्य

आयपीएल 2021 (IPL 2021) चे लिलाव (Auction) गुरुवारी चेन्नईत पार पडले आणि त्यात काही खेळाडूंना मिळालेल्या भरमसाठ किमती आणि काही चांगल्या खेळाडूंना मिळालेल्या अगदीच नाममात्र किंमती हे आकलनापलीकडचे आहे. आयपीएलसाठी हे नवीन नाही. दरवर्षीच आयपीएलमध्ये अशा आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी घडत असतात. रिली मेरेडीथसारखा (Riley Meredith) नावसुध्दा माहित नसलेला खेळाडू 8 कोटी घेतो, कृष्णप्पा गौतमला (Krishnappa Gowtham) सव्वानऊ कोटी मिळतात आणि चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) फक्त 50 लाख आणि स्टिव्ह स्मिथला (Steve Smith) 2.20 कोटी मिळतात हे आश्चर्य वाटण्याजोगेच आहे.

ख्रिस मॉरिसचे कर्तृत्व काय?

दक्षिण आफ्रिकन अष्टपैलू ख्रिस मॉरिस (Chris Morris), ज्याला आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक किंमत, 16.25 कोटी रु. मिळाली…एकतर याचे वय 33 वर्षे, 2019 पासून तो आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, आयसीसीच्या अष्टपैलूंच्या यादीमध्ये तो टॉप- 20 मध्येसुध्दा नाही, बिग बॕश लीगमध्ये त्याला कुणीच पसंती दिलेली नाही, गेल्या आयपीएलमध्ये नऊ सामन्यात त्याने फक्त 34 धावा केल्या आणि 11 बळी मिळवले. एकूणच त्याची कारकिर्द काही भरात नाही. तरीसुध्दा त्याच्यासाठी आयपीएलच्या इतिहासात कुणाला मोजले नव्हते एवढे पैसे फ्रँचाईजींनी मोजले.

महागडे खेळाडू ‘मॅचविनर’ आहेत का?

रॉयल चॕलेंजर्स बंगलोरने काईल जेमिसनसारख्या खेळाडूसाठी जो आपल्या देशाबाहेर अद्याप एकसुध्दा सामना खेळलेला नाही त्याला 15 कोटी आणि गेल्या आयपीएलमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलसाठी 14.25 कोटी मोजले. झे रिचर्डसनसाठी पंजाबने 14 कोटी मोजले. टॉम करनला सव्वा पाच कोटी, मोझेस हेन्रिकला 4 कोटी 20 लाख, नेथन कोल्टरनाइलला 5 कोटी मिळाले. आता या सर्व खेळाडूंनी एखादा सामना जिंकून दिलाय असे काही आठवत नाही पण त्यांना एवढी घसघशीत किंमत मिळाली.

नंबर वनला का नाही मिळाली किंमत?

टी-20 झटपट क्रिकेटच्या दृष्टीने हे उपयुक्त खेळाडू आहेत असे समर्थन केले जाण्याची शक्यता आहे पण मग सध्या टी-20 क्रिकेटमध्ये जगातीला जो नंबर वन फलंदाज आहे त्यालासुध्दा चांगली किंमत मिळायला हवी होती पण नंबर वन डेव्हिड मालनला त्याच्या दीड कोटीच्या बेस प्राईसपेक्षा एक पैसासुध्दा जास्त कुणी दिला नाही. स्टिव्ह स्मिथसारख्या आघाडीच्या फलंदाजाला फक्त दोन कोटी 20 लाख मिळाले. आरोन फिंच, जेसन रॉय, अॕलेक्स हेल्स व कुशाल परेरा यांच्यासाठी तर कुणी बोलीसुध्दा लावली नाही. त्याचवेळी गेल्या आयपीएलमध्ये थट्टेचा विषय झालेल्या केदार जाधवला मात्र अवाजवी वाटणारी दोन कोटींची बेस प्राईस मिळाली.

