“आम्ही फूडी आणि आमचे संस्कृतीबंध .”

indian Food

हाय फ्रेंड्स ! माझं असं बरेचदा होतं, कधीतरी कुठेतरी आमटी खाल्ल्यावर अचानक आपल्या काकूच्या हातच्या आमटीशी तिचे सूर जुळतात आणि खात्री पटते. येस ! फूड इज मेमरी ! कधीतरी केलेल्या राजस्थान ट्रीपची आठवण येते आणि ऐन थंडीत सकाळी सकाळी रिचवलेल्या गरमागरम रबडीच्या नुसत्या आठवणीनेच अगदी ब्रह्मानंदी  टाळी लागते. असं  सगळ्याच संवेदनांच्या इंद्रियांचं  होतं. विशिष्ट फुलांचा सुगंध जुन्या घरातील कॉलनीची आठवण करून देतो . तिथेही आपल्या भावना गुंततात आणि आजीने कालवलेला वरण-भात आठवून आपल्याला लक्षात येते  की ‘फूड इज अल्सो इमोशन !’ थोडक्यात हे एक प्रकारचे खाद्यसंगोपनच म्हणा !

आपला देश हा विविधतेने नटलेला आहे . विविधतेतून एकता साधणारा आपल्याव्यतिरिक्त कुठलाही इतर देश नसावा. वेगवेगळे प्रदेश, तेथील विभिन्न पिके , हवामान आणि त्या अनुषंगाने येणारे विविध सण-उत्सव , मुख्य वेगवेगळे पारंपरिक पदार्थ ! ‘अन्न हे पूर्णब्रह्म मानून ते उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हे सांगणारा आपला देश. यज्ञकर्म जेवढ्या पवित्रतेने विविध समिधांचे हवन केले जाते, त्यास पवित्रतेने विविध सणांना आणि दररोजही पोषक अन्नाचे ,पोटाच्या जठराग्नीला संतुष्ट करण्यासाठी हवन केले जाते .विविध ऋतूंप्रमाणेच त्या त्या प्रांतातील पिकणारी अन्नधान्ये, हवामान, जीवनमान यानुसार ते हवन असते. म्हणूनच बरेचदा पर्यटक केवळ तेथील स्पेशल पदार्थांचा आस्वाद घेण्याच्या हेतूनेही प्रवास करतात. मुख्य म्हणजे यात कडू ,तिखट ,आंबट, गोड, खारट, तुरट सगळ्या अन्नरसांचा असणाऱ्या समावेश आणि त्यात भर म्हणून विविध प्रदेशांत आढळणारी जंगली फुलं, फळे व भाजी यांचाही रसास्वाद याच उत्सुकतेने घेतला जातो. उदाहरणार्थ, करटुले, हादग्याची फुलं, भोकराचे लोणचे, चिवळीची भाजी आणि असं बरंच काही!

 विविध भागांतून वाळवणाचे प्रकारही वेगवेगळे केले जातात. विशेषतः ग्रामीण भागातून केल्या जाणाऱ्या बिबड्या, कुरड्या , चिकवड्या, हातावरच्या शेवया, मूगवडे , करोडे , खिचडीबरोबर तळ्याच्या मिरच्या, बाजरीचे सांडगे, मिरगुंड, सुकेळी इत्यादींसाठी गावोगावच्या महिलांनी स्वतःला सक्षम करण्यासाठी बचत गट स्थापन केले असून हा खाद्यमेवा त्या शहरातील
लोकांपर्यंत विविध प्रदर्शनांतून पोचवतात आणि लोकांना हे सगळे पदार्थ पोटातून आवडतात.

आज कृषी पर्यटनालाही आलेले महत्त्व हेच दाखवत की सततच्या होणाऱ्या शहरांच्या वाढीमुळे, खेड्यातलं जीवन ,तेथील राहणी ,तेथील वस्तू खूप दुर्मिळ झाल्या आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे “मामाचा गाव “हरवला आहे. त्यामुळेच “मामा का ढाबा ,आईचा गाव” यासारख्या पर्यटन ठिकाणांना खूपच डिमांड आहे .अशा ठिकाणच्या हुरडा पार्ट्या ,रानमेवा, चुलीवरच्या पिठलं भाकरी ,बैलगाडीची सफर हे सगळ शहरी लोकांना खूप खुणावत आहे.

महाराष्ट्र या केवळ एकाच राज्यातल्या खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा किती विविधता असावी? खानदेशातील डाळ गंडोरी (मिरचीची भाजी) वांग्याचे खानदेशी भरीत, वर्‍हाडातील तील गोळा भात वडा भात, कोथींबीरीच्या वड्या( पुडाच्या वड्या) आमरस शेवया, कोल्हापुरी मिसळ मटणाचे सुक, तांबडा पांढरा रस्सा आणि लुसलुशीत भाकरी, तर पुढारी बाकरवडी आंबा बर्फी आणि सुरळीच्या वडीची तर चवच न्यारी! कोकण किनार्‍यावरचे सोलकडी ,उकडीचे मोदक प्रसिद्ध आहेतच. पण कोकण किनारपट्टी ची विशिष्ट बोली, हेल काढून बोलण्याची पद्धत ,यामुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

कोकणची किनारपट्टीत बारा कोसांवर बदलणाऱ्या भाषेप्रमाणे पदार्थांच्या चवी आणि नावेही बदलतात. याचं उदाहरण म्हणजे मालवणी भाषेत ज्या पदार्थांना,’ सुक ‘. त्यालाच मंगलोरी भाषेत सूक्के म्हटले जाते. दोन्हीचा अर्थ एकचं! अंगा सरशी रस असलेला पदार्थ. विविध हवामान मुळे तेथील पिक ही त्या त्या ठिकाणच्या शरीरस्वास्थ्यासाठी अनुकूल अशीच आहेत. आणि त्यामुळे काश्मीर पासून सुरू होणारी ही खाद्यजत्रा थेट खाली केरळलाचं संपते.

