‘स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे’

नव्या वर्षातील पहिल्या सूर्योदयाचे छायाचित्र काढण्याचा अनोखा उपक्रम - एमटीडीसीचा पुढाकार

First Sun Rays

मुंबई :- नव्या वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात सूर्योदय सर्वप्रथम गोंदिया जिल्ह्यात तर सर्वात शेवटी मुंबईमध्ये होतो. या दोन जिल्ह्यातील नागरीकांनी नव्या वर्षातील पहिल्या सूर्यकिरणांची अर्थात सूर्योदयाची अनोखी छायाचित्रे काढून ती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यातील निवडक छायाचित्रांना शासनाच्या विविध माध्यमांमधून प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

गोंदिया हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा तर मुंबई हा अतिपश्चिमेकडील जिल्हा. गोंदियाला महाराष्ट्राचा ‘उगवत्या सूर्याचा जिल्हा’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात पहिला सूर्योदय गोंदियामध्ये होतो. तिथे सूर्योदय झाल्यानंतर साधारणत: 27 मिनिटांनंतर मुंबईत सूर्योदय होतो. मावळत्या वर्षांला निरोप देण्यासाठी अनेकजण उत्साहात असतात पण काहीजण नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगळी वाट चोखाळतात.

महाराष्ट्रातल्या गोंदिया आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी नववर्षातील पहिल्या सूर्यकिरणांचे स्वागत करणाऱ्या निसर्गप्रेमी आणि पर्यटनप्रेमींसाठी एमटीडीसीने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.  पर्यटक, छायाचित्रकार, विद्यार्थी, नागरीक यांनी गोंदिया आणि मुंबईतील नव्या वर्षातील पहिल्या सूर्यकिरणांची अनोखी छायाचित्रे काढून ती कल्पक अशा फोटोओळीसह पाठवावी. पहिल्या तीन उत्कृष्ट छायाचित्रकारांना एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये तीन दिवस राहण्याची सोय करण्यात येईल. निवडक छायचित्रांना शासनाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी देण्यात येईल तसेच एमटीडीसीच्या देशविदेशात नेण्यात येणाऱ्या प्रसिद्धी सामग्रीत या छायाचित्रांचा समावेश करण्यात येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि एमटीडीसीची वेबसाईट, सोशल मिडीया पेजेस यांवर ही छायाचित्रे छायाचित्रकाराच्या नावासह प्रसिद्ध करण्यात येतील. छायाचित्रे [email protected] या ईमेलवर पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.