पाचच खेळाडूंवर लागला निम्मा पैसा

एकूणच हिशोब लावला तर ख्रिस मॉरिस, काईल जेमिसन, ग्लेन मॅक्सवेल, झे रिचर्डसन व के.गौथम या पाच जणांचीच किंमत 68.75 राहिली. फ्रँचाईजींनी जे 145 कोटी 30 लाख खर्च केले त्यापैकी निम्मे रक्कम या पाच खेळाडूंवरच खर्च झाली आहे आणि उर्वरीत 52 खेळाडूंवर उरलेला पैसा फ्रँचाईजींनी लावला आहे. रॉयल चॕलेंजर्स बंगलोर व पंजाब किंग्ज यांनी मोठमोठ्या किमती मोजल्या आहेत. जेमिसन व मॕक्सवेल या दोघांसाठीच बंगलोरने 29 कोटी 25 लाख मोजले तर पंजाबने रिचर्डसन व मेरेडिथसाठी 22 कोटी मोजले.

मुंबई इंडियन्सचे व्यवसायाचे गणित पक्के

याच्या तुलनेत पूर्णपणे व्यवसायाचे गणित पक्के असणाऱ्या अंबानींच्या मुंबई इंडियन्सचा नफ्या तोट्याचा हिशेब इथेही पक्का असल्याचे दिसून आले आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स हा सर्वात यशस्वी संघ आहे पण त्यांनी कधीही भरमसाठ किंमत मोजुन खेळाडू खरेदी केले असे दिसणार नाही. त्यांनी आतापर्यंत एकाही खेळाडूला 10 कोटींच्यावर रक्कम मोजलेली नाही. आजवरचा त्यांचा सर्वात महागडा खेळाडू रोहित शर्मा हा राहिला आहे ज्याच्यासाठी 2011 मध्ये त्यांनी साधारण 9 कोटी रुपये मोजले होते. यावरुन मुंबई इंडियन्सचे यशस्वी संचालन करताना त्यांचे व्यवसायाचे गणितही पक्कै असल्याचे दिसून येते.

परदेशी गोलंदाज अष्टपैलूंना डिमांड

आयपीएलमध्ये नेहमीच परदेशी गोलंदाज अष्टपैलूंना मागणी असल्याचे दिसून आले आहे. यंदाचा लिलावही त्याला अपवाद नव्हता.

राजस्थान रॉयल्सचे सीईओ जेक लश मॅक्रम हे ख्रिस मॉरिसला दिलेल्या विक्रमी किमतीचे समर्थन करताना म्हणतात, “तो दर्जेदार गोलंदाज आहे आणि फलंदाजीनेही तो आम्हाला काही सामने जिंकून देऊ शकतो. डेथ ओव्हरमधील त्याच्या प्राविण्यासाठी कदाचित त्याला पसंती मिळाली असावी.,

आरसीबीने मॅक्सवेलसंदर्भात म्हटलेय की, त्याची भूमिका प्रत्येक संघाला कशी असावी असे वाटते त्यावर बरेच काही अवलंबून आहे. आम्ही त्याच्याकडे ‘फिनिशर’ म्हणून बघतो. तो बहुआयामी खेळाडू आहे. आयपीएलच्या बाहेर तो कशा पध्दतीने खेळलाय हे सर्वांनीच पाहिलेय.

परदेशी अष्टपैलू गोलंदाजांनंतर देशी मध्यमगती गोलंदाज अष्टपैलूंना पसंती देण्याचा आयपीएलचा ट्रेंड आहे. शिवम दुबेला राजस्थान रॉयल्सने 4.4 कोटी रु. मोजण्यात हेच कारण आहे.,

शाहरुख खानला त्याच्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील आक्रमक फलंदाजीचे फळ मिळाले. 20 लाख बेसप्राईस मागणाऱ्या या खेळाडूला तब्बल सव्वापाच कोटी किंमत मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER