कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडविण्याबाबत पाठपुरावा करू – ॲड. यशोमती ठाकूर

Yashomati Thakur

अमरावती : रतन इंडिया व औद्योगिक वसाहतीतील इतरही कंपनीच्या कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले. रतन इंडिया व इतर अशा १३ कंत्राटदार कामगार बांधवांनी त्यांच्या प्रश्नांबाबत आज पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांना निवेदन दिले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

लॉकडाऊनच्या काळात कंपनीने कंत्राट कर्मचा-यांची कपात केली. उच्च शिक्षित व्यक्तीलाही हेतूपुरस्सर अकुशल काम दिले जात आहे. समान काम करूनही स्थानिकांना कमी वेतन दिले जाते. कामगारांना देय असलेले इतर लाभ मिळत नाहीत. मूळ कंपनी कर्मचा-यांना मिळणा-या लाभात व कंत्राटी कामगारांच्या लाभात तफावत असते. प्रत्यक्षात एकच काम करावे लागते. कंत्राटदार आपली जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांवर अन्याय होत आहे. ही स्थिती अशीच राहिली तर जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल, अशी तक्रार या कामगार बांधवांनी निवेदनात केली आहे.

सध्याच्या संकटकाळात सर्वच क्षेत्रांपुढे अनेक आव्हाने आहेत. मात्र, शासन खंबीरपणे जनतेच्या पाठीशी आहे. कामगार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.श्रीकांत ठाकरे, विक्रम हरणे, अतुल भोजने, सूरज कुलसंगे, भूषण भगत, निनाद चिकटे, प्रफुल्ल डोंगरे, विक्रम हरणे, रवींद्र इंगोले, भूषण गजभिये यांच्यासह अनेक कंत्राटी कामगारांच्या निवेदनावर सह्या आहेत.


Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER