विहीर तहान लागल्यावरच का खणायची?

Shailendra Paranjapeरेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. त्याबरोबरच द्रवरूप प्राणवायूऐवजी हवेतूनच प्राणवायू घेऊन त्याचे शुद्धीकरण करून त्याचा वापर २५ ते १०० खाटांच्या रुग्णालयात करण्याचा पथदर्शी प्रकल्प जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी इथल्या रुग्णालयात केला जात आहे. येत्या १५ दिवसांत हा प्रयोग यशस्वी झाला की राज्यभर करता येईल.

कोरोनाने (Corona) राज्यभर, देशभर हाहाकार माजवला असताना दोन गोष्टींची चिंता सर्वाधिक जाणवते आहे. एक तर रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा, काळाबाजार आणि दुसरे म्हणजे रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना लागणारी प्राणवायूची वाढती गरज.

रेमडेसिवीरच्या काळ्या बाजाराच्या बातम्या गेल्या वर्षीही आल्या होत्या आणि यंदाही येत आहेत. पुण्यामध्ये केमिस्ट्स असोसिएशनच्या शुक्रवार पेठेतील चिंचेच्या तालमीलगतच्या कार्यालयाबाहेर गेल्या आठवड्यात लांबच लांब रांग दिवसभर तिष्ठत थांबलेली दिसत असे. अखेर लोकांकडून नोंदणी करून घेऊन त्यांना टोकन देण्याचा प्रकार सुरू झाला आणि नोंदणीनंतर दोन-तीन दिवसांनी किंवा जसे येईल तसे रेमडेसिवीरचे इंजेक्शन लोकांना उपलब्ध होऊ लागले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी गेल्या गुरुवारी थेट रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांबरोबर बैठक घेतली. त्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या पातळीवर बैठका घेऊन आता थेट रुग्णालयातूनच रेमडेसिवीर द्यावे, असे ठरवण्यात आले. थोडक्यात औषधाच्या दुकानातून ते दिले जाऊ नये, असे ठरवण्यात आले. उत्पादक ते ग्राहक किंवा रुग्ण असा रेमडेसिवीरचा प्रवास सुरू झाला. पण आता केंद्र सरकारलाही हस्तक्षेप करावा लागला आहे. देशातल्या प्रमुख सात रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांशी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी चर्चा केलीय आणि उत्पादन क्षमता वाढवण्याला मान्यता देण्यात आलीय.

रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवणे, प्राणवायुनिर्मितीसाठी पर्याय निर्माण करणे हे दोन्ही उपाय म्हणजे मानवाने मंगळावर जाणे किंवा चंद्रावर यान पाठवणे, इतके गुंतागुंतीचे तंत्रज्ञान असलेले निर्णय नक्कीच नाहीत. तरीही तहान लागल्यावर विहीर खणण्याची आपली सवय कधी जाणार, या प्रश्नाला आपल्या समाजात उत्तर नाही. कोरोना थोडा कमी झाला की खरेदीची झुंबड आणि तो वाढला की लॉकडाऊन, हे चित्र बदलायला हवे. मुळात वैद्यकीय क्षेत्रातले ज्ञान संपादन करून डॉक्टर झालेल्या कुणालाही सर्जन व्हायला आणि नंतर पैसे मिळवायलाच आवडेल. प्रिव्हेन्टिव्ह मेडिसिन किंवा रोग होऊ नये याची काळजी घेणारी वैद्यकीय प्रॅक्टिस करणारे कमीच असणार; कारण हा थोडा कष्टाचा लांबचा प्रवास आहे.

नियमित व्यायाम करून रोगांना दूर ठेवा, यापेक्षा आधी चंगळवादी लाइफस्टाइल ठेवा, लठ्ठ व्हा किंवा ओबेसिटीच्या आहारी जा आणि नंतर भरमसाट पैसे मोजून जिमला जा, डाएट प्लान घ्या, फिटनेस मंत्रांसाठी पैसा खर्च करा, हे जरा स्टेटससाठी चांगले वाटतेय. म्हणूनच मग कोरोनासारखा परमेश्वरानंतर सर्वव्यापी असलेला रोग आला की क्षणभंगुर जीवनावर जिवापाड प्रेम करणाऱ्या सगळ्यांचं काळीज हलतं. वास्तविक, प्रत्येकाने आपापली काळजी घेतली आणि कोरोनाचे नियम पाळले तर हा निर्जीव विषाणू त्रास देत नाही; पण भलती धाडसं करायची, बिनधास्त विनामास्क फिरायचं आणि एकेक करत सामूहिकपणे संपूर्ण व्यवस्थेवर ताण आणायचा. सरकारच्या नावानं बोंब मारायची, हे सुजाण नागरिकत्वाचं लक्षण नक्कीच नाही.

पीपल गेट रूलर्स दे डिझर्व्ह, असं एक वचन आहे. मराठी संस्कृतीत यथा राजा तथा प्रजा, असं सांगितलं जातं. राजाकडून प्रजेकडे प्रवास असो किंवा जनतेकडून राजापर्यंतचा प्रवास असो, तहान लागल्यावर विहीर खणणं चूकच आहे. त्यातही एक वर्षापूर्वी सारं रामायण अनुभवल्यानंतरही कोरोनाचं महाभारत घडणार असेल तर ना आपले राज्यकर्ते काही शिकलेत ना जनता, असंच म्हणावं लागेल. त्यामुळे कोणत्याही विषयावर मलमपट्टी करून वेळ भागवायची, हेच पुन्हा घडतंय. सध्या कळीचे विषय असलेले रेमडेसिवीर आणि प्राणवायू यांची सोय दोन्ही सरकारं करताहेत, किमान पावलं उचलताहेत, असं दिसतंय. त्यामुळे सध्या तरी पदरी पडले पवित्र झाले, या उक्तीप्रमाणे रेमडेसिवीरच्या उत्पादन क्षमतेत वाढ आणि प्राणवायू वापराच्या जालन्यातल्या प्रयोगांकडे डोळे लावून बसणे, इतकेच आपल्या हाती आहे. सध्या घरात बसून तितकंच करू या !

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

शैलेन्द्र परांजपे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button