कश्मीर चे नाव घेतले की डोळ्यासमोर येतात फुलांनी आच्छादिलेले हिमशिखरे , पर्वत पायथ्याशी असलेली चीड देवदार यांची झाडी ,शिकाऱ्यांची ये जा म्हणजे तरंगते बाजारच! मुख्य म्हणजे मेवे अक्रोड खाणीत वापरून केलेले पदार्थ आणि चमन म्हणजे पनीर यांचा भरगोस वापर असणारा आणि तेथील लोकांना सौंदर्य अर्पण करणारा आहार असलेले हे कश्मीर म्हणजे सत्यातली स्वप्ननगरी ! तेथे एकूणच मांसाहाराला प्राधान्य जास्त. रोशनजोश, गुलर कबाब, बोली कबाब सारखे पदार्थ तेथील अन्नाची रुची वाढवतात.

पंजाब म्हटलं की उत्साही धष्टपुष्ट व हसतमुख ही विशेषणे शोभणारे पंजाबी आपला पंचनदयांनी सुपीक बनलेला प्रदेश आणि वैशिष्ट्यपूर्ण न्याहारी घेऊनच समोर उभे राहतात. दररोजच्या आहारामध्ये न्याहरीला अतिशय महत्त्व असणारा हा भाग. लोणी पराठा चण्याची उसळ गरमागरम जिलेबी वलसी हा नेहमीचा थाट तर तंदुरी पदार्थांची चव न विसरता येणारी. मक्याची रोटी व सरसो प्रसार याशिवाय तिथला हिवाळा संपत नाही.

भारताची राजधानी असलेल्या आमच्या दिल्लीवर भारताच्या एकात्मतेचा परिणाम झालेला दिसतो. काळाचे अवशेष जसे दिसतात तसेच मोगलाई पदार्थांचाही येथे विसर पडलेला नाही. चणे भटूरे कुलचे याखेरीज शरद ऋतू विशेष मोहक रूप दाखवतो. गजक रेवडी बदाम काजूची चिक्की खात दिल्लीकर आणि पर्यटक हे दिवस एन्जॉय करतात.

तेथून खाली आलं की गंगा यमुना या नद्यांचा आणि अनेक उपनद्यांचा सुपीक समृद्ध उत्तर प्रदेश दिसतो. येथेही गरम जिलेबी रबडी मिठाई इ कचोरी पुरी बटाटा रस्सा आणि फुल्ल मधला चहा, याबरोबरच मथुरेचे पेढे यांचा आस्वाद घेतल्यावर उत्तर प्रदेशाची ट्रीप पूर्ण कशी व्हावी? कारण लखनवी कुर्ता , विडा,अत्तर आणि गझल त्यांचा आस्वाद घेतल्याशिवाय उत्तर प्रदेश आपला निरोप घेत नाही.

राजस्थानी नृत्याने गाजलेला राजस्थान गट्टे का साग, शुद्ध तुपातली दाल बाटी आणि पकवान नदीवर यांनी पाहुण्यांचा आदरातिथ्य करतात तर काव्यमय प्रदेश काली माणसे निवासस्थान संस्कृतिक साहित्यिक परंपरा असलेला बंगाल दुधापासून बनवलेले पदार्थ हेच त्याचे वैशिष्ट्य रसगुल्ला जामुन चमचम मलाई सँडविच राजभोग आहा ss ! डाळ-ढोकळी ढोकला असे पदार्थ आठवले की इडिएट्स मधली करीना कपूर आठवते खरोखरच अतिशय गोड भाषा असणारे गुजराती बाजरी व मक्याच्या खमंग भाकरी व मसाल्याच्या वासाने दरवळणाऱ्या भाज्या आपल्याला खिलवतात.

गोव्याची स्वतःची वेगळीच खाद्यसंस्कृती देशात आणि विदेशातही प्रसिद्ध आहे पोर्क सागोती विंदालु हे त्यांचे पदार्थ दक्षिण भारतीयांचे पदार्थ मात्र महाराष्ट्रातील ही घराघरातून आवडीने बनवतात  इडली, सांबार-वडा, डोसा रस्सम आणि आंध्राचे चारू म्हणजे झणझणीत फोडणीचे वरण याशिवाय आणि पक्वान्न पायसमशिवाय जेवण पूर्ण होत नाही. नारळाचा भरपूर वापर आणि केळीच्या पानावर जेवण त्यांना अमृतासमान वाटतं. तर असा हा अन्नसेवनाचा मिळणारा परमानंद आणि तोही फक्त तात्पुरता नाही तर आठवणींमध्ये रेंगाळणारा, शांत असं समाधान देणारा, भूतकाळाच्या स्मृती जपणारा, बालपणीच्या आठवणींमधून जोपासलेली आपली पाळंमुळं जिवंत करण्याची सुखद जाणीव देणारा ! आणि म्हणूनच आम्ही सारे खवय्ये एकाच संस्कृती बंधातले, “मिले सूर मेरा तुम्हारा, सूर बने हमारा!” असे अभिमानाने म्हणत राहतो.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER