फेक न्यूज, हिंसाचार पसरविणार्‍या सोशल मीडियावर कडक कारवाई करू

Ravi Shankar Prasad
  • मंत्री रविशंकर प्रसाद यांची राज्यसभेत ग्वाही

नवी दिल्ली :- भारतात समाजमाध्यमांचा (Social Media) दुरुपयोग वाढत असल्याबद्दल केंद्रीय माहिती तंत्रज्ञान तसेच कायदा मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि फेसबूक (Facebook), व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) यासारख्या समाजमाध्यमांचा फेक न्यूज व हिंसाचार पसरविण्यासाठी दुरुपयोग केला जात असल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.

आम आदमी पार्टीचे (AAP) सदस्य सुशीलकुमार गुप्ता (Sushil Kumar Gupta) यांनी गुरुवारी राज्यसभेत शून्य प्रहरात हा विषय उपस्थित केला व समाजमाध्यमांवर अंकुश ठेवण्याची गरज प्रतिपादित केली.

खासदार गुप्ता यांनी मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, समाजमाध्यमांनी सामान्य नागरिकाचे सबलीकरण केल्याने सरकार या माध्यमांचा खूप आदर करते. सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमातही समाजमाध्यमांची भूमिका महत्त्वाची  आहे. समाजमाध्यमांतून केल्या जाणार्‍या टीकेचेही सरकार स्वागत करते. परंतु फेक न्यूज व हिंसाचार पसरविण्यासाठी या माध्यमांचा दुरुपयोग केला जात असेल तर सरकार त्याविरुद्ध नक्की कारवाई करेल. फेक न्यूजचे तत्परतेने खंडन करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू  केला आहे व त्याच्या अंतिम गाईडलाइन्स लवकरच प्रसिद्ध केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री प्रसाद पुढे म्हणाले, ट्विटर असो, फेसबूक असो, लिंक्डइन असो अथवा व्हॉट्सअ‍ॅप असो, सर्वांना माझे नम्रपणे एवढेच सांगणे आहे : भारतात जरूर धंंदा करा. तुमचे कोट्यवधी फॉलोअर आहेत व आम्ही त्याचा आदर करतो. तुम्ही येथे पैसे कमवा, पण तुम्हाला भारतातील कायदे व येथील संविधानाचे पालन करावेच लागेल.

मंत्री म्हणाले की, या समाजमाध्यमांच्या कंपन्या ‘प्रायव्हसी पॉलिसी’च्या नावाने स्वत:चे नियम तयार करून धंदा करतात. पण त्यांच्या या ‘प्रायव्हसी पॉलिसी’ येथील कायदे व संविधानानुसार नसतील तर त्या चालू देणार नाही. ते म्हणाले की, ‘प्रायव्हसी’ हा नागरिकांचा एक मौलिक मूलभूत हक्क असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. सरकारही ‘प्रायव्हसी’चा आदर करते. या बाबतीत धोरणे व नियम यात ज्या काही उणिवा व त्रुटी आहेत त्या लवकरच दूर करण्यात येतील.

सार्वभौमत्वाशी तडजोड नाही

मंत्री प्रसाद म्हणाले की,ट्विटर या कंपनीकडे सरकारचे खासकरून लक्ष आहे. सरकारची या कंपनीशी बोलणी सुरू आहे. अमेरिकेत वॉशिंग्टनच्या कॅपिटॉल हिल या सर्वोच्च सत्ताकेंद्राच्या भागात निदर्शकांनी हिंसाचार केला तेव्हा हीच  समाजमाध्यमे तेथील पोलिसांच्या बाजूने उभी राहतात व इथे प्रजासत्ताकदिनी लालकिल्ल्यावर घुसखोरी होते तेव्हा ती  वेगळा सूर लावतात, असे कसे काय असू शकते. हा दुटप्पीपणा सरकार अजिबात खपवून घेणार नाही. लाल किल्ला हा भारताच्या अस्मितेचे प्रतीक आहे. भारतीय संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क नक्कीच आहे. पण त्यावरही सरकार वाजवी निर्बंध घालू  शकते. देशाची सार्वभौमता व एकात्मता यांच्याशी तडजोड करून हे स्वातंत्र्य कोणालाही उपभोगू दिले जाऊ शकत नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER