
पुणे :- देशभरात सध्या कोरोना लसीकरणाची (Coronavirus Vaccine) जोरदार तयारी सुरू आहे. अनेक भागांत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोना लस दिली जात आहे. त्यातच काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी लस घेतल्याशिवाय आम्ही घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे लसीबाबत काही ठिकाणाहून काही नकारात्मक बातम्याही येत आहेत. त्यामुळे सध्या लसीकरणाचा मुद्दा राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा मुद्दा आहे.
याकडेच माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले व आपण लस कधी घेणार, असा प्रश्न केला. यावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोना लस दिली जात आहे. आम्हाला ज्या वेळेस लस घेण्याची परवानगी मिळेल, त्या वेळी घेऊ आणि तुम्हाला सांगू. लसीबाबत काही अडचणी येत आहेत. एका सेंटरवर १०० जणांना लस दिली जाते. तीन दिवसांच्या लसीकरण टप्प्यात केंद्राकडून प्रत्येकाला तारखांची माहिती येत होती. ग्रामीण भागात १०० पैकी ६१ जणांनी लस घेतली. शहरी भागात सुरुवातीला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी मात्र तो कमी झाला.
पिंपरी चिंचवडमध्ये तर २७ टक्केच लसीकरण झालं, अशी माहिती अजित पवारांनी दिली. कमी लसीकरणाबाबत अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा काही कारणं समजली. संबंधित व्यक्ती आली आणि केंद्रावर आल्यावर म्हणाली की, मला लस नाही घ्यायची. काही जणांना रात्री उशिरा कळवल्याने सकाळी येता आलं नाही. पण लस घेतलेल्या तीन-चार डॉक्टरांशी माझं बोलणं झालं. त्यांनी कुठलेही साईड इफेक्ट नसल्याचं सांगितलं.
एका डॉक्टरला थोडासा ताप, कणकण जाणवत होती. मात्र तिसऱ्या दिवसापासून ते ठणठणीत झाले, असंही अजित पवारांनी सांगितलं. लसीकरणाचे अॅप राष्ट्रीय स्तरावरील आहे. त्यामुळे काही तांत्रिक अडथळे आहेत. कोणत्याही नवीन अॅपवर अडचणी येतातच; मात्र काही दिवसांनी सुरळीत होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
ही बातमी पण वाचा : धनंजय मुंडेंच्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला : अजित पवार
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला