
मुंबई :- राष्ट्रवादीचे युवक कॉंग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांना कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होऊ देऊ नये अशा मागणीचं पत्र भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात देण्यात आलं होतं. तसंच मेहबूब शेख यांना परवानगी दिल्यास आंदोलन करु, असा इशारा भाजपने (BJP) दिला होता.
त्यानंतर नुकताच 24 जानेवारीला कल्याण येथे एक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात मेहबूब शेख यांनी हजेरी लावली होती.
भाजप युवा मोर्चाने शेख यांच्या उपस्थितीवर हरकत घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकरत्यांनीही आक्रमक होत “मेहबूब शेख यांच्या उपस्थितीवर हरकत घेणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी समोर यावं, चांगलाच धडा शिकवू”, असा इशारा कल्याण डोंबिवली राष्ट्रवादीचे युवाध्यक्ष सूधीर पाटील यांनी दिला.
कल्याण पश्चिम मधील भानूसागर सिनेमा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी स्वप्नील रोकडे यांच्या वतीने रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मेहबूब शेख हे उपस्थित राहणार असल्याने भाजप युवा मोर्चाकडून कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना पत्र देण्यात आले होते. या पत्रात “मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यांनी जामीन घेतला आहे का? त्यांना असे मेळावे घेता येऊ शकतात का? त्यांना मेळाव्यास उपस्थित राहण्याची परवानगी देऊ नये”, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती.
भाजपच्या या आव्हानानंतर राष्ट्रवादीचे युवाध्यक्ष सूधीर पाटील यांनी भाजपला समोर येण्याचं आव्हान दिलं. “भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात पत्र देऊन हरकत घेतली आहे. त्यांनी समोर रस्त्यावर यावे. त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकविला असता”, असं सूधीर पाटील कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून म्हणाले .
तर, केडीएमसीत यंदा राष्ट्रवादीचे 20 नगरसेवक निवडून येणार, असा विश्वास मेहबूब शेख यांनी व्यक्त केला. तसेच, भाजप-मनसेच्या युतीबाबत प्रश्न विचारला असता भाजपने कोणासोबतही युती केली तरी त्याचा महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही, असं शेख यांनी नमूद केलं.
ही बातमी पण वाचा : सिंधुदुर्गात राष्ट्रवादीकडून भाजपला खिंडार, अनेक कार्यकर्त्यांनी मनगटावर बांधले घड्याळ
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला