पश्चिम बंगाल निवडणूक : हल्ल्यात ८५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; शहांचा टीएमसीवर हल्लाबोल

कोलकाता : भाजपचे (BJP) कार्यकर्ते गोपाल मजूमदार यांच्यावर झालेल्या हल्ल्यावेळी मारहाण झाल्याने जखमी झालेल्या त्यांच्या मातोश्री शोभा मजूमदार यांचे निधन झाले. शोभा मजूमदार यांच्या निधनावर भाजप नेते अमित शहा (Amit Shah) यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यानंतर राज्यातील ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सरकारवर निशाणा साधला.

शोभा यांच्या निधनानंतर भाजपने टीएमसीवर हल्ला चढवला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून ममता बॅनर्जी सरकारला घेरले आहे. केंद्रीय राज्यमंत्री देबश्री चौधरी यांनी ही घटना लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. “एवढी मोठी घटना घडली. एका ८५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आणि महिला मुख्यमंत्र्याने त्यावर चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे देश स्तब्ध झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यात हत्यांचे सत्र सुरू आहे. कुणालाही अटक केली जात नाही. कोणत्याही हत्येची चौकशीही करण्यात येत नाही.” असे चौधरी म्हणाले.

“बंगालची कन्या शोभा मजूमदार यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांना टीएमसीच्या गुंडांनी अमानुषपणे मारहाण केली होती. मजूमदार कुटुंबाला झालेला हा घाव ममता बॅनर्जींचा पिच्छा सोडणार नाही. बंगाल हिंसामुक्त होण्यासाठी लढेल. येथील महिलांच्या सुरक्षेसाठी आमची लढाई असेल.” असे शहा म्हणाले.

नड्डा यांचे ट्विट
या घटनेवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. “भाजप कार्यकर्ते असल्यामुळे गोपाल यांना आपल्या आईला गमवावे लागले. यांचे हे बलिदान सदैव स्मरणात राहील. शोभा या बंगालची आई होत्या, मुलगी होत्या. भाजप नेहमीच महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध राहील.” असे नड्डा यांनी म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय?
भाजप कार्यकर्ते गोपाल मजूमदार यांची आई शोभा मजूमदार यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला होता. शोभा यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली होती. माझा मुलगा भाजपसाठी काम करतो म्हणून त्याला मारहाण केली. मलाही धक्काबुक्की करण्यात आली. माझ्या मुलाच्या डोक्याला आणि हाताला मार लागला. मलाही जखमा झाल्या. मी बोलूही शकत नाही आणि व्यवस्थित काही सांगूही शकत नाही. तीन-चार लोकांनी आम्हाला अमानुषपणे मारहाण केली. त्यांचे चेहरे झाकलेले होते. त्यामुळे आम्हाला काय होत आहे हे कळले नाही, असे शोभा यांनी मृत्यूपूर्वी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button