हे कसलं बोडक्याचं शिथीलीकरण…

Shailendra Paranjapeदुसरी लाट अटोक्यात आलीय असं सर्वांनीच आता गृहीत धरलंय आणि समाजात एक प्रकारची बेचैनी आहे. ही बेचैनी आहे ती कधी एकदा रस्त्यावर जाऊन मोकळा श्वास घेतो, चहा टपरीवर जातो, वडा-पाव, भेळ खातो. मित्रांबरोबर समोरासमोर दुचाक्या लावून कट्ट्यावर गप्पा मारत बसतो, याची. पण हे सारं किमान १५ जूनपर्यंत तरी शक्य नाही कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सध्याचे निर्बंध १५ जूनपर्यंत सुरू राहतील, असं फेसबुक लाइव्हद्वारे (Facebook Live) जनतेशी साधलेल्या संवादातून कालच स्पष्ट केलेय.

खरे तर करोना रुग्णांचे (Corona Patient) आकडे, सक्रीय रुग्णांची संख्या, रोज बरे होणाऱ्या रुग्णांची नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट, तिप्पट असलेली संख्या, कमी होत गेलेला मृत्यूदर हे पुण्यातलं करोना (Corona) रोगाचं चित्र. मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलंय की सक्रीय रुग्णसंख्यादर दहा टक्क्यांपेक्षा कमी असेल तर निर्बंध शिथील केले जाऊ शकतात आणि याचा फायदा पुण्याला मिळायला हवा. पण मुळात शिथील म्हणजे सध्या सुरू असलेली जीवनावश्यक वस्तू, डेअरी यांना सात ते अकरा याऐवजी सकाळी सात ते दुपारी दोन या वेळात खुली ठेवता येतील. हे कसलं आलंय बोडक्याचं शिथीलीकरण…..

कोरोना संपूर्णपणे नष्ट होण्यास बराच काळ लागणार असल्याचे मत विविध तज्ञ व्यक्त करीत आहेत पण म्हणून कायम लॉकडाऊन तर ठेवू शकत नाही. यावर उपाय सुचवताना काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी राज्य सरकारला आवाहन केले आहे की ज्या शहरात किंवा जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत चालले आहे तेथील दुकाने किमान आठवड्यातून १ वा २ दिवस तेसुद्धा अर्धा दिवस उघडण्याची परवानगी द्यावी वा अर्ध्या दुकानांना मंगळवारी व उरलेल्या दुकानांना शुक्रवारी व्यवसायाची परवानगी द्यावी.

आणखी एक पर्याय म्हणजे बाजारपेठेचे भाग पाडून पार्किंगप्रमाणे विभागवार “पी वन-पी टू” करून परवानगी द्यावी व परिस्थिती आणखी जशी सुधारेल त्याप्रमाणे एक-एक दिवस वाढवावा. शिवाय, मुंबई-पुण्यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक कार्यालयांना विभागवार आलटून-पालटून सुरु करण्याची कालांतराने परवानगी द्यावी.

आरोग्य तसेच इतर संबंधित क्षेत्रातील तज्ञांच्या सल्यानुसार महाराष्ट्र शासनाने यापूर्वी लॉकडाऊन जाहीर केला व आता तो परिस्थितीमुळे वाढविला हे योग्यच होते. तथापि गेल्या ११ महिन्यात ४ महिने बाजारपेठा, दुकाने, व्यवसाय जवळपास संपूर्णपणे बंद राहिले आहेत. यामुळे राज्यांचे व अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आरोग्य व मनुष्यजीव हा महत्वाचा आहेच. मात्र, आर्थिक स्थिती पूर्वपदावर यायला किमान २ वर्षे लागणार आहेत हे नजरेआड करून चालणार नाही, असेही अनंत गाडगीळ यांनी नमूद केलेय.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Govt) करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केलीय आणि ही चांगलीच गोष्ट आहे. मुख्यमंत्री गेले महिनाभर वा जास्तीच काळ तिसऱ्या लाटेविषयी बोलतात. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीसाठी राज्यभर जिल्ह्याजिल्ह्यात बालउपचारगृहं किंवा स्वतंत्र बालकांचे कक्ष सुरू केले जात आहेत. पुण्यात म्हणजे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्ह्याचे १३ तालुके या सर्वांसाठी मिळून आठ हजारच्या आसपास खाटा केवळ लहान मुलांसाठी सज्ज करण्यात आल्या आहेत. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे कारण दुधाने तोंड जीभ पोळली की माणूस ताकही फुंकून पितो, तसाच हा प्रकार आहे. किमान देर आये दुरुस्त आये, असंही म्हणता येईल. त्यामुळे तिसऱ्या लाटेची तयारी करतानाच मुळात दुसऱ्या लाटेचे धोके संपले आहेत का, याचा विचारही करायला हवा.

राज्यात सुमारे वीस लाखाच्या आसपास रुग्ण होम क्वारन्टाइन आहेत आणि हे सर्व डेंजरस सुपर स्परेडर्स आहेत. कारण हातावर होम क्वारन्टाइन शिक्का मारला तरी फुल शर्ट घालून, ग्लोव्ह्ज घालून आणि इतर अनेक क्लृप्त्या वापरून हे लोक बाहेर पडतात आणि त्यांच्या उत्साहामुळे, मूर्खपणामुळे, साहसामुळे समाजालाही धोका पोहोचू शकणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीसाहेब तिसरी लाट येओ न येओ, पण या गृह विलगीकरणवाल्यांवर करडी नजर ठेवा नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही कारण तुम्ही आमच्या सर्वांच्याच घराचे पालक आहात.

ही बातमी पण वाचा : वाईटपणा घेण्याचा हट्टही वाईटच

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button