
ओटीटीमुळे अनेक निर्मात्यांना त्यांना जो विषय आवडेल किंवा ज्या विषयावर त्यांना काम करण्याची इच्छा आहे तो विषय घेऊन निर्मिती करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. काही निर्मात्यांना समाजातील काही प्रतिष्ठितांचे जीवन पडद्यावर मांडण्याची इच्छा असते. तीन तासात प्रसिद्ध व्यक्तीचे जीवन पडद्यावर मांडणे कठिण असते पण ओटीटीवर अनेक भागात ती कथा मांडता येते. जयपुरच्या विख्यात महाराणी गायत्री देवी (Gayatri Devi) यांची कथा पडद्यावर आणण्याची योजना एका निर्मात्याने आखली होती. गायत्री देवींची सुंदरता. त्यांचे वागणे, राहाणे, त्यांची दिनचर्या ही अनेक श्रीमंतांच्या जशी चर्चेचा भाग होती तशीच ती काही जणांच्या ईर्ष्येचाही भाग होती. गायत्री देवींबाबत अनेक कथाही प्रचलित आहेत. त्यामुळे त्यांचे जीवन पडद्यावर आणले तर ते प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असे या निर्मात्याला वाटत होते. त्याने यासाठी गायत्री देवीच्या वारसांकडे यासाठी परवानगीही मागितली होती. पण त्यांना परवानगी मिळत नव्हती. मात्र आता गायत्री देवीच्या वारसांनी प्रॉडक्शन कंपनीला निर्मितीचे अधिकार विकत दिल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती आणि ब्रिटनच्या महाराणीला थेट भेटण्याची क्षमता असलेल्या गायत्री देवींचा जन्म लंडनमध्ये झाला होता. त्यांचे वडील कूच बिहारचे राजे होते. गायत्री देवी यांचे लग्न महाराजा सवाई मान सिंह द्वितिय यांच्याशी झाले होते. गायत्री देवी या काँग्रेसच्या घोर विरोधी होत्या. त्यामुळेच तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री (Lal bahadur Shastri) यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचे दिलेले आमंत्रण त्यांनी नाकारले होते. गायत्री देवींचे वारस देवराज सिंह आणि लालित्य यांनी आता त्यांच्या आजीच्या जीवनावर वेब सीरीज बनवण्याची परवानगी दिली आहे. या वेबसीरीजबाबत माहिती देताना देवराज आणि लालित्य यांनी सांगितले, “गायत्री देवींचे जीवन प्रेरणादायी होते. त्यांचे जीवन सीरीजच्या रुपात येताना पाहणे खूपच रोमांचक आहे. ही वेबसीरीज आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन आणि प्रेरित करणारी असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या वेबसीरीजचे शूटिंग राजस्थानमधील वास्तविक लोकेशनवर केले जाणार असून गायत्री देवींनी वापरलेल्या वस्तूंचाही शूटिंगमध्ये वापर केला जाणार आहे. या वेबसीरीजमध्ये राजपूत परंपरा, त्यांचे वैभव दाखवले जाणार आहे. या वेबसीरीजचे लिखाण करण्यासाठी भवानी अय्यर आणि कौसर मुनीर यांना साईन केल्याचे सांगितले जात आहे. यावर्षीच्या शेवटच्या काही महिन्यात ही वेबसीरीज प्रसारित करण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गायत्री देवीची भूमिका करण्यासाठी एका मोठ्या नायिकेला साईन करण्याचा विचार निर्मात्यांचा असल्याचे सांगितले जात आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला