आम्ही नक्की तुरुंगात जाऊ…

Shailendra Paranjapeप्रजासत्ताकदिनाचं (Republic Day) औचित्य साधून महाराष्ट्रामधे तुरुंग पर्यटनाला सुरुवात करण्यात आलीय. राज्यामध्ये  असलेल्या विविध तुरुंगांमध्ये स्वातंत्र्यलढ्याच्या काळात अनेक स्वातंत्र्य सेनानींना ठेवण्यात आलं होतं. राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi), पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यासह तत्कालीन सर्वच नेत्यांना कोणत्या ना कोणत्या आंदोलनात तुरुंगवास झाला होता. तीच गोष्ट त्याआधीच्या स्वातंत्र्ययोद्ध्यांची आहे. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना एडनच्या तुरुंगात, लोकमान्य टिळक यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले होते तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानमध्ये  सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्यांना पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासह अनेक क्रांतिकारकांनी फासावर जाण्याआधी तुरुंगभोग भोगलेलेच होते.

महाराष्ट्र सरकारने तुरुंग पर्यटन सुरू करताना ऐतिहासिक तुरुंगांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, यासाठी करत असल्याचं म्हटलं आहे. त्याचा शुभारंभ करताना पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या उपक्रमावर काही लोक टीकाही करतील, अशी शक्यताही व्यक्त केलीय. त्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे की, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, त्यामुळे काही जण टीकाही करतील. येरवडा कारागृहला दीडशे वर्षे पूर्ण झालीत आणि हे कारागृह म्हणजे स्थापत्यकलेचाही उत्तम नमुना असल्याने ते आताच्या पिढीला बघायला मिळायला हवं, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी  वडील शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या येरवडा वारीच्या आठवणी जागवल्या. आपण येरवडा जेलमध्ये  असलेल्या वडिलांना भेटायला यायचो आणि तेव्हाचं जेलचं वातावरण आजही आठवतं, असं त्यांनी सांगितलं. त्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांना लिहिलेलं पत्र अजित पवार यांनी वाचून दाखवलं. या पत्राचा दाखला देत हे कारागृह ऐतिहासिक असल्याचंही पवार यांनी सांगितलं.

स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच स्वातंत्र्यानंतर विविध आंदोलनांच्या काळात अनेक मोठे नेते, मान्यवर, समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, कामगार संघटनांचे नेते, विविध चळवळींचे नेते, रिक्षा संघटनेचे आणि हमाल पंचायतीचे नेते यांच्यापासून ते आणीबाणीतले सर्वच नेते तुरुंगात होते. त्यामुळे तुरुंग पर्यटनामध्ये सर्वसामान्य नागरिकांना हे सर्व जण कसे राहात होते, त्यांची दिनचर्या काय होती, या सर्व गोष्टी प्रत्यक्ष बघता येणार आहेत.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या २६ नोव्हेंबरच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबला (Ajmal Kasab) येरवडा जेलमध्ये  (Yerawada Jail) फाशी दिले गेले होते. कारागृहातील अंडा सेल, फाशीचे ठिकाणी हे सारे तर बघता येणार आहे. राज्याच्या विविध भागात त्या त्या भागातल्या समाजधुरिणांना त्या त्या वेळच्या आंदोलनांमध्ये  ठेवण्यात आलेले तुरुंग लोकांसाठी खुले झालेत.

हे सारं खरं असलं तरी तुरुंग बघायला जाऊन काही निरोपांचे आदानप्रदान झाले आणि त्यातून तुरुंगातल्या कैद्यांच्या सुरक्षिततेचा किंवा तुरुंगाच्या पोलादी भिंतींना तडे जाण्याचा प्रश्न आला तर तुरुंग पर्यटन म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार ठरायची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, तुरुंग पर्यटन नसतानाही तुरुंगात साधे कैदी, स्पेशल कैदी, तुरुंगात सापडलेले मोबाईल फोन्स, काहींना स्पेशल जेवण, आत पैसे पाठवण्याच्या व्यवस्था हे सगळं तुरुंगांच्या भिंतींच्या कुजबुजीतूनच पत्रकारांपर्यंत पोहचत असतं.

काहीही असलं तरी तुरुंग पर्यटन या उपक्रमाचं स्वागत करायला हवं. सर्वसामान्य लोकांना तर तुरुंग आतून बघता येतीलच; पण सार्वजनिक जीवनात आपण लोकांना विसरलो आणि पाय घसरला तर कुठे पोहचू, हे बघायला सामान्यांप्रमाणेच सर्वप्रथम राजकारण्यांची आणि मंत्रिमंडळाचीही एक सहल तुरुंग पर्यटनावर न्यायला हरकत नाही. तसेही काही अनुभवी चेहरे आहेतच ते तुरुंगात काय सुधारणा हव्यात ते पर्यटनपूर्वीच केलेले  असल्याने सांगू शकतील. काही जण अँडव्हान्स बुकिंग करू शकतील. काही राजकीय विरोधकांसाठी जागा बुक करतील. महापालिका मालमत्ता कराच्या दंडवसुलीत, वीज मंडळासह अनेक सरकारी उपक्रमात दंडात सवलती दिल्या जातात तसेच तुरुंग बघून काहींना केले गुन्हे कबूल करायची इच्छा झाली तर त्यांनाही तुरुंगवासातल्या काही सवलती अशा सहलींच्या वेळी डिस्प्ले कराव्यात म्हणजे पुढचे मोठे अनर्थ टळू शकतील.

तुरुंग पर्यटनाकडून फार अपेक्षा करतोय मी, असं तुम्हाला वाटेल. पण महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही. आम्ही तुरुंगात नक्की जाऊ. प्रेरणा घ्यायला.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER