आम्ही स्व:त राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवू : राजू पाटील

Raju Patil

मुंबई : ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने मोठा निर्णय घेत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देण्यात येणारी झेड सुरक्षाही हटवण्यात आली आहे. यावर आता मनसेने ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यांची झेड सिक्युरिटी काढली. मात्र सुरक्षा काढली जरी असली तरी त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. ठाकरे सरकार हे जाणीवपूर्वक राजकारण करतंय, असं म्हणत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर ताशेरे ओढले. तसेच, राज ठाकरे यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे, असे म्हणत राज ठाकरे यांना मनसे सैनिक सुरक्षा पुरवतील असे ठणकावून सांगितले आहे.

तसेच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय सूडबुद्धीने घेतलेला असून राज्य सरकारच्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारा आहे, अशी टीका भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

उपाध्ये यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महाआघाडी सरकारने या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. कोरोना काळात व त्याआधीही देवेंद्र फडणवीस हे राज्यभर हिंडून जनतेला दिलासा देण्याचे काम करत होते. त्या काळात मुख्यमंत्री घरात बसून होते. भंडारा येथेही फडणवीस हेच सर्वप्रथम धावून गेले. राज्य सरकारने या नेत्यांची पूर्ण सुरक्षा काढून घेतली तरी ते जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम करतच राहतील, असेही उपाध्ये यांनी पत्रकात नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER