लॉकडाऊनमध्ये क्रिकेटपटू काय करत आहेत?

virat-kohli-warns-players-otherwise-take-exit-team

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. स्टेडियम, मैदाने बंद आहेत. अशा वेळी क्रिकेटपटू काय करत आहेत? टेनिसपटूंनी टेनिस अट होम या हॅशटॅगने एकमेकांना आव्हान देण्याची मालिका चालवली आहे. त्यात रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोवीच, राफेल नदालपासून नवोदित खेळाडू हिरिरीने भाग घेत आहेत. क्रिकेटमध्ये तसे काही होत नसले तरी बहुतांश क्रिकेटपटू आपापल्या परीने स्वतःला व्यस्त ठेवत आहेत. भूतानमध्ये यू-ट्युबच्या मदतीने क्रिकेट प्रशिक्षण सुरू आहे. स्कॉटलंडचा क्रिकेटपटू मथ्थ्यू क्रॉस हा डॉमिनोजच्या खेळात रंगला आहे. वेस्ट इंडिज महिला संघाची माजी कर्णधार मेरिसा एगिलेरा एका गोंडस मुलीची आई बनली आहे.

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मक्सवेल घरातच आभासी गोल्फ खेळतोय. गोल्फ कोर्स बंद आहेत म्हणून आपण गोल्फ कोर्सवर जाऊ शकत नसलो तरी त्याने या मार्गाने गोल्फ कोर्सच घरी आणले आहे. पाकिस्तानचा साकलैन मुश्ताक मेकओव्हर करून आपल्या मुलीचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय. ते करताना तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत घरातच राहा, सुरक्षित राहा, असा सल्ला त्याने दिला आहे.

भारतीय महिला संघाची सदस्य चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात व्यस्त आहे. टी-२० विश्वचषक फायनल हरल्यावेळी काय भावना होती? या प्रश्नाचे उत्तर तिने अत्यंत दुःखी (हार्टब्रोकन) असे दिले आहे. विकेटकिपर सुषमा वर्मा छान छान पेंटिंग्ज बनवून आपला छंद पूर्ण करत आहे. लारेन विनफिल्ड ही आपल्या फार्ममध्ये पशुपालन व दुग्ध व्यवसायात रमली आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्स व्हर्च्युअल फॉर्म्युला वन रेसमध्ये नशीब अजमावत आहे. यात स्ट्युअर्ट ब्रॉड त्याच्यासारखाच रमलाय. माँट्रियाल वा आस्ट्रियाचा ट्रक असेल तर आपण केव्हाही तयार, असे त्याने म्हटले आहे. हाँगकाँगचे क्रिकेटपटू फिटनेसवर लक्ष देत आहेत. आपले हे सर्व उपक्रम ही मंडळी सोशल मीडियावर शेअर करताना लोकांना घरातच सुरक्षित राहण्याचे सांगायला मात्र विसरत नाहीत.