
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीला (West Bengal Elections) अवघे काही दिवस शिल्लक असल्याने भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकीसाठी पक्षाने नुकतीच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. टीएमसी सोडून भाजपवासी (BJP) झालेल्या शुभेन्दु अधिकारी (Suvendu Adhikari) यांना नंदीग्राम येथून तिकीट दिले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) नंदीग्राममधूनच निवडणूक लढवत आहेत. त्याच्याशिवाय क्रिकेटपटू अशोक दिंडा (Ashok Dinda) यांना मोयना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा जागांसाठी २७ मार्चपासून ८ टप्प्यात मतदान सुरू होईल.
पहिल्या यादीमध्ये भाजपने आपल्या पक्षाच्या वतीने ५६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, तर सहयोगी आजसूसाठी बाघंडीची जागा सोडली आहे. पहिल्या टप्प्यात खेजरी मतदारसंघातून शांतनु प्रमानिक, झारग्राम येथून सुखमय सत्पती, खडकपूरमधून तपन भुईया, संबंत दास यांना मेदनीपूर येथून तिकीट देण्यात आले आहे, तर आजसूसाठी भाजपने बाघंडीची जागा सोडली आहे. महत्त्वाचे म्हणजे सन २०१६ मध्ये भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अवघ्या तीन जागा जिंकल्या होत्या. यावेळी पक्षाला बंगालमध्ये मोठं यश मिळण्याची आशा आहे. भाजपकडून २०० हून अधिक जागा काबीज करण्याचा दावा केला गेला